Jaishankar’s Warning  : ‘२६/११’सारखी आक्रमणे भारत आता सहन करणार नाही !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची चेतावणी !

मुंबई – मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या (‘२६/११’च्या) जिहादी आतंकवादी आक्रमणाला भारताने (तत्कालीन सरकारने) कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. भविष्यात देशात पुन्हा असे आक्रमण झाले, तर तो खपवून घेतला जाणार नाही आणि त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

‘जेव्हा आपण शून्य सहनशीलतेविषयी (‘झिरो टॉलरन्स’विषयी) बोलतो, याचा अर्थ असा होतो की, नक्कीच उत्तर दिले जाईल. हा भारत हे सहन करणार नाही’, असे डॉ. जयशंकर म्हणाले.

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, मुंबई केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी ‘आतंकवाद विरोधा’चे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य असतांना भारताने आतंकवादविरोधी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. ज्या हॉटेलला आक्रमणाच्या वेळी लक्ष्य करण्यात आले, त्याच हॉटेलमध्ये या आतंकवादविरोधी समितीची बैठक झाली होती. भारत जगातील आतंकवादाविरुद्धच्या लढाईत नेतृत्वाची भूमिका बजावत आहे. कुणीतरी दिवसा धंदा करायचा आणि रात्री आतंकवादी कारवायांमध्ये गुंतणे हे आता अस्वीकारार्ह आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

आक्रमणे झाल्यानंतर कारवाई करण्याचा विचार करण्याऐवजी भारतावर यापुढे आक्रमण करण्याचेच कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे !