हिंदु इकोसिस्टम (यंत्रणा) : एक मृगजळ ?

‘वर्ष २०१६ मध्ये ‘भारत तेरे तुकडे होंगे…’, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामागे असलेल्या विचारसरणीविषयी या लेखात पहाणार आहोत. या विचारसरणीचा भारत आणि हिंदु धर्म नष्ट करण्याचा उद्देश आहे, ज्याला डावी विचारसरणी किंवा साम्यवाद किंवा वामपंथ या नावाने ओळखले जाते. या विचारसरणीने देशाच्या प्रत्येक क्षेत्रात बस्तान बसवले आहे.

या साम्यवाद्यांचा इतिहास सर्वाधिक रक्तरंजित राहिला आहे. केवळ त्यांच्याकडून कोट्यवधी लोकांची हत्या करण्यात आली आहे. आज या साम्यवादाचे स्वरूप काहीसे पालटल्यासारखे दिसते. जिहादी आतंकवादी शारीरिक हानी पोचवतात, त्याचप्रमाणे हे साम्यवादीही आपल्याला बौद्धिक क्षति (हानी) पोचवतात. ‘साम्यवाद आणि भारतातील त्याची स्थिती’, या विषयावर प्रसिद्ध लेखक श्री. अभिजीत जोग यांची ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. विक्रम डोंगरे यांनी घेतलेली मुलाखत येथे देत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतात साम्यवाद पसरण्यामागील कारणे, भारताची विद्यमान व्यवस्था संपवण्यासाठी इस्लाम आणि साम्यवाद यांची हातमिळवणी, साम्यवाद्यांकडून विविध शब्दांचा शस्त्रासारखा वापर, भांडवलशाहीने कार्ल मार्क्सचे भाकित खोटे ठरवले, हिंदु धर्माला सांस्कृतिक मार्क्सवादाचा धोका, साम्यवादाला प्रत्युत्तर देण्यात हिंदु असमर्थ आणि अमेरिकेत साम्यवादाचे सर्व क्षेत्रांवर वैचारिक नियंत्रण’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग ३)

याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/843628.html

श्री. अभिजीत जोग (उजवीकडे) यांची मुलाखत घेताना श्री. विक्रम डोंगरे

१०. भारतात सरकार हिंदुत्वनिष्ठांचे असले, तरी व्यवस्था साम्यवाद्यांची आहे !

वर्ष २०१५ मध्ये भारतात असहिष्णुता चळवळ राबवण्यात आली. त्यात विदेशातील अनेक प्रसिद्धीमाध्यमांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम भारतातील चर्चवरील आक्रमणातून असहिष्णूता चळवळ चालू झाली. वास्तविक चर्चवर कोणतेच आक्रमण झाले नव्हते. तरीही त्यांनी खोटे कथानक बनवले. नंतर त्यांनी देहली दंगलीला मुसलमानांचा कार्यक्रम म्हणून बनवले. यात अधिकांश हिंदू मेले; पण जगभरातील वर्तमानपत्रात हा मुसलमान कार्यक्रम होता, असे छापून आले. त्यांच्या या क्षमतेच्या विरोधात लढणे अतिशय कठीण आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणते, ‘सरकार तुमचे आहे; म्हणून काय झाले, व्यवस्था आमची आहे.’

भारतीय लोकसेवा आयोगाचे (‘यू.पी.एस्.सी.’चे) प्रशिक्षक सर्व साम्यवादी विचारसरणीचे असतात. भारतीय लोकसेवा आयोगातून उत्तीर्ण होऊन विद्यार्थी बाहेर पडतात, तेव्हा कुणी जिल्हाधिकारी, तर कुणी प्रशासनाच्या मोठ्या हुद्यांवर (पदांवर) जाऊन बसतात. ते सर्व साम्यवादी असले, तर पुढे जाऊन भारतात कोणता ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) चालेल ? सरकार तर हेच लोक चालवतात. भारतीय लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षण केंद्रावर या लोकांचा ताबा आहे, हे आपल्याला ठाऊकच नाही. त्यामुळे यांच्याशी आपण कसे लढू शकणार आहोत ? त्यामुळे १० वर्षे झाले, तरी आपण काहीच का करू शकत नाही, याचे कारण हे कसे करायचे, हेच आपल्याला ठाऊक नाही.

११. साम्यवादी व्यवस्थेशी लढणे भारतासाठी मोठे आव्हान !

साम्यवादी एवढे धूर्त आणि हुशार आहेत की, त्यांनी एकेक करून सर्व क्षेत्रावर त्यांचा ताबा मिळवला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही; पण कृत्रिम बुद्धीमत्तेवरही (‘आर्टिफिशिअल इंटलिजन्सवर’ही – ‘एआय’वरही) त्यांचे नियंत्रण आहे. जसजसे ‘एआय’ वाढत जाईल, तसतसे त्यांचे नियंत्रण वाढत जाईल. त्यामुळे ही प्रक्रिया तोडणे आणि त्यांना हटवणे, हे फार मोठे आव्हान आहे. त्यामुळे अमेरिकेत जाऊन शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनात ‘भारत एक भेदभाव असणारा समाज आहे’, यांसारखे विविध विचार येतात. ते भारताची ओळख जातीवाद, अस्पृश्यता असणारा, भेदभाव असणारा समाज, अशी करून देतात. अशा पद्धतीने आपल्याच लोकांना आपल्याच देशाविरुद्ध द्वेष करण्यास भाग पाडले जाते. ते बुद्धीभेद आणि वैचारिक विध्वंस यांचे तज्ञ आहेत. ते सौम्य विष पसरवतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढणे अतिशय कठीण आहे.

याविरोधात लढण्याचे पहिले पाऊल, म्हणजे आपल्याला शत्रूबोध होणे आवश्यक आहे. शत्रूबोध, म्हणजे हे काय चालू आहे, हे पहिले ओळखले पाहिजे. आपल्याला वाटते की, ते सामाजिक न्यायासाठी लढत आहेत, लोकांना वाटते की, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण यांसाठी लढत आहेत; पण हे सर्व मुखवटे आहेत. त्यामुळे हे काय आहे, हे आधी समजून घेणे आवश्यक आहे, त्यानंतर यांच्याशी कसे लढायचे, याचा विचार करू शकतात.

जगातील इजिप्शिअन, माया, झेन अशा सर्व सभ्यता नष्ट झाल्या आहेत; पण केवळ भारतीय संस्कृती टिकून आहे; कारण आपली संस्कृती आपली धरोहर असून ती आपली शक्ती आहे. ते हिंदु धर्माची मानहानी करण्यासाठी पर्यावरण, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता या सर्वांना हिंदु धर्माच्या उपासनांना जोडतात आणि म्हणतात की, या उपासना चुकीच्या आहेत अन् ते भारतीय मुलांच्या तसे डोक्यात भरतात.

१२. भारतात ऋग्वेदकाळापासून लोकशाही अस्तित्वात

जगातील सर्व संस्कृती नष्ट झाल्या; पण भारतीय संस्कृती अजूनही टिकून आहे; कारण हिंदु संस्कृती ही आपला वारसा आणि शक्ती आहे. ते हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी ‘व्हर्चुअल सिग्नलींग आयडियालॉजी’ (चांगल्या चारित्र्याचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने) वापरतात, जसे पर्यावरण रक्षण, सामाजिक न्याय, समानता, सर्वसमावेशकता या सर्वांना हिंदुत्वाच्या आचरणांशी जोडतात आणि हे सर्व आचरण चुकीचे आहेत, हे हिंदु मुलांच्या डोक्यात भरवले जाते. ऋग्वेदामध्ये राज्यव्यवस्थेचे विविध प्रकार सांगण्यात आले आहेत. त्यात २ प्रकार लोकशाहीप्रधान आहेत. त्यामुळे ऋग्वेदकाळापासून आपल्याकडे लोकशाही अस्तित्वात आहे, हे लक्षात येते. पाश्चात्त्य देशांमध्ये गोरे लोक हे सर्वांत मोठे अत्याचारी दर्शवले जातात, तर भारतात म्हणतील की, ब्राह्मण हे सर्वांत मोठे अत्याचारी होते. त्यांनी एक फार मोठे किचकट ‘मॉडेल’ बनवले आहे. त्यात त्यांचे म्हणणे आहे, ‘जो अत्याचारी आहे, तो कधीही योग्य असू शकत नाही आणि जो पीडित आहे, तो कधीही चुकीचा असू शकत नाही.’ जेव्हा मुलाचा जन्म होतो, तेव्हा त्याचे आई-वडील आणि डॉक्टर त्याचे लिंग प्रदान करतात, निसर्गत: तो घेऊन येत नाही. त्याला त्याचे आई-वडील किंवा डॉक्टर सांगतात, ‘बेटा, तू मुलगा आहे किंवा मुलगी आहे.’ याचा अर्थ असा की, आपल्यावर जे लिंग थोपवण्यात आले आहे, त्याला नकार देण्याचे आपल्याला स्वातंत्र्य असले पाहिजे.’ हे हास्यास्पद असून मूर्खपणा आहे. त्यांच्या दृष्टीने ‘व्यक्तीला काय वाटते, याला महत्त्व आहे. वास्तविकता काय आहे, याला महत्त्व नाही.’ एक कुख्यात बलात्कारी होता. या गुन्ह्यासाठी तो वारंवार कारावासात गेला होता. तो म्हणाला, ‘मला वाटते की, मी स्त्री आहे.’ त्यामुळे त्याला ‘जिनियस’च्या (अलौकिक बुद्धीमत्ता असलेल्यांच्या) कारागृहात ठेवावे लागले.

१३. हिंदूंनी साम्यवाद्यांच्या षड्यंत्राला फसू नये !

भारत हा देश आहे की, जेथे इस्लामने येऊन आक्रमण केले आणि राज्यही केले; परंतु ते भारतातील सर्व लोकांना भाषा अन् धर्म पालटण्यास बाध्य करू शकले नाही; कारण आपल्या पूर्वजांनी प्रचंड संघर्ष केला. त्याला ‘कॉन्स्पिरसी थेअरी’ (षड्यंत्राचा सिद्धांत) म्हणतात. हा शब्दही साम्यवाद्यांनीच निर्माण केला. आपण कोणत्याही गोष्टीला षड्यंत्र ठरवले, तर हे लोक त्याची चेष्टा करतात; परंतु हे खरोखर षड्यंत्र आहे. आपल्याला ठामपणे म्हटले पाहिजे की, हे षड्यंत्र आहे आणि आम्ही याला फसणार नाही.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. अभिजीत जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.

संपादकीय भूमिका :

हिंदूंनी शत्रूबोध जाणून घेऊन कथित सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण यांसाठी लढणारे साम्यवादी मुखवटे जाणून घेणे आवश्यक !