साम्यवाद्यांचा इतिहास सर्वाधिक रक्तरंजित राहिला आहे. केवळ त्यांच्याकडून कोट्यवधी लोकांची हत्या करण्यात आली आहे. आज या साम्यवादाचे स्वरूप काहीसे पालटल्यासारखे दिसते. जिहादी आतंकवादी शारीरिक हानी पोचवतात, त्याचप्रमाणे हे साम्यवादीही आपल्याला बौद्धिक क्षति (हानी) पोचवतात. ‘साम्यवाद आणि भारतातील त्याची स्थिती’, या विषयावर प्रसिद्ध लेखक श्री. अभिजीत जोग यांची ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. विक्रम डोंगरे यांनी घेतलेली मुलाखत येथे देत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतात साम्यवाद पसरण्यामागील कारणे, भारताची विद्यमान व्यवस्था संपवण्यासाठी इस्लाम आणि साम्यवाद यांची हातमिळवणी, भांडवलशाहीने कार्ल मार्क्सचे भाकित खोटे ठरवले, हिंदु धर्माला सांस्कृतिक मार्क्सवादाचा धोका, साम्यवादाला प्रत्युत्तर देण्यात हिंदु असमर्थ, साम्यवादी व्यवस्थेशी लढणे भारतासाठी मोठे आव्हान आणि हिंदूंनी साम्यवाद्यांच्या षड्यंत्राला फसू नये’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ४)
याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/846134.html
१४. भारतीय संस्कृतीवरील आक्रमणाला विरोध होणे आवश्यक !
सांस्कृतिक साम्यवादाद्वारे आपल्या हिंदु संस्कृतीवर आक्रमण होत आहे. आपली संस्कृती अतिशय बलशाली आणि सबळ आहे. त्यामुळे सहस्रो वर्षांपासून आजही ती टिकून आहे. तिला अधिक बलवान करावे लागेल. जगातील इजिप्शियन, माया आदी संस्कृती नष्ट झाल्या; पण केवळ भारतीय संस्कृती अद्यापही टिकून आहे; कारण आपली संस्कृती ही आपला वारसा असून ती आपली शक्तीही आहे. या संस्कृतीविषयी आपल्याच मनात घृणा निर्माण केली, तर आपण किती दिवस टिकू शकणार आहोत. त्यासाठी कुणी अपल्या संस्कृतीवर आक्रमण करत असेल, तर त्याला तेथेच थांबवले पाहिजे. त्याला म्हटले पाहिजे, ‘तुमचे सामाजिक कार्य चांगले आहे; पण आमच्या संस्कृतीवरील आक्रमण आम्हाला मान्य नाही.’ हा भेद करणे शिकले पाहिजे आणि तरुणांनाही शिकवले पाहिजे.
१५. युवकांमध्ये हिंदु संस्कृतीविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी तिला आकर्षक करणे आवश्यक !
तरुण हे आदर्शवादी असतात. त्यामुळे त्यांना भुलवणे सोपे असते. त्यांना कुणी म्हटले, ‘पर्यावरण अतिशय महत्त्वाचे आहे’, तर ते त्यासाठी सिद्ध होतात. त्याच वेळी त्यांना सांगण्यात येते, ‘तुमची संस्कृती शिकवते की, पर्यावरण खराब करा.’ उदा. गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने प्रदूषण होते. ते प्रत्येक वाईट गोष्टीचा संबंध हिंदु संस्कृतीशी जोडतात. ‘होळीच्या वेळी पाण्याचा अपवापर होतो’, असे म्हणतील; पण ईदच्या वेळी ‘बकरे कापू नका’, असे म्हणणार नाहीत. त्यामुळे हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी ‘व्हर्च्यू सिग्नॉलाजी’ आदर्शवाद आहे. पर्यावरणवाद, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, सर्वसमावेशकता यांना हिंदु आचरणाशी जोडतात आणि ‘हे वाईट आहे’, असे सांगतात. त्याला आपल्या मुलांच्या डोक्यात भरतात. त्यामुळे आपल्या मुलांना सांगितले पाहिजे की, या दोन गोष्टी एकमेकांशी संबंधित नाहीत. ते केवळ आपली संस्कृती नष्ट करण्यासाठी केले जात आहे. आपण जेव्हा सांस्कृतिक युद्ध लढू आणि संस्कृतीवरील आक्रमण थांबवू, तेव्हा ते काहीच करू शकणार नाही. त्यांचे संपूर्ण आक्रमण आपल्या संस्कृतीवर आहे. ‘त्यांना केवळ हिंदु संस्कृती नष्ट करायची आहे’, हे समजून घेऊन ते आधी थांबवले पाहिजे. त्यासाठी आपल्याला ‘कल्चर कुल’(आकर्षक संस्कृती) केले पाहिजे. विशेषत: तरुण पिढीसाठी असते. त्यांना आकर्षक हवे असते. त्यांना आकर्षक दिसावे असे वाटते. साम्यवाद्यांनी तेच केले आहे, संस्कृतीला अनकुल करायचे ठरवले. जसे परंपरा जपणे, म्हणजे मागासलेलेपणा आणि मूर्खपणा असल्याचे सांगतात. आपल्याला याच्या उलट जावे लागेल. आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरा यांना आकर्षक करावे लागेल. युवकांमध्ये हिंदु संस्कृतीविषयी आकर्षण निर्माण करावे लागेल. हे मोठे युद्ध आहे. त्याला हुशारीने लढावे लागेल.
१६. जागतिक मूल्ये असणारा हिंदु धर्म हाच पर्यावरणाचा खरा रक्षणकर्ता !
हिंदु धर्मात आधीपासून जागतिक मूल्ये अस्तित्वात आहेत. विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हे अन्य कोणत्याही धर्मांपेक्षा हिंदु धर्मात अधिक आहे. मुसलमान आणि ख्रिस्ती या पंथांमध्ये त्यांचे धर्मग्रंथ अन् प्रेषित यांवर विश्वास ठेवणे बंधनकारक आहे. ते विश्वास ठेवणारे (बिलिव्हर्स) आणि न ठेवणारे यांच्यात भेद करतात. हिंदु धर्म आपल्याला स्वत:चा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य देतो. चार्वाक आणि पूर्णकश्यप यांनी वैदिक परंपरांना नाकारले, तरी ते आनंदाने हिंदु धर्मात राहू शकतात. हिंदु धर्म सर्वांना स्वातंत्र्य देतो. हिंदु धर्म म्हणतो, ‘तुम्ही ‘बिलिव्हर’ बनू नका, तर साधक बना.’ आपण मुलांना सांगितले पाहिजे, ‘तुम्ही काय वैचारिक स्वातंत्र्याची गोष्ट करता, ते तर आपल्याच धर्मात आहे.’ पर्यावरणाविषयी संवेदनशीलता (इकोसिन्सिटिव्हीटी) ही हिंदु धर्मात आहे. एकमेव हिंदु धर्म सागंतो, ‘तुम्ही सृष्टीचे लचके तोडू नका; कारण तुम्ही विश्वाचे मालक नाहीत.’ हिंदु धर्मात म्हटले आहे, ‘मानव हा या एकंदर सृष्टीचा एक भाग आहे.’ हेच खरोखर पर्यावणाचे रक्षण आहे.’ या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजेत. याउलट ख्रिश्चॅनिटी म्हणते, ‘मानवजात ही या विश्वाची मालक आहे.’ आपल्या हिंदु धर्मामध्ये वृक्ष, नद्या, पशू आणि पक्षी यांचे पूजन केले जाते. हिंदु धर्मात सर्व सृष्टीला देवता समजले जाते आणि त्यांच्यासह मिळून मिसळून राहिले जाते. आधुनिक काळात मुलांना हे न शिकवता चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात.
१७. सर्वसमावेशक हिंदु धर्माची महत्ता मुलांना सांगणे आवश्यक !
अमेरिकेत बसून कोणत्या देशात लोकशाही आहे, हे पहातात; पण भारत हा लोकशाहीची मातृभूमी आहे. येथे ख्रिस्तपूर्वीपासून लोकशाही अस्तित्वात होती. ऋग्वेदातही राज्यव्यवस्थेचे जे प्रकार सांगितले आहेत, त्यात २ लोकशाहीप्रधान आहेत. त्यामुळे ऋग्वेदकाळापासून येथे लोकशाही अस्तित्वात आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे) हे म्हणणारी केवळ भारतीय संस्कृती आहे. आपण म्हणतो, ‘संपूर्ण विश्वातील चांगले विचार आपल्याकडे यावे.’ हे म्हणणारी केवळ भारतीय संस्कृती आहे. अन्य पंथांच्या संस्कृती म्हणतात, ‘इस्लाम मान्य करा, अन्यथा तुम्ही मरा किंवा येथून निघून जा.’ ख्रिश्चॅनिटी म्हणते, ‘प्रत्येकाने ख्रिस्ती बनले पाहिजे.’ हिंदु विचारसरणी ‘हे विश्वची माझे घर’, असे म्हणते. जगातील कुणीही भारतात येऊ शकतो. जगात ज्यांच्या ज्यांच्यावर अत्याचार झाले, त्या सर्वांनी भारतात आश्रय घेतला. ज्यूंवर अत्याचार झाले, ते भारतात आले. इराणमध्ये पारसींवर अत्याचार झाले, ते भारतात आले. सीरियन ख्रिस्ती भारतात आले. येथे येऊन त्यांनी त्यांची संस्कृती आचरणात आणली आणि प्रेमाने राहिले. त्यामुळे हिंदु धर्माला कुणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही; पण हे आपल्याला आपल्या मुलांना सांगितले पाहिजे, ‘तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका. या त्यांच्या मुखवट्यामागे हिंसाचार आहे. हिंदुत्वामध्ये हिंसाचार नाही.’ हे जेव्हा आपण मुलांना शिकवू आणि आपल्या संस्कृतीला अधिक सबळपणे आत्मविश्वासाने जगासमोर ठेवू, तेव्हा आपण लढू शकू, हे लक्षात घेतले पाहिजे.
१८. भारतीय कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त करणारा साम्यवाद्यांचा ‘वोकिझम’!
सांस्कृतिक साम्यवाद ही विचारसरणी साम्यवाद्यांनी आपल्यासमोर ठेवली, त्याचेच दुसरे नाव ‘वोकिझम’ आहे. ‘वोकिझम’ हा सामाजिक न्यायाचा मुखवटा घेऊन भारतात पसरत आहे. कोणत्याही समाजात प्रमुख सांस्कृतिक विचारसरणी असते. त्याच्या सभोवताली लहान लहान सांस्कृतिक गट असतात, त्यांचे शोषण केले जाते. ते शोषित असतात आणि मुख्य प्रवाहातील संस्कृती ही शोषक असते. हा ‘वोकिझम’चा मुख्य आधार आहे. ‘पाश्चात्त्य जगात गोरे मनुष्य हे मोठे शोषक आहेत. भारतात ब्राह्मण मनुष्य हा मोठा शोषक आहे’, अशा प्रकारे त्यांनी फार मोठे ‘मॉडेल’ बनवले आहे. त्यांच्या मते शोषक कधीही योग्य असू शकत नाही आणि शोषित कधीही चुकीचा असू शकत नाही. पती शोषक असेल, तर त्याची पत्नी ही शोषित असते. ते तुमच्या घरीही घुसून सांगतील, ‘हे शोषक आहे आणि हे शोषित आहे.’ ते या स्थितीला जातात की, पालक शोषक असून त्यांची मुले ही शोषित आहेत. त्यामुळे ते मुलांना त्यांच्या पालकांशी लढण्यासाठी प्रेरित करतात, ते झगडे लावतात, म्हणजे लेखात सांगितल्याप्रमाणे ते संघर्षाचे बिंदू निर्माण करतात. कुटुंबव्यवस्थेचा विध्वंस हे त्यांचे एक मोठे लक्ष्य आहे आणि ते साध्य करण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी आपल्यासमोर ठेवल्या आहेत.
त्यातील एक आहे, ‘ट्रान्सजेन्डारिझम्’! (लिंगपालट) स्त्री आणि पुरुष ही वेगवेगळी ओळख आहे. ते निसर्गत: बनले आहेत. काही वेळा पुरुषामध्ये स्त्रीसुलभ भावना अधिक असतात किंवा स्त्रीमध्ये पुरुषत्वाची भावना अधिक असते. हा अपघात असून नियम नाही. असे ०.२ टक्के प्रकरणात असे होऊ शकते. या लोकांच्या मते लिंग हे जैविक वास्तव नाही. त्यांच्या मते स्त्री आणि पुरुष ही जैविक ओळख नाही, तर सामाजिक कंत्राट आहे. हे किती धोकादायक आहे, हे समजून घ्या. त्यांच्या मते ‘मुलाचा जन्म होतो, तेव्हा त्याचे आईवडील आणि आधुनिक वैद्य (डॉक्टर) त्याला त्याचे लिंग प्रदान करतात, निसर्गत: तो घेऊन येत नाही. त्याला त्याचे आईवडील सांगतात की, ‘बेटा तू मुलगा किंवा तू मुलगी आहे.’ त्यामुळे व्यक्तीवर जे लिंग थोपवले आहे, ते नाकारण्याची तिला स्वातंत्र्य असले पाहिजे. ३ वर्षापर्यंत मुलाला समजते की, त्याला दिलेले लिंग त्याला हवे कि नाही ? या आधारावर ते बालवाडीच्या मुलांना शिकवतात, ‘तुमचे पालक तुम्हाला मुलगी समजत असेल; पण तुम्हाला मुलगा व्हायचे असेल, तर तुम्ही बनू शकता.’ ते असे इतक्या लहान वयात त्यांच्या डोक्यात घुसवतात. जेव्हा मुलगा किंवा मुलगी १०-१२ वर्षांचे होतात, तेव्हा ते अधिकृतपणे लिंगपालटची शस्त्रक्रिया करू शकतात. आधी त्याला ‘हार्माेन्स’चे (संप्रेरकाचे) इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर शस्त्रक्रिया करून त्याच्या शरिरातील पुनरुत्पादक अवयव (रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन) पालटले जातात. मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी बनवले जाते. हे करण्यासाठी त्यांना पालकांच्या अनुमतीची आवश्यकता नाही. असा कायदा त्यांनी अमेरिकेत बनवला आहे.’
(समाप्त)
– श्री. अभिजीत जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.
संपादकीय भूमिकासांस्कृतिक साम्यवादाचे आक्रमण थोपवण्यासाठी हिंदु मुलांना स्वधर्म आणि संस्कृती अधिक सबळपणे शिकवणे आवश्यक ! |
श्री. अभिजीत जोग यांची ‘सनातन प्रभात’ने साम्यवाद या विषयावर घेतलेली विशेष मुलाखत (पॉडकास्ट) यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा ! |