‘वर्ष २०१६ मध्ये ‘भारत तेरे तुकडे होंगे…’, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामागे असलेल्या विचारसरणीविषयी या लेखात पहाणार आहोत. या विचारसरणीचा भारत आणि हिंदु धर्म नष्ट करण्याचा उद्देश आहे, ज्याला डावी विचारसरणी किंवा साम्यवाद किंवा वामपंथ या नावाने ओळखले जाते. या विचारसरणीने देशाच्या प्रत्येक क्षेत्रात बस्तान बसवले आहे. या साम्यवाद्यांचा इतिहास सर्वाधिक रक्तरंजित राहिला आहे. केवळ त्यांच्याकडून कोट्यवधी लोकांची हत्या करण्यात आली आहे. आज या साम्यवादाचे स्वरूप काहीसे पालटल्यासारखे दिसते. जिहादी आतंकवादी शारीरिक हानी पोचवतात, त्याचप्रमाणे हे साम्यवादीही आपल्याला बौद्धीक क्षति (हानी) पोचवतात. ‘साम्यवाद आणि भारतातील त्याची स्थिती’, या विषयावर प्रसिद्ध लेखक श्री. अभिजीत जोग यांची ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. विक्रम डोंगरे यांनी घेतलेली मुलाखत येथे देत आहोत. ६ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतात साम्यवाद पसरण्यामागील कारणे, भारताची विद्यमान व्यवस्था संपवण्यासाठी इस्लाम आणि साम्यवाद यांची हातमिळवणी, साम्यवाद्यांकडून विविध शब्दांचा शस्त्रासारखा वापर आणि भांडवलशाहीने कार्ल मार्क्सचे भाकित खोटे ठरवले’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग २)
मागील भाग येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/841116.html
६. लोकांना क्रांतीसाठी सिद्ध करण्यासाठी त्यांची संस्कृती नष्ट करण्याचे साम्यवाद्यांचे प्रयत्न
ज्या देशात औद्योगिकरण झाले, तेथील लोक क्रांतीला सिद्ध होत नाहीत, हे साम्यवाद्यांच्या लक्षात आले. इटलीच्या कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष अँटेनिओ ग्राम्सकी आणि जर्मनीतील फ्रँकफर्ट स्कूल (फ्रँकफटमधील अध्यापकांचा गट) यांनी एक सिद्धांत समोर ठेवला. त्यानुसार पाश्चात्त्य जगतातील लोक (कामगार) क्रांतीसाठी सिद्ध होत नाहीत; कारण ते पाश्चात्त्य सभ्यतेला त्यांची सभ्यता समजतात. साम्यवाद्यांच्या मते ‘ही सभ्यताही त्यांच्या शोषणासाठी बनवण्यात आली आहे; पण ती एवढी हुशारीने बनवण्यात आली की, त्यांना कळतच नाही की, ती त्यांच्या शोषणासाठी बनवण्यात आली आहे. त्यामुळे ते आनंदाने त्यात सहभागी होतात.’ त्यामुळे साम्यवाद्यांनी असा सिद्धांत ठेवला, ‘या लोकांना क्रांतीसाठी सिद्ध करायचे असेल, तर ही सभ्यता किंवा संस्कृती नष्ट केली पाहिजे. या विध्वंसासाठी संस्कृतीला शक्ती प्रदान करणार्या कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, शिक्षणव्यवस्था, राष्ट्रवाद या सर्व संस्थांना ते नष्ट करतील. त्यामुळे सर्व पाश्चात्त्य सभ्यता नष्ट होतील आणि ते लोक मार्क्सवादी क्रांतीला सिद्ध होतील.’
७. हिंदु धर्माला सांस्कृतिक मार्क्सवादाचा धोका
आधी साम्यवाद्यांच्या संघर्षाचा आधार आर्थिक होता; पण आता त्याला सांस्कृतिक आधार बनवण्यात आला आहे. त्यालाच ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’ म्हणतात. त्यांनी असेही म्हटले, ‘ही क्रांती रक्तरंजित नाही, तर हळूवारपणे होईल. साम्यवादी त्यांच्या व्यवस्थेच्या आत घुसखोरी करतील, त्यांना वाळवीप्रमाणे हळूहळू नष्ट करतील आणि एकदिवस ते पूर्णपणे ढासळून जाईल.’ याला त्यांनी ‘लाँग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशनस’ हे नाव दिले. याविषयी त्यांनी वर्ष १९२०च्या दशकामध्ये लिहून ठेवले आहे, जे आपल्याला आता अमेरिका आणि युरोप यांमध्ये घडतांना दिसून येत आहे. साम्यवाद्यांच्या नियोजननानुसार पाश्चात्त्यांची कौटुंबिक व्यवस्था नष्ट झाली आहे. हे आपोआप घडले नाही, तर ते त्यांनी नियोजनपूर्वक केले आहे. यावर त्यांचे सतत १०० हून अधिक वर्षे सौम्य विषासारखे काम चालू आहे. पाश्चात्त्य संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तेथील कुटुंबवाद तर जवळजवळ नष्ट झालेलाच आहे. साम्यवाद्यांनी हे उघडपणे लिहून ठेवले होते आणि ते त्यांनी करून दाखवले. त्यामुळे भारताला अतिशय सावध होणे आवश्यक आहे; कारण त्यांचे नंतरचे लक्ष्य हे भारत आहे. पूर्वी भारतात ज्या प्रकारे असहिष्णुततेचे वातावरण निर्माण करण्यात आले होते, त्यामागे ही सर्व विचारसरणी होती.
‘ज्या देशाला नष्ट करायचे आहे, त्या देशात नवनवीन संघर्ष बिंदू निर्माण करा, जे संस्कृतीच्या आधारावर असेल’, ही त्यांची विचारसरणी आहे. हिंदु धर्म हा संस्कृतीचा एक मोठा आधार आहे. आतापर्यंत केवळ हिंदु धर्मामुळे भारतीय संस्कृती टिकून आहे. त्यामुळे ते हिंदु धर्माला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे ते हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी संघर्षाचे नवनवीन बिंदू निर्माण करत असतात. ते ‘फॅनॅटिक’ पद्धतीने (एकच ध्येय ठेवून काम करणे) काम करतात, त्यांचे एकच ध्येय ठरलेले असते. त्याखेरीज दुसरा विचार ते करत नाहीत. १०० वर्षे त्यांनी पाश्चात्त्य देशांत करून दाखवले आणि आपल्याकडेही त्यांना करायचे आहे.
८. साम्यवादाला प्रत्युत्तर देण्यात हिंदु असमर्थ
या लेखात म्हटल्याप्रमाणे त्यांनी वर्ष १९२० च्या दशकात या सांस्कृतिक साम्यवादाच्या वातावरणाचा प्रारंभ केला होता. त्यांच्याकडे १०० वर्षांचा अनुभव आहे आणि या १० वर्षांत हिंदू आता कुठे जागृत झाले आहेत. या १० वर्षांतही ‘इकोसिस्टम’ कशी सिद्ध करायची किंवा ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) कसे सिद्ध करावे, यांविषयी आपले विचार फार विकसित झालेले नाहीत आणि त्याविषयी फार प्रयत्नही झाले नाहीत. ते असे कसे करू शकतात ?, त्याचे तंत्रज्ञान काय आहे ?, त्याची कार्यप्रणाली काय आहे ?, हे आपण अद्याप समजू शकलेलो नाही. त्यांनी हे एवढ्या चतुराईने केले की, तुम्ही दंग रहाल. अमेरिकेतील ‘फ्रँकफर्ट स्कूल’मधील चमूला हिटलरने जर्मनीतून हाकलून लावले होते. त्यानंतर ते अमेरिकेच्या कोलंबिया विश्वविद्यालयात घुसले. तेथून ते सर्व विश्वविद्यालयांमध्ये पसरले. त्या सर्व विश्वविद्यालयांवर त्यांनी त्यांचे वैचारिक नियंत्रण मिळवले. त्यामुळे शिक्षणक्षेत्र पूर्णपणे त्यांच्या कह्यात गेले.
९. अमेरिकेत साम्यवादाचे सर्व क्षेत्रावर वैचारिक नियंत्रण
‘अमेरिकेत साम्यवाद नाही’, हा चुकीचा विचार होता. त्यांनी अमेरिकेतील शिक्षणक्षेत्र काबीज केले. त्यानंतर त्यांनी शिक्षकांना प्रशिक्षण देणार्या ‘डी.एड्.’, ‘बी.एड्.’ ‘एम्.एड्.’ यांसारख्या संस्थांवर नियंत्रण मिळवले. त्यांनी शिकवलेले शिक्षक शाळा, महाविद्यालये आणि विश्वविद्यालये यांमध्ये गेले. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या निघाल्या. त्यांचा त्यांनी संपूर्णपणे बुद्धीभेद (ब्रेनवॉशिंग) केलेला होता.
वर्ष १९६० मध्ये अमेरिकेत साम्यवाद्यांचे एक मोठे विद्यार्थी आंदोलन झाले. या आंदोलनाचे मार्गदर्शक होते आणि ते ‘फ्रँकफर्ट’चे प्राध्यापक होते, जे १९३६ मध्ये अमेरिकेत स्थायिक झाले. वर्ष १९६० पर्यंत त्यांनी अमेरिकेतील विद्यार्थ्यांच्या डोक्यांमध्ये संपूर्णपणे वैचारिक नियंत्रण मिळवले. ते या हिंसाचारग्रस्त विद्यार्थी क्रांतीचे वैचारिक मार्गदर्शक होते. ही क्रांती संपल्यावर विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले, तेव्हा ते अमेरिकेच्या विविध क्षेत्रांमधील पदांवर जाऊन बसले. कुणी प्रसारमाध्यमे, हॉलीवूड (अमेरिकन चित्रपटसृष्टी), न्यायव्यवस्था, कुणी प्रशासकीय व्यवस्थेत गेले. अशा पद्धतीने त्यांनी सर्व क्षेत्रावर वैचारिकदृष्ट्या नियंत्रण मिळवले आणि त्यांची ‘इकोसिस्टम’ सिद्ध केली. यावरून लक्षात येते की, ते किती पद्धतशीरपणे काम करत आहेत. आम्ही भारतात अशा प्रकारचे काहीही करत नाही. आपल्याला ‘इकोसिस्टम’ कशी उभी करायची, हेच माहिती नाही. आपण निवडणुका जिंकू शकतो, सभ्यतेची पुनरावृत्ती (सिव्हिलायझेशन रिसर्झन) करू शकतो; पण एक कथानक (नॅरेटिव्ह) कसे बनवायचे, हे जाणत नाही.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. अभिजीत जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्मावरील विविध बिंदूंवर आक्रमण करू पहाणार्या साम्यवादाला हिंदूंनी संघटितपणे विविधांगी प्रतिकार करणे आवश्यक ! |
याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/846134.html