‘नवरात्रीत देवीमातेची शक्ती अधिक कार्यरत असते. त्या ९ दिवसांत आपण जेवढी अधिक भक्ती करू, तेवढी देवीमाता अधिक प्रसन्न होते. देवीला प्रसन्न करण्यासाठी ठिकठिकाणी गरबा नृत्य केले जाते आणि दांडिया रास खेळला जातो. ९ ऑक्टोबर या दिवशीच्या लेखात ‘गरबा नृत्याचे महत्त्व, त्याचे लाभ, तसेच पारंपरिक गरबा आणि सध्याचा गरबा यांतील भेद’ इत्यादी सूत्रे पाहिली. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/842131.html
६. रास आणि गरबा यांमधील भेद
‘रास म्हणजे रासलीला. ही भगवान कृष्णाशी संबंधित असते, तर गरबा हे नृत्य दुर्गादेवीमातेशी संबंधित असते. ‘देवीची भक्ती करून तिला प्रसन्न करणे’, हाच गरब्याचा एकमेव उद्देश असतो. २ – ४ महिला मिळून गीत गात गरबा खेळतात. या वेळी कृष्णलीलेची गाणीही म्हटली जातात.
७. दांडिया खेळतांना जाणवलेली सूत्रे
दांडिया खेळत असतांना मला जाणवते, ‘देवीच्या कृपेने माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत आणि माझ्या मनातील दुष्ट विचारांचा नाश होत आहे.’
८. नृत्य करणार्याचा पोषाख आणि अलंकार
८ अ. पोशाख : घागरा आणि चोळी परिधान करून गरबा खेळल्यास देवीप्रती भाव निर्माण होतो किंवा भाव जागृत होतो, तसेच गरबा एका लयीत खेळला जातो. त्यामुळे आपले शरीर पुष्कळ हलके होते आणि आपल्याला चारही बाजूंनी देवीचे दर्शन होते. आपल्या मनात सात्त्विक विचार येतात. घागरा आणि चोळी परिधान करून गोल फिरतांना ‘आपण संपूर्ण ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालत आहोत’, असे आपल्याला जाणवते. चित्रविचित्र नक्षी असलेली किंवा असात्त्विक वस्त्रे परिधान करून गरबा खेळल्यास एका लयीत खेळता येत नाही आणि मनात ‘डिस्को’ किंवा वेगळ्या प्रकारे नृत्य करण्याचे वाईट विचार येतात.
८ आ. अलंकार
८ आ १. हार : गळ्यात हार किंवा कुठलाही अलंकार घातल्यावर आपल्या कंठातून मधुर आवाज येतो आणि सत्य बोलले जाते. गळ्यात हार न घातल्यास गाण्याची इच्छा होत नाही आणि अनावश्यक बोलले जाते.
८ आ २. मेखला : कमरेवर मेखला घातल्यावर कमरेच्या वेदना जाणवत नाहीत. मेखला न घातल्यास कमरेच्या वेदना वाढतात.
८ आ ३. काकण (बांगड्या) : गरबा खेळतांना बांगड्या घातलेल्या हातांनी टाळी वाजवल्यास टाळी आणि बांगड्या यांचा एकत्रितपणे सुंदर आवाज येतो अन् टाळी एका लयीत वाजते. बांगड्या न घातल्यास टाळीची लय चुकते आणि नाद व्यवस्थित येत नाही, तसेच टाळीही व्यवस्थित वाजत नाही.
९. गरब्याचे गीत गात गरबा नृत्य केल्यावर जाणवलेली सूत्रे
९ अ. भावजागृती होणे : गरब्याचे गीत गात गरबा खेळण्यामुळे आपला देवीप्रतीचा भक्तीभाव पुष्कळ वाढतो. त्यामुळे आपल्यामध्ये भावजागृती होऊन आपल्याला देवीचे दर्शनही होते. काही गायकांनी सात्त्विक गीते गायलेल्या ध्वनीफिती (कॅसेट) आणि ध्वनीचित्रफितीही उपलब्ध आहेत. त्यामध्ये काही सुंदर गरबा नृत्ये आहेत. जेव्हा सर्व जण पेटी (हार्मोनियम), तबला, मंजिरी अशी सात्त्विक वाद्ये वाजवतात, तेव्हा त्या नादांतून एक वेगळ्याच प्रकारची भावजागृती होते. गरबा खेळतांना आपण आपापसांत बोलत असल्यास आपल्याला देवीचे अस्तित्व जाणवत नाही.
९ आ. दैवी शक्ती मिळाल्याचे जाणवणे : मी जेव्हा गीत गात गरबा खेळते, तेव्हा मला एक वेगळीच शक्ती शरिरात जाणवते. एकापाठोपाठ ४ – ५ वेळा गरबा गीत गात जलद गतीने खेळल्यानंतरही मला थकल्यासारखे वाटत नाही. त्या वेळी ‘जणू दैवी शक्ती साहाय्य करत आहे’, असे मला जाणवते.
१०. सध्या आधुनिकतेच्या नावाखाली गरबा नृत्याचे पावित्र्य नष्ट होणे
सध्या पारंपरिक पद्धतीने सात्त्विक पोशाख घालून गरबा खेळला जात नाही. लोक मनात येईल, तसे नृत्य करतात. ते एका लयीत नृत्य करत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या नृत्यमुद्रा दाखवण्यासाठी विचित्र नृत्य करतो. कोणी पारंपरिक नृत्य केले, तर ‘जुनाट पद्धत’ म्हणून त्यांना हसतात. आज समाजात जो गरबा खेळला जातो, त्यात सात्त्विकता नसते. सध्या गरबा नृत्य करतांना तरुणी संपूर्ण पाठ उघडी ठेवलेली चोळी घालतात, तर काही तरुणी आधुनिकतेच्या नावाखाली जीन्स पँटवर चोळी घालतात आणि वरून ओढणी घेतात, तसेच वरती घोळ अन् खाली निमुळती होत जाणारी पँट आणि त्यावर चोळी परिधान करतात. या पोषाखांत सात्त्विकता नसते.
वरील लेखातून पारंपरिक नृत्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि लाभ लक्षात येतात. सध्याच्या गरब्यामुळे होणारी हानी जाणा अन् पारंपरिक गरबा नृत्य करून सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती घ्या !
(समाप्त)
– सौ. नीता मनोज सोलंकी, मडगाव, गोवा. (१७.९.२०२४)