Yati Narsinghanand यांनी महंमद पैगंबर यांच्‍याविषयी विधान केल्‍याने उत्तरप्रदेशात मुसलमानांकडून निदर्शने

  • काही ठिकाणी केली दगडफेक

  • गाझियाबादच्‍या डासना मंदिराला मुसलमानांनी घातला घेराव

महामंडलेश्‍वर यती नरसिंहानंद

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्‍ये डासना मंदिरातील जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर यती नरसिंहानंद यांनी महंमद  पैगंबर यांच्‍यावर केलेल्‍या विधानावरून उत्तरप्रदेशात मुसलमानांनी ठिकठिकाणी रस्‍त्‍यावर उतरून निदर्शन केली, तर काही ठिकाणी दगडफेकही करण्‍यात आली. सहस्रो मुसलमानांनी डासना मंदिराबाहेर गोळा होऊन निदर्शने केली. मध्‍यरात्री पोलिसांनी या गर्दीला पांगवले. मेरठ आणि मथुरा येथेही मुसलमानांकडून निदर्शने करण्‍यात आली. या वेळी पोलिसांनी संचलन केले. या घटनांनंतर पश्‍चिम उत्तरप्रदेशात अतीदक्षतेची चेतावणी देण्‍यात आली आहे. बुलंदशहर येथील सिकंदराबाद पोलीस ठाण्‍याबाहेर मुसलमानांनी शुक्रवारच्‍या नमाजानंतर गदारोळ केला. या वेळी ‘सर तन से जुदा’च्‍या (शिरच्‍छेदाच्‍या) घोषणा देण्‍यात आल्‍या. या वेळी पोलिसांनी काही जणांना पकडून पोलीस ठाण्‍यात नेले. याचा राग म्‍हणून सायंकाळी गड्डीवाड परिसरात पोलिसांवर दगडफेक करण्‍यात आली.

यती नरसिंहानंद यांनी ६ दिवसांपूर्वी गाझियाबादमधील एका कार्यक्रमात महंमद पैगंबर यांच्‍याविषयी विधान केले होते. हे विधान आक्षेपार्ह आहे, असा आक्षेप घेत मुसलमानांनी गाझियाबाद येथे पोलिसांत तक्रार केल्‍यानंतर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला, तर दुसरा गुन्‍हा महाराष्‍ट्रातील ठाणे जिल्‍ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्‍यात नोंदवण्‍यात आला.

संपादकीय भूमिका

महंमद पैगंबर यांच्‍याविषयी विधान केल्‍यावर मुसलमान तात्‍काळ रस्‍त्‍यावर येतात; मात्र धर्मांध मुसलमान जेव्‍हा एखाद्या ठिकाणी हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे करतात, तेव्‍हा देशातील अन्‍य ठिकाणचे हिंदू निष्‍क्रीय रहातात !