अष्टलक्ष्मींचे स्वरूप असल्याची अनुभूती देणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘लक्ष्मीमातेच्या कृपेनेच मनुष्याला धन, वैभव आणि सुखसंपदा यांची प्राप्ती होते. लक्ष्मीच्या ८ वेगवेगळ्या रूपांना ‘अष्टलक्ष्मी’, असे म्हणतात. ‘आदिलक्ष्मी’, ‘धनलक्ष्मी’, ‘विद्यालक्ष्मी’, ‘धान्यलक्ष्मी’, ‘धैर्यलक्ष्मी’, ‘संतानलक्ष्मी’, ‘विजयलक्ष्मी’ आणि ‘राजलक्ष्मी’, या अष्टलक्ष्मी आहेत. अष्टलक्ष्मींच्या आराधनेने मनुष्याच्या सर्व समस्यांचा नाश होतो आणि त्याला समृद्धी, धन, यश, ऐश्वर्य अन् संपन्नता प्राप्त होते. दि. २६.९.२०२४ या दिवशीच्या भक्तीसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अष्टलक्ष्मींचा महिमा सांगितला; परंतु अष्टलक्ष्मींच्या या आठ रूपांचे आध्यात्मिक रहस्य, तसेच ‘ही आठही तत्त्वे त्यांच्यामध्येच (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये) कार्यरत असल्याची अनुभूती मला कशी घेता आली ?’, हे मी कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणकमली समर्पित करत आहे.


या वर्षीच्या नवरात्रीमध्ये ७.१०.२०२४ या दिवशी भक्तीसत्संगाला ८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आपल्या दिव्य, मधुर आणि चैतन्यमय वाणीद्वारे साधकांना प्रतिसप्ताह भक्तीसत्संगरूपी भक्तीप्रसाद प्रदान करणार्‍या अष्टलक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

 

१. आदिलक्ष्मी

‘आपण कोण आहोत ? आपण या पृथ्वीतलावर का आलो आहोत ? मृत्यूनंतर आपण कुठे जाणार ?’, अशा प्रकारे आपल्या मूळ स्रोताचे ज्ञान होणे’, हीच ‘आदिलक्ष्मी’ होय ! सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार गुरुकृपायोगानुसार साधना करत असतांना प्रत्येक साधकाला ज्या साधनेविषयी अखंडपणे दिशादर्शन करतात, त्याच ‘आदिलक्ष्मी’स्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आहेत.

२. धनलक्ष्मी

महालक्ष्मी ही धनसंपत्तीची देवी आहे; म्हणून तिला ‘धनलक्ष्मी’ म्हणतात. ‘आपल्याकडे असलेले धन हा या ‘धनलक्ष्मी’चाच प्रसाद आहे’, या भावाने आपण तिचा सन्मान आणि सदुपयोग केला, तरच धनलक्ष्मी आपल्याकडे स्थिर होते. मायेतील अशाश्वत धनाच्या आसक्तीत न अडकता आध्यात्मिक गुणरूपी धन कमवायला जी शिकवते, ती ‘धनलक्ष्मी’ म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आहेत.

३. विद्यालक्ष्मी

सौ. वैष्णवी बधाले

विद्या आणि ज्ञान देणारे लक्ष्मीचे रूप, म्हणजे ‘विद्यालक्ष्मी’ ! विद्या आणि ज्ञान यांमुळेच जीवनात स्थिरता येते. शिक्षण ही खरी विद्या नाही, तर ‘आपण जे शिकतो, ते आचरणात आणणे’, ही खरी विद्या आहे. तसे केल्यानेच आपल्याला ‘विद्यालक्ष्मी’चा आशीर्वाद प्राप्त होतो. महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ सर्व साधकांना ‘प्रत्येक सेवा योग्य प्रकारे आणि परिपूर्ण कशी करायची ?’, हे स्वतःच्या आचरणातून शिकवतात. सेवा भावपूर्ण अणि परिपूर्ण करून ती गुरुचरणी रुजू करण्याची विद्या (आशीर्वाद) ज्या आपल्याला प्रदान करतात, त्या आहेत ‘विद्यालक्ष्मी’रूपी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ !

४. धान्यलक्ष्मी

धान्य म्हणजे अन्न ! आपल्याकडे धन आहे; परंतु धान्य नसेल, तर आपण जिवंत कसे रहाणार ? यावरून ‘धान्यलक्ष्मी’ची जीवनातील आवश्यकता आपल्या लक्षात येते. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ असतांना साधकांच्या आध्यात्मिक जीवनात कोणतीच उणीव भासणार नाही’, याची आम्हा साधकांची पूर्ण श्रद्धा आहे.

५. धैर्यलक्ष्मी

आपल्याकडे धन, धान्य, संपन्नता इत्यादी सर्वकाही आहे; पण धैर्य नाही, तर जीवनातील कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्याचे बळ आपल्यात रहात नाही. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी जीवनातील अनेक कठीण प्रसंगांचा सामना धैर्याने करून त्यांवर मात केली आहे; म्हणूनच जेव्हा साधक त्यांच्याकडे स्वतःच्या साधनेतील अडचणी घेऊन येतात, तेव्हा त्या साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देतात आणि स्वभावदोष अन् अहं यांच्यावर धैर्याने मात करायला शिकवतात. अशा प्रकारे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या रूपात ‘धैर्यलक्ष्मी’ची अनुभूती घेता येते.

६. संतानलक्ष्मी

जिच्या कृपेने सुख, समृद्धी आणि शांती देणारे संतान प्राप्त होते, ती म्हणजे ‘संतानलक्ष्मी’ होय ! आपणही त्या लक्ष्मीचीच संतती आहोत. सनातनच्या प्रत्येक साधकाला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ अपार वात्सल्याने, प्रीतीने आणि मायेने जपतात. साधकांना ती आपली मायमाऊलीच वाटते; म्हणूनश्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ या आमच्या ‘संतानलक्ष्मी’ आहेत.

७. विजयलक्ष्मी

आपल्या सर्वांचा जन्म ईश्वरप्राप्तीचे महान ध्येय प्राप्त करण्यासाठीच झाला आहे. जेथे ईश्वराचे अधिष्ठान असते, तेथे विजय निश्चितच असतो; कारण ईश्वराचेच दुसरे नाव ‘यश’ किंवा ‘विजय’ आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा जन्म ईश्वरी कार्यासाठीच झाला असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यात यश आणि विजय आहे. अशा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आपल्यासाठी ‘विजयलक्ष्मी’च आहेत.

८. राजलक्ष्मी

राजाने यशस्वीपणे राज्य करण्यासाठी त्याच्या पाठीशी ‘राजलक्ष्मी’ असावी लागते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे संपूर्ण विश्वावर आध्यात्मिक अधिपत्य आहे, म्हणजेच ते विश्वाचे आध्यात्मिक राजा आहेत आणि त्यांच्या कार्यात सहकार्य देण्यासाठी आलेली राजलक्ष्मी, म्हणजेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आहेत.

एखाद्याकडे अष्टलक्ष्मी, म्हणजे ‘आठ लक्ष्मी’ नसणे, यालाच ‘अष्ट दारिद्र्ये’, असे म्हणतात. साधकांच्या आध्यात्मिक जीवनातील ‘अष्ट दारिद्र्ये’ नष्ट करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी या अष्टलक्ष्मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या रूपात अवतरल्या आहेत, हेच खरे !

साधकांनो, ‘नवरात्रीच्या आधी साक्षात् अष्टलक्ष्मीच श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या रूपात आपल्यासाठी अवतरल्या आहेत’, या भावाने त्यांच्यातील अष्टलक्ष्मीतत्त्वाला अनन्यभावाने कोटी कोटी वंदन करूया !’

– सौ. वैष्णवी अमोल बधाले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.९.२०२४)


प्रीती हा स्थायीभाव असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

सौ. अरुणा तावडे यांना जवळ घेतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये प्रीती ओतप्रोत आहे. याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणतात, ‘‘वात्सल्यभावाने ओतप्रोत असलेल्या सौ. बिंदाताई यांनी साधकांवर आईच्या मायेने केलेले प्रेम आणि साधनेत प्रगती होण्यासाठी केलेले साहाय्य शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.’’

 

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक