सुतारवाडी (पुणे) येथील कब्रस्‍तानातील अवैध बांधकामावर महापालिकेची कारवाई !

‘सुतारवाडी नागरिक कृती समिती’च्‍या लढ्याला यश !

बांधण्‍यात आलेली अवैध मशीद

पुणे – पाषाण सुतारवाडी येथील कब्रस्‍तानमध्‍ये अवैधरित्‍या बांधण्‍यात आलेली मशीद पुणे महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई करून नुकतीच पाडली. मशीद पाडतांना पाषाण कॉसमॉस बँक ते सुतारवाडी गिरीराज चौकापर्यंत सर्व रस्‍ते बंद करण्‍यात आले होते. तेथे मोठा पोलीस बंदोबस्‍तही ठेवण्‍यात आला होता.

मुसलमानांच्‍या कब्रस्‍तानाचा वापर केवळ मृतदेहांचे दफन करण्‍यासाठी केला जावा, असा सरकारी नियम असूनही त्‍या ठिकाणी धार्मिक कार्य केले जात होते. त्‍या विरोधात ‘सुतारवाडी नागरिक कृती समिती’ आणि ‘सकल हिंदु समाज’ यांच्‍या वतीने वेळोवेळी महापालिका आयुक्‍त आणि पोलीस आयुक्‍त यांच्‍याकडे मागणी करण्‍यात येत होती. (अशी मागणी का करावी लागते ? महापालिका स्‍वत:हून कारवाई का करत नाही ? – संपादक)

मशीद पाडून रिकामी केलेली जागा

अनेक वर्षांपूर्वी कब्रस्‍तानमध्‍ये मशीद बांधून तेथे नमाजपठण केले जात होते. तेथे नमाजपठणासाठी येणार्‍या लोकांचा त्रास ग्रामस्‍थांना होत होता. या कब्रस्‍तानाच्‍या शेजारी हिंदूंची स्‍मशानभूमी आहे. त्‍यांचा त्रास हिंदूंना होत होता. यामुळेच तेथे बांधलेली अवैध मशीद पाडण्‍यात यावी, अशी मागणी ‘सुतारवाडी नागरिक कृती समिती’ने केली होती.

संपादकीय भूमिका

अवैध मशीद बांधण्‍यात येईपर्यंत महापालिका झोपली होती का ? अशा अवैध मशिदींवर कारवाई होण्‍यासाठी लोकांना लढा का द्यावा लागतो ?