Noida Temple Bell Pollution Notice : मंदिरातील घंटेचा आवाज न्‍यून करण्‍याच्‍या उत्तरप्रदेश प्रदूषण मंडळाच्‍या नोटिसीला विरोध झाल्‍यावर मंडळाने नोटीत घेतली मागे !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील गौर सौंदर्यम् सोसायटीमधील घटना

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील एका रहिवासी सोसायटीच्‍या अंतर्गत असणार्‍या मंदिरातील घंटेचा मोठ्याने आवाज येत असल्‍याने उत्तरप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने या सोसायटीला नोटीस बजावून आवाज न्‍यून करण्‍यास सांगितले होते. त्‍यानुसार सोसायटीने  व्‍हॉट्‍सअ‍ॅप आणि फलक यांद्वारे सूचना प्रसारित केली होती; मात्र यामुळे लोक संतप्‍त झाले आणि त्‍यांनी याला विरोध केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या विरोधात सामाजिक माध्‍यमांतून प्रसार केल्‍यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने घंटेचा आवाज न्‍यून करण्‍याचा आदेश मागे घेतला. हे प्रकरण ग्रेटर नोएडाच्‍या गौर सौंदर्यम् सोसायटीमध्‍ये घडले. येथे ‘हरे रामा हरे कृष्‍णा’ मंदिर बांधण्‍यात आले आहे.

मंदिरातील घंटेच्‍या आवाजाविषयी आलेल्‍या तक्रारीनंतर प्रदूषण मंडळाने घंटेचा आवाज पडताळला असतो तो ७२ डेसिबल आढळून आला. नियमानुसार तो ५५ डेसिबल असणे अपेक्षित आहे. त्‍यानंतर मंडळाने नोटीस बजावली होती.

संपादकीय भूमिका

ध्‍वनीप्रदूषण कुठेही होऊ नये. जर कुठे होत असेल, तर त्‍याच्‍यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी; मात्र अशी कारवाई सर्वत्र झाली पाहिजे. मशिदी सोडून केवळ मंदिरांवर कारवाई होत असेल, तर तो अन्‍याय होईल !