संत आणि महर्षि करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील साहाय्यामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

पूर्वीचा भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/808103.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अनेक संतांनी केलेले साहाय्य !

३ इ. बेंगळुरू, कर्नाटक येथील पू. सुमतीअक्का अखिल जगतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे सुलभ व्हावे, यासाठी देहत्याग करून पाताळात जाऊन अनिष्ट शक्तींना नष्ट करण्यास सिद्ध असणे

वर्ष २०१५ मध्ये बेंगळुरू, कर्नाटक येथील स्त्री संत पू. सुमतीअक्का रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आल्या होत्या. बोलता बोलता त्यांनी मला सांगितले,

पू. सुमतीअक्का : ३ मासांनंतर मी देहत्याग करणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्याला आता हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे. यासाठी आम्हाला संतांचे आशीर्वाद आणि दिशादर्शन पाहिजे. आपण देहत्याग का करत आहात ?

पू. सुमतीअक्का : पृथ्वीवर असुरांच्या कृत्यांमुळे अधर्म वाढतो. तेव्हा भगवान श्रीविष्णु स्वतः अवतार घेऊन पृथ्वीवर येतो आणि असुरांशी (सूक्ष्मातून) युद्ध करतो. ईश्वरी राज्याची स्थापना करण्याच्या उद्देशाने पूर्वीच्या काळात, रामराज्यासाठी श्रीराम, त्यानंतर श्रीकृष्ण यांच्यासारखे अवतार झाले. भगवान श्रीविष्णूचे दहा अवतार झाले. त्या अवतारांनी हेच कार्य केले आहे. भगवान श्रीविष्णु विष्णुलोकात राहून पृथ्वीवरील कार्य करत नाही. तो स्वतः पृथ्वीवर अवतार घेतो. आता सहाव्या आणि सातव्या पाताळांतील अनिष्ट शक्ती पृथ्वीवर आक्रमणे करतील ! या आक्रमणांच्या वेळी मी पृथ्वीवर राहून देह धारण करून त्यांच्याशी लढू शकते का ? मी देहत्याग केला, तर सूक्ष्मातून पाताळात जाऊन लढीन आणि त्या अनिष्ट शक्तींना नष्ट करीन. त्यामुळे आपल्याला संपूर्ण जगात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे सोपे होईल.

वर्ष २००२ पासून अनिष्ट शक्तींशी आपले सूक्ष्मातील युद्ध चालले आहे. आरंभी पहिले पाताळ, नंतर दुसरे पाताळ येथील अनिष्ट शक्तींशी युद्ध करून त्यांना पराभूत करत आपण आता सहाव्या पाताळापर्यंत पोचलो आहोत. त्या स्त्री संतांची भाषासुद्धा अशीच होती, जसे मी आता सांगितले. संतांना सूक्ष्मातील सर्व गोष्टी ठाऊक असतात.

हे अध्यात्माचे महत्त्व आहे. त्या संतांनी केवळ भारतातच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार न करता संपूर्ण जगताचा विचार केला होता ! कार्यकर्त्यांकडून होणारे हिंदुत्वाचे कार्य म्हणजे संतांच्या कार्याचा विचार करता जणू लहान मुलांचा एक खेळच आहे. या कार्याच्या माध्यमातून साधना करून कार्यकर्त्यांनी स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे.

४. ईश्वरी नियोजनानुसार नाडीपट्ट्यांद्वारे महर्षींचे मार्गदर्शन मिळून आध्यात्मिक स्तरावर साहाय्य होऊ लागणे

अध्यात्मात जे आपल्या पुढे असतात, त्यांना विचारून सर्व करायला पाहिजे. आम्हीही इतरांना विचारून कार्य करतो. त्यामुळे मोठमोठे संत आम्हाला साहाय्य करतात. आता आमच्या जीवनात महर्षीसुद्धा आले आहेत. महर्षींनी सहस्रो वर्षांपूर्वी भविष्यातील घटनांविषयी जे सांगितले होते, ते वेगवेगळ्या नाडीपट्ट्यांमध्ये लिहून ठेवलेले आहे. नाडीपट्टी वाचून नाडीपट्टीचे वाचक आम्हाला त्याविषयी सांगतात. महर्षि आम्हाला नाडीपट्टीद्वारे मार्गदर्शन करतात, ‘हा यज्ञ करा. हे अनुष्ठान करा किंवा अमुक ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी जा.’ आम्ही महर्षींच्या आज्ञेनुसार सर्व कृती करतो.

तिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथील सप्तर्षी जीवनाडी-पट्टीचे नाडीवाचक, होशियारपूर (पंजाब) येथील भृगु संहितेचे नाडीवाचक आणि पुणे (महाराष्ट्र) येथील अत्रि संहितेचे नाडीवाचक हे तिघेही एकमेकांना ओळखत नाहीत; परंतु या तिन्ही नाडीपट्ट्यांमध्ये असे लिहिले होते की, ‘या विशिष्ट दिवशी आपल्याला गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात जायचे आहे.’ ईश्वराचे हे नियोजन मनुष्याच्या अल्प मतीला कसे समजणार आहे ?

(समाप्त)