संत आणि महर्षि करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील साहाय्यामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. अखिल ब्रह्मांडाची निर्मिती करण्यासाठी ईश्वराचा केवळ संकल्प पुरेसा असणे

‘आध्यात्मिक स्तरावर कार्य कसे होते ?’, हे समजून घेऊया. ईश्वराने अनंत कोटी ब्रह्मांडे निर्माण केली आहेत. ‘ईश्वराने एक-एक दगड बनवला आणि नंतर त्यापासून पर्वत निर्माण केला’, असे थोडेच आहे ? ईश्वराने केवळ संकल्प केला, ‘एकोऽहम् । बहु स्याम् ।’ म्हणजे ‘मी एक आहे आणि मी अनंत रूपांमध्ये प्रकट हाेईन.’ त्यानंतर अखिल ब्रह्मांडाची निर्मिती झाली.

प.पू. नाना (नारायण) काळेगुरुजी

२. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात संतांचे महत्त्व

२ अ.   ७० टक्के आध्यात्मिक पातळी असलेले संत : जेव्हा व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ७० टक्के होते, तेव्हा ती व्यक्ती संतपद प्राप्त करते. असे संत जेव्हा ईश्वराला प्रार्थना करतात, तेव्हा ईश्वर त्यांची प्रार्थना ऐकतो; कारण ते संत ईश्वरी अनुसंधानात असतात.

२ आ.   ८० टक्के आध्यात्मिक पातळी असलेले संत : यांना प्रार्थना करावी लागत नाही. त्यांच्या मनात ‘असे व्हायला हवे, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला हवी’, आदी विचार येतात आणि हा त्यांचा संकल्प फलद्रूप होऊन प्रत्यक्षात तसे घडू लागते.

२ इ.   ९० टक्के आध्यात्मिक पातळी असलेले संत : यांना संकल्पसुद्धा करावा लागत नाही. त्यांच्या केवळ अस्तित्वानेच कार्य होते, उदा. प्रतिदिन सूर्य उगवतो. तो सर्वांना सांगत नाही की, ‘मी आलो आहे. आता उठा !’ सूर्याच्या अस्तित्वानेच पशू-पक्षी, संपूर्ण मानवजात आदी सर्व जागे होतात. फुलांमध्ये मध असतो आणि मधाच्या केवळ अस्तित्वानेच फुलपाखरे आपोआप फुलांजवळ येतात. फुलांना फुलपाखरांना बोलवावे लागत नाही. संतांचे कार्यही असेच असते.

९० टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या केवळ अस्तित्वानेच पृथ्वी आणि मानवजात यांचे अनिष्ट प्रारब्ध नष्ट होते.

३. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अनेक संतांनी केलेले साहाय्य !

३ अ. बार्शी (सोलापूर) येथील प.पू. कै. अश्वमेधयाजी नाना (नारायण) काळेगुरुजी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन अश्वमेध यज्ञाचा संकल्प करणे : रामनाथी (गोवा) येथील आश्रमात बार्शी (जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र) येथील अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांनी ‘अश्वमेध यज्ञाचा संकल्पविधी’ केला. खरेतर माझा त्यांच्याशी कोणताच परिचय नव्हता. एकदा मला त्यांचा दूरभाष आला, ‘‘मी नाना काळे बोलत आहे. गोव्यातील तुमच्या आश्रमात अश्वमेध यज्ञ करायचा आहे.’’ त्यांनी तो संकल्पविधी केला.

अशा प्रकारे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक संत आपापल्या परीने पुष्कळ कार्य करत आहेत आणि त्यांच्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे. साधक प्रयत्न करत आहेत. साधकांनी केलेले कार्य शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवरचे आहे. प्रत्यक्षात हे कार्य आध्यात्मिक स्तरावर व्हायला पाहिजे.

(क्रमश:)

पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/808103.html