चिपळूण ते डेरवण रुग्णालयापर्यंत रुग्णांसाठी विनामूल्य बससेवा चालू

चिपळूण – तालुक्यातील डेरवण येथील रुग्णालयांत रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना डेरवण येथे येणे सोपे व्हावे आणि अधिकाधिक सामान्य लोकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, या करता रुग्णालय प्रशासनाने चिपळूण येथून विनामूल्य बससेवा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विनामूल्य बस सेवेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

डेरवण रुग्णालय अनेक रुग्णांचा आधार बनले आहे. एकाच रुग्णालयात रुग्णाला एक्स रे, एम्.आर्.आय., सीटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी आणि सर्व वैद्यकीय अधिकारी यांची भेट एकाच दिवशी घेता यावी, रुग्णांचा वेळ वाचवा, तसेच रोगाचे लवकर निदान व्हावे, जेणेकरून आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच योग्य उपचार मिळावेत, हा हेतू ठेवून रुग्णालय प्रशासनाने विनामूल्य बस सेवेचा निर्णय घेतला आहे.

चिपळूण-खेड परिसरातील लोकांची सोय व्हावी; म्हणून किरकोळ आजारांकरता चिपळूण बहादुरशेख नाका येथेही वर्ष २०१५ मध्ये रुग्णालयाची एक शाखा उभारली गेली. तेथे प्राथमिक तपासणी आणि आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी विवीध तज्ञ डॉक्टरांची भेट, एक्स रे रक्त तपासणीची सोयही करण्यात आली आहे. याचा लाभ अनेक रुग्ण घेत आहेत.

‘ही बस १५ जूनपासून चालू करण्यात आली आहे. आतापर्यंत ३८ रुग्ण आणि त्यांच्या ५४ नातेवाइकांनी या बसचा लाभ घेतला आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका सुवर्णा पाटील यांनी दिली.