श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी श्रीरामाचे भावपूर्ण चित्र काढून त्याच्या चरणी भक्ती अर्पण करणारी पुणे येथील कु. ईश्वरी दिपेंद्र रोडी (वय ११ वर्षे) !

‘श्रीरामाचे चित्र काढतांना कु. ईश्वरी दिपेंद्र रोडी हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्रीरामाचे मूळ चित्र आणि कु. ईश्वरी रोडी हिने काढलेले चित्र

१. श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ‘श्रीरामाचे सुंदर चित्र काढावे’, असे वाटणे

‘श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी माझ्या मनात ‘काहीतरी विशेष आणि वेगळे करून श्रीरामाच्या चरणी भक्ती अर्पण करावी’, असा विचार आला; पण ‘काय करावे ?’ ते मला सुचत नव्हते. मला चित्रकलेची आवड असल्याने ईश्वरीकृपेने ‘श्रीरामाचे एक सुंदर चित्र काढावे’, असे मला सुचले.

कु. ईश्वरी दिपेंद्र रोडी

२. चित्र काढतांना मनात नकारात्मक विचार आल्यावर श्रीरामाला प्रार्थना होणे त्यानंतर सुंदर चित्र काढता येणे

चित्र काढायला आरंभ केल्यावर माझ्या मनात नकारात्मक विचार येऊ लागले, ‘चित्र चांगले येणार नाही. माझ्याकडे मोठा कागद नाही. मला जमेल कि नाही ? इत्यादी.’ तेव्हा थोड्या वेळाने मी श्रीरामाला प्रार्थना केली, ‘तूच माझ्याकडून तुझे सुंदर चित्र काढून घे.’ माझी आई (सौ. योगिता दिपेंद्र रोडी) मला म्हणाली, ‘‘श्रीरामाला आर्ततेने प्रार्थना करून श्रीरामाचा नामजप करत चित्र काढ.’’ त्याप्रमाणे श्रीरामाचा नामजप करत मी माझ्याकडे असलेल्या श्रीरामाच्या एका चित्राप्रमाणे चित्र काढले. चित्र पूर्ण करण्यासाठी मला २ ते २.३० घंटे लागले. ते चित्र काढून पूर्ण झाल्यावर मला वाटले, ‘श्रीरामाच्या कृपेविना मी इतके सुंदर चित्र काढू शकले नसते.’

३. श्रीरामाचे चित्र काढतांना आलेल्या अनुभूती 

अ. श्रीरामाचे चित्र काढतांना मला उत्साह जाणवत होता आणि पुष्कळ आनंद मिळत होता.

आ. चित्र काढण्यात पूर्ण तल्लीन झाल्यामुळे मला तहान-भूक यांची जाणीवही झाली नाही.

इ. चित्र काढतांना माझा श्रीरामाचा नामजपही सतत होत होता.

‘हे प्रभु, गुरुदेवांनीच माझ्याकडून श्रीरामाचे चित्र काढून घेतले आहे आणि हीच माझी मोठी अनुभूती आहे.’

– कु. ईश्वरी दिपेंद्र रोडी (वर्ष २०१९ मध्ये आध्यात्मिक पातळी ५१ टक्के, वय ११ वर्षे), पुणे. (२२.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक