संपादकीय : हिंदुद्वेष्टेच निपजले !

अंगावर काटा आणणारी एक घटना नुकतीच एका व्हिडिओच्या माध्यमातून उघड झाली. हा व्हिडिओ तमिळनाडूतील असून त्यात काही लोक रस्त्याच्या मधोमध एक बकरा कापत होते. त्या बकर्‍याच्या गळ्यात तमिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे छायाचित्र बांधलेले होते. भाजपने या व्हिडिओच्या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे. अण्णामलाई यांनी या प्रकरणी ‘द्रमुक कार्यकर्त्यांना माझ्याविषयी पुष्कळ राग आहे’, असे मत व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अण्णामलाई यांचा पराभव झाला असून द्रमुक पक्षाचे गणपति राजकुमार विजयी झाले. विरोधकांनी घोषणा देत अण्णामलाई यांच्या पराभवाचा आसुरी आनंदच एक प्रकारे लुटल्याचे या व्हिडिओतून दिसते. अशा कृत्यातून विरोधकांनी स्वतःचीच हीन पातळी दर्शवली आहे. या माध्यमातून त्यांचा भाजपद्वेष, पर्यायाने हिंदुद्वेषच प्रकट होतो.

अण्णामलाई हे भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी होत. ‘दक्षिणेतील सिंघम्’ या नावाने त्यांना ओळखले जायचे. पोलीस सेवेतून नंतर ते राजकारणात आले. ते तरुण आणि तितकेच तडफदारही आहेत. काँग्रेसने कचाथीवू हे भारतीय बेट श्रीलंकेला दान केले होते. यासंदर्भातील जुनी कागदपत्रे अण्णामलाई यांनी शोधून काढली होती. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी भाजपसाठी ते शक्तीशाली सूत्र ठरले होते. अण्णामलाई यांचा पराभव होण्यासाठी विरोधक आटोकाट प्रयत्न करत होते. त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद व्हावा, यासाठीही प्रयत्न झाला. त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले; पण ते त्याला बधले नाहीत. त्यांच्याकडे ‘हिंदुत्वाचा चेहरा’ म्हणूनही पाहिले जाते. तमिळ संस्कृती आणि तिला विकासाची जोड या पार्श्वभूमीवरही त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. असे असतांना त्यांना पराभवाला सामोरे जावे लागणे, हा भाजपसाठी, पर्यायाने हिंदूंसाठी मोठा धक्का मानला जातो. जवळजवळ १ लाख मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. या आकड्याकडे थोडेथोडके म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही.

तमिळनाडूतील हिंदूंचे भवितव्य धोक्यात !

लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतातील तमिळनाडूमध्ये भाजपला एकही खासदार मिळाला नाही. खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा तेथेही झाला होता. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात प्रचारही करण्यात आला; परंतु भाजपला त्याचा काडीमात्र लाभ झाला नाही, असेच निकालावरून दिसून येते. राज्यातील ३९ जागांपैकी भाजपला एकही जागा जिंकता न येणे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. याचा तेथील हिंदूंनी गांभीर्याने विचार करायला हवा. ‘तमिळनाडूत कुणाला संपवायचे असेल, तर ते द्रमुकला (द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)’, असे विधान अण्णामलाई यांचे ! ‘द्रमुकमधील ‘डी’ म्हणजे डेंग्यू, ‘एम्’ म्हणजे मलेरिया आणि ‘के’ म्हणजे कोसू आहे’, असेही ते म्हणाले होते; पण याच द्रमुकने भाजपला रोखले, हे खेदजनक आहे.

तमिळनाडूत हिंदुविरोधी आणि हिंदुद्वेषी पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे तेथे हिंदूंचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे; कारण याही अगोदर तमिळनाडूत हिंदुविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. राज्यातील धर्मादाय मंत्रालयाकडून मंदिरांचा पैसा लाटणे, मंदिरांचे सरकारीकरण करणे, भूमी हडपणे, ख्रिस्त्यांनी मंदिराच्‍या भूमीत अतिक्रमण केल्‍यास त्‍याकडे दुर्लक्ष करणे, ख्रिस्त्यांच्‍या धर्मांतरासारख्‍या हिंदुविरोधी कारवायांकडे दुर्लक्ष करणे, हे प्रकार चालूच होते. तमिळनाडूत वाढणार्‍या आतंकवादी कारवाया, बाँबस्फोट हेही तितकेच चिंताजनक विषय आहेत. धर्मांधांनी तेथे आतापर्यंत १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या आहेत. याच द्रमुक पक्षाने ‘आर्य विरुद्ध द्रविड विचारधारा’ असा भेदभाव करण्याचे कार्य सतत लावून धरले. एवढेच नव्हे, तर द्रविड विचारधारा ‘मनु हा द्रविड लोकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी बाहेरून आलेला आर्य आहे’, असे तुणतुणे लावून धरत आहे. गेल्या काही दशकांमध्ये मनुवादी आणि इतर असा भेदभाव करून जातीभेद करण्यावर भर दिला गेला. जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करणार्‍या द्रमुक पक्षाने जातीविषयक जाणिवेचे अधिक उच्चारण केले. आता पुन्हा त्याच पक्षाचे खासदार तमिळनाडूत असल्याने अशा कारवायांना ऊत येणार, हे निश्चितच ! तमिळनाडूचे मुख्यमंत्री असणारे एम्.के. स्‍टॅलिन यांच्या पुत्र महाशयांनी, म्हणजेच उदयनिधी स्‍टॅलिन यांनी एका सभेत सनातन धर्म संपवण्‍याचे द्वेषपूर्ण वक्तव्‍य केले होते. लोकसभेच्या अनेक जागांमध्ये द्रमुकच्या जागा आल्याने आता त्यांचा सत्तेचा उन्माद आणखी चढेल आणि सनातन धर्म संपवण्याचा विडाच त्यांनी उचलला, तर हिंदू काय करणार आहेत ? सनातन धर्म संपवण्याचे विधान करूनही तमिळनाडूतील जनता जर अशांना मत देऊन त्यांचेच तळवे चाटत असेल, तर त्या जनतेलाही कपाळकरंटीच म्हणायला हवे. तमिळनाडूचे आणि तेथील हिंदूंचे वाटोळे झाल्यास त्याला हेच मतदार कारणीभूत ठरतील, यात शंका नाही !

तमिळनाडू हे हिंदूबहुल राज्य असतांनाही हिंदुद्रोही विधान करणार्‍यांनाच पुन्हा निवडून दिले जाते, त्यांनाच पाठबळ दिले जाते आणि हिंदुत्वाची कमान अबाधित राखणार्‍या, तसेच त्यासाठी प्रयत्न करणार्‍या पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो, हे एखाद्याच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच होय. महाराष्ट्रातही काय झाले ? तर ‘राज्यघटना पालटणार’, अशा स्वरूपात विरोधकांनी अपप्रचार केला आणि फटका बसला भाजपला (हिंदुत्वाला) ! नक्कीच हे गणित कुठेतरी चुकत आहे. जेथे हिंदुत्वाची आवश्यकता होती, तेथेच आता हिंदुत्व दडपले, नव्हे नव्हे नष्ट करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होणार, हे किती महाभयंकर आहे ! तमिळनाडूची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होईल, हेच आता उघड्या डोळ्यांनी बघण्यावाचून हिंदूंना पर्याय रहाणार नाही. थोडक्यात काय, तर तमिळनाडूच्या भूमीत हिंदुत्व दुर्बळ ठरले.

हिंदूंचे दायित्व !

वर्ष २०२३ च्या लोकसंख्येनुसार तमिळनाडूत ८७ टक्के हिंदू आहेत, तर अन्य धर्मीय अगदी अल्पसंख्य प्रमाणात आहेत. मग असे असतांना हिंदूंवर ही वेळ येतेच कशी ? याचा हिंदूंनीच विचार करायला हवा. हिंदुत्वाची पाठराखण करणार्‍यांचे समर्थन केले असते, तर सनातन धर्म अबाधित राहून हिंदूही सुरक्षित राहिले असते. एवढेच नव्हे, तर जिहाद्यांपासून हिंदूंचे संरक्षण झाले असते, मंदिरे सरकारीकरणमुक्त होऊन मंदिरांची दुःस्थिती सुधारली असती. संस्कृती आणि परंपरा यांचा आदर, सन्मान राखला गेला असता. धर्मांतरित होण्यापासून हिंदू वाचले असते. एक ना अनेक लाभ हिंदूंना मिळाले असते. तमिळनाडूतील अराजक पहाता तेथे हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेवर येणे अपेक्षित होते. योगीजनांची भूमी असलेले आणि हिंदु धर्मप्रसाराचे महान कार्य झालेले तमिळनाडू राज्य हिंदुद्वेष्ट्यांच्या तावडीतून वाचवायला हवे. हिंदुत्वाला तडा जाऊन चालणार नाही. त्यामुळे आतातरी हिंदूंनी जागृत होऊन स्वतःसह धर्माच्या रक्षणासाठी कृतीशील व्हावे !

तमिळनाडूसारख्या हिंदूबहुल राज्यात हिंदुद्रोही विधान करणार्‍यांचीच पाठराखण केली जाणे, हे पोकळ हिंदुत्वाचे उदाहरण !