मॉस्को – युक्रेनच्या सैनिकांना फ्रान्स प्रशिक्षण देणार आहे, अशी माहिती युक्रेनच्या सैन्याधिकार्यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर ‘फ्रेंच सैन्याचा कुणीही अधिकारी युक्रेनमध्ये असेल, तर त्याच्यावर निश्चितच आक्रमण करू,’ अशी चेतावणी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पत्रकार परिषदेत दिली. लावरोव्ह पुढे म्हणाले, ‘‘फ्रेंच सैन्यप्रशिक्षक युक्रेनमध्ये आहे. येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक सैन्याधिकार्याला आम्ही लक्ष्य करू.’’
१. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत. या वेळी दोन्ही नेते रशियासमवेतच्या युद्धाच्या वेळी युक्रेनला लागणार्या साहाय्याविषयी चर्चा करतील. या पार्श्वभूमीवर लावरोव्ह यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
२. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन याआधी म्हणाले होते की, आवश्यकता भासल्यास आम्ही युक्रेनमध्ये सैन्य पाठवू. यानंतर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड कॅमेरून यांनीही ‘युक्रेनची इच्छा असेल, तर ते रशियावर आक्रमण करण्यासाठी ब्रिटीश बनावटीची शस्त्रे वापरू शकतात’, असे म्हटले होते.
३. या दोन्ही देशांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे रशियानेही अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. २ वर्षांहून अधिक काळ चालू असलेल्या या युद्धात रशियाने आतापर्यंत युक्रेनच्या १८ टक्के भूभाग कह्यात घेतला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या आक्रमक पावित्र्यावर मॅक्रॉन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.