१. ग्रंथलिखाणाची पार्श्वभूमी आणि वैद्यकीय ग्रंथांच्या लिखाणाला आरंभ !
‘माझे सर्वांत मोठे बंधू सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. वसंत बाळाजी आठवले यांचे पालकांसाठीच्या ग्रंथांचे लिखाण चालू होते. तेव्हा मला वाटायचे, ‘मीही काही ग्रंथ लिहावेत.’ वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘स्वसंमोहन उपचार पद्धतीने अनेक व्याधींवर उपचार करणे शक्य होते’, हे माझ्या लक्षात आले. सर्वसामान्यांना याची माहिती कळावी, या उद्देशाने या विषयावरील ‘सायन्स ऑफ हिप्नोसिस (Science of Hypnosis)’ आणि ‘हिप्नोथेरपी (Hypnotherapy)’ हे दोन ग्रंथ आम्ही प्रकाशित केले. या विषयावरील ‘भारतीय वैद्यकीय सम्मोहन एवम् संशोधन पत्रिका (Indian Journal of Clinical Hypnosis and Research)’ हे ‘जर्नल’ही आम्ही ५ वर्षे प्रकाशित केले. प्रतिवर्षी सरासरी ३ लेख प्रकाशित केले.
२. अध्यात्माचा अभ्यास आणि ‘अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन !
त्यानंतर ‘वैद्यकीय उपचारांपेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे’, हे लक्षात आल्यावर माझा अध्यात्माचा अभ्यास चालू झाला. त्या अभ्यासातून लक्षात आलेल्या सूत्रांच्या आधारे मी वर्ष १९८७ मध्ये ‘अध्यात्मशास्त्र’ या चक्रमुद्रांकित (‘सायक्लोस्टाईल’) ग्रंथाचे प्रकाशन केले. या ग्रंथामध्ये केवळ तात्त्विक माहिती होती. कालांतराने ‘अध्यात्माच्या तात्त्विक माहितीपेक्षा कृतीच्या स्तरावरील ‘साधना’ही लोकांना कळणे आवश्यक आहे’, हे लक्षात आल्यावर त्यानंतर केवळ प्रायोगिक स्तरावरील ज्ञानाच्या आधारे ग्रंथ प्रकाशित करू लागलो.
३. प.पू. भक्तराज महाराज यांचा ग्रंथलिखाणासाठी आशीर्वाद आणि त्याची फलश्रुती !
माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांची भेट झाल्यावर ते वेळोवेळी जे शिकवायचे, ते सर्व मी लिहून ठेवायचो. तेव्हा प.पू. बाबा मला म्हणायचे, ‘‘या लिखाणाचा तुम्हाला उपयोग नाही (कारण आता तुम्ही शब्दातीत माध्यमातून शिकू शकता); पण इतरांना उपयोग होईल.’’ मी ‘अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ वर्ष १९९४ मध्ये बाबांना दाखवला. त्यांना तो आवडला. प.पू. बाबा मला म्हणाले, ‘‘माझ्या गुरूंनी मला आशीर्वाद दिला होता, ‘तू किताबों के उपर किताबे लिखेगा ।’ मी भजनाचे एकच पुस्तक लिहिले. माझ्या गुरूंचा आशीर्वाद मी तुम्हाला देतो.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘आता पुस्तके लिहिण्यात आनंद वाटत नाही.’’ (शब्दांच्या पलीकडच्या पातळीला गेल्यावर शब्दांच्या पातळीला येणे, म्हणजे आनंद गमावणे, असे होते.) त्यावर बाबा म्हणाले, ‘‘आमच्या गुरूंचा आशीर्वाद फुकट घालवणार का ? तुम्हाला पुस्तके लिहावीच लागतील. ते तुमचे कर्तव्यच आहे. एकेका विषयावर एकेक, अशी लहान लहान पुस्तके लिहा. लोकांना हाताळण्याच्या दृष्टीने ती सुटसुटीत हवीत आणि परवडलीही पाहिजेत.’’
४. समष्टीच्या उद्धारासाठी आयुष्यातील ३८ वर्षे अध्यात्म आणि साधना यांविषयक ग्रंथलिखाण करणे अन् त्याची फलनिष्पत्ती !
मी इतर संतांप्रमाणे सर्वत्र फिरून कीर्तने आणि प्रवचने केली असती, तर समाजात केवळ माझे नाव झाले असते. तसे न करता मी तो वेळ अध्यात्मशास्त्र, तसेच अन्य विषयांवरील ग्रंथांचे लिखाण करण्यासाठी दिला. सहस्रो जिज्ञासूंनी अध्यात्मशास्त्रावरील या ग्रंथांचा अभ्यास केला आणि ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, हे जाणून त्वरित साधनेलाही आरंभ केला. त्यामुळे जिज्ञासू साधक बनले आणि पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना करून ते संतपदाकडे वाटचाल करू लागले. फेब्रुवारी २०२४ पर्यंत सनातन संस्थेचे १२७ साधक संत झाले आहेत, तर १०५१ साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू असून ५ – १० वर्षांतच ते संतपद प्राप्त करतील. एवढ्या जलद गतीने साधक आणि संत निर्मिती होण्याचे हे पहिलेच उदाहरण असेल ! समाजाला आध्यात्मिक स्तरावर झालेला हा लाभ माझ्या प्रसिद्धीच्या तुलनेत कैक पटींनी अधिक महत्त्वाचा आहे.
५. ग्रंथ लिखाणाचे उद्देश
काळाच्या ओघात हिंदु धर्माची महती अल्प होऊ लागली आहे. धर्मशास्त्र समजून घेऊन कृती न केल्याने त्यातून अपेक्षित लाभ न झाल्यामुळे मनुष्य धार्मिक कृतींपासून दूर जाऊ लागला. ‘ईश्वरप्राप्ती करणे’, हेच मनुष्यजन्माचे मूळ उद्दिष्ट आहे आणि मानवाला त्याचाच विसर पडला आहे. त्यामुळे ‘धर्मातील ज्ञान आणि ईश्वरप्राप्तीचे मार्ग अखिल मानवजातीला कळावेत’, या उद्देशांनी मी ग्रंथलिखाण करत आहे. याद्वारे ‘आनंदप्राप्ती अन् शीघ्र गतीने ईश्वरप्राप्ती कशी करावी ?’ याची काळानुसार आवश्यक अशा साधनेची शिकवण दिली जात आहे.
६. सनातनच्या ग्रंथसंपदेची वैशिष्ट्ये
६ अ. सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा : सनातनने साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, ईश्वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक उपाय, आपत्कालीन उपचार, संमोहन उपचार इत्यादी विविध विषयांवर ग्रंथसंपदा संकलित केली आहे.
६ आ. सोप्या भाषेतील लिखाण : बहुतांश लेखक, संत आदींचे अध्यात्माच्या संदर्भातील लिखाण कठीण भाषेत असते. त्यामुळे ते लिखाण सर्वसामान्यांना लगेच आकलन होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन ग्रंथांतील लिखाण सर्वसामान्यांना कळेल, अशा सोप्या भाषेत केले आहे.
६ इ. व्याकरणदृष्ट्या शुद्ध लिखाणासाठी कटाक्षाने प्रयत्न : सनातनच्या ग्रंथांमध्ये व्याकरणाकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. इतर लेखकांच्या ग्रंथामध्ये प्रत्येक पानावर व्याकरणाच्या १०-१५ चुका असतात, तर सनातनच्या ग्रंथांमध्ये अत्यल्प चुका असतात. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाच्या आधारे ‘व्याकरणदृष्ट्या शुद्ध आणि अशुद्ध लिखाण’ यासंबंधी चाचणी करण्यात आली. त्या वेळी प्रयोगासाठी एका मराठी पुस्तकातील व्याकरणद्ृष्ट्या अशुद्ध लिखाण निवडण्यात आले. नंतर तेच लिखाण व्याकरणाच्या नियमांप्रमाणे शुद्ध करून त्याची चाचणी करण्यात आली. त्या चाचणीत पुढील भाग लक्षात आला.
याचा अर्थ लिखाण व्याकरणदृष्ट्या अशुद्ध असल्यास त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. हे अशुद्ध लिखाण व्याकरणाच्या नियमांप्रमाणे शुद्ध केल्यास नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे सनातनच्या ग्रंथांमधील व्याकरण आणि शुद्धलेखन परिपूर्ण असावे, असा प्रयत्न केला जातो.
६ ई. अध्यात्माचे केवळ तात्त्विक विवेचन नव्हे, तर काळानुसार साधना कृतीत आणण्याविषयी मार्गदर्शन ! : ग्रंथांतून ‘सनातन सांगत असलेली साधना कशी करायची ?’ हे नेमकेपणाने शिकवले जाते. यामध्ये केवळ तात्त्विक माहिती न देता प्रायोगिक स्तरावरील साधनेचीही माहिती दिली आहे. मी लिहिलेल्या आध्यात्मिक आणि तात्त्विक माहिती असलेल्या ग्रंथांमुळे बरेच वाचक, तसेच धर्मप्रेमी साधनेकडे आकृष्ट झाले आहेत. त्यांना प्रत्यक्ष साधना कळावी; म्हणून आता साधनेच्या प्रात्यक्षिक विषयांचे ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला आहे.
सर्वसामान्य वाचकाला कळण्यासाठी ग्रंथांत अध्यात्माच्या संदर्भातील लिखाणासह मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवरील लिखाणही उपयुक्त असते. यासाठी लिखाणात त्यांचाही अंतर्भाव केला जात आहे.
६ उ. पृथ्वीवर कोठेही उपलब्ध नसलेल्या ज्ञानाचा समावेश : सनातनच्या बहुतांश ग्रंथांत पृथ्वीवर प्रथमच उपलब्ध झालेल्या ज्ञानाचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे. ग्रंथांत दिलेले टक्केवारीच्या स्वरूपातील ज्ञान (उदा. विविध देवतांची ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याची क्षमता’) आणि प्रायोगिक विषयांच्या संदर्भातील ज्ञान (उदा. आदर्श देवघराची मापे) यांसारखे ज्ञान आतापर्यंत पृथ्वीवर कोठेही उपलब्ध नव्हते.
६ ऊ. विज्ञानयुगातील वाचकांना सहज समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेतील लिखाण : सध्याच्या विज्ञानयुगातील पिढीला वैज्ञानिक परिभाषेतील लिखाणाचे आकलन लवकर होते. अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीविषयी ‘का अन् कसे’, हे त्यांना समजावून सांगितले की, त्यांचा अध्यात्मावर लवकर विश्वास बसतो आणि ते साधनेकडे वळतात. यासाठी सनातनच्या प्रत्येक ग्रंथात अध्यात्मशास्त्र वैज्ञानिक परिभाषेत (सारणी, टक्केवारी आदी प्रकारे) सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अध्यात्माच्या विविध अंगांचा कार्यकारणभाव, तसेच अध्यात्मातील प्रत्येक कृतीविषयीची शास्त्रीय भाषेतील माहिती ग्रंथात दिली आहे.
६ ए. प्रगत वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेले संशोधनात्मक प्रयोग : त्या त्या विषयावरील ग्रंथांत ‘धार्मिक कृती अन् साधना यांचा व्यक्ती, वस्तू, वास्तू आणि वातावरण यांवर होणार्या चांगल्या-वाईट परिणामांच्या संदर्भातील सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया दर्शवणारी सूक्ष्मचित्रे (सूक्ष्मातून दिसलेली चित्रे) अन् लिखाण, तसेच इंग्रजी अक्षरे नव्हे, तर देवनागरी अक्षरे सात्त्विक असणे; तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य’ आदींविषयी वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या संशोधनाचा अंतर्भाव आहे.
६ ऐ. बुद्धीच्या पलीकडील लिखाण : ग्रंथांतील माझे लिखाण हे बुद्धीच्या स्तरावर विचार करून लिहिलेले नसते. देव जे विचार सुचवतो, तेच त्यात लिहिलेले आहे.
६ ओ. सूक्ष्म-ज्ञानाविषयीची परीक्षणे आणि चित्रे : सात्त्विक वेशभूषा, आहार, अलंकार, धार्मिक कृती इत्यादींचा व्यक्तीवर होणारा चांगला परिणाम या संदर्भातील सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया दर्शवणारी परीक्षणे आणि चित्रे सनातनच्या त्या त्या विषयावरील ग्रंथात प्रसिद्ध केली जातात.
६ औ. वाईट शक्तींसंदर्भात ज्ञान आणि त्यांच्या त्रासांवरील उपाय : मानवजातीच्या ८० टक्के समस्यांचे मूळ ‘वाईट शक्तींचा त्रास’ हे आहे. यासंदर्भात पूर्वी कधीही उपलब्ध नसलेले ज्ञान आणि वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपाय त्या त्या ग्रंथात अंतर्भूत केलेले आहेत.
६ अं. लिखाणाला वेद, उपनिषदे आदी धर्मग्रंथांचा आधार : पूर्वीच्या ऋषींनी वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आदींसारख्या धर्मग्रंथांद्वारे विपुल लिखाण करून ठेवले आहे. या धर्मग्रंथांतील सध्याच्या काळाला आवश्यक असे विषय आणि लिखाण सनातनच्या ग्रंथांमध्ये घेण्यात येतात. लिखाणासाठी आवश्यक ते संदर्भ धर्मग्रंथांमधून सहजतेने उपलब्ध होत आहेत.
६ क. लेखक नव्हे, तर ‘संकलक’ : ग्रंथांत काही ठिकाणी सनातनच्या काही साधकांना मिळालेले ईश्वरी ज्ञान, अन्य संतांचे मार्गदर्शन यांच्या लिखाणाचाही समावेश केलेला आहे. त्यामुळे मी ‘लेखक’ न रहाता या सूत्रांचे संकलन करणारा केवळ ‘संकलक’ असल्याने ग्रंथांवर माझे नाव ‘संकलक’ म्हणूनच घेतलेले आहे.
७. सनातनची ग्रंथसंपदा !
फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३६५ ग्रंथांच्या १३ भाषांमधील ९५ लक्ष ९६ सहस्र प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते.
सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांची भाषा आणि संख्या
फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांची सूची सोबत दिली आहे. या व्यतिरिक्त ५००० हून अधिक ग्रंथ होतील, इतके लिखाण आतापर्यंत संग्रहित करून ठेवले आहे. यामध्ये ‘मनुष्य, साधना, कला, समाज, राष्ट्र, विश्व, अध्यात्म, वाईट शक्ती, चांगल्या शक्ती, सूक्ष्म जगत्, धर्म’ आदी विषयांवरील ग्रंथमालिका असून त्यांचे संकलन आणि प्रकाशन होणे बाकी आहे.
८. सनातनच्या ग्रंथांचे काही विषय
८ अ. हिंदु धर्म : सोळा संस्कार; सण, उत्सव, व्रते आणि परंपरा; धर्म; धर्मरक्षण; कुंभपर्व; खरे आणि भोंदू साधू-संत
८ आ. आचारधर्म : आदर्श दिनचर्या, वेशभूषा, केशभूषा, अलंकार, आहार आणि निद्रा
८ इ. धार्मिक कृती : देवपूजा, देवळात दर्शन घेणे, श्राद्ध आदी धार्मिक कृती; धर्माचरण; तीर्थक्षेत्रे इत्यादी
८ ई. विविध योगमार्ग : कर्मयोग, हठयोग, नामसंकीर्तनयोग आणि गुरुकृपायोग
८ उ. साधना : देवता (गुणवैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासनेमागील शास्त्र), गुरु, शिष्य, व्यष्टी आणि समष्टी साधना, स्वभावदोष-निर्मूलन आणि गुणसंवर्धन, अहं-निर्मूलन, भावजागृती, बालकभाव, गोपीभाव इत्यादी
८ ऊ. ईश्वरप्राप्तीसाठी कला : सात्त्विक अक्षरे, रांगोळ्या, मेंदी इत्यादी
८ ए. हिंदु राष्ट्र : आदर्श राष्ट्ररचना, हिंदु राष्ट्र का हवे ? इत्यादी.
८ ऐ. आपत्काळातील संजीवनी : विकार-निर्मूलनासाठी सोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार, बिंदूदाबन उपचार, रिकाम्या खोक्यांचे उपाय, नामजप, स्वसंमोहन उपचार; प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवरील उपाय; अग्निहोत्र; अग्नीशमन प्रशिक्षण; प्रथमोपचार प्रशिक्षण इत्यादी.
पुढील आपत्काळात वाचकांना ग्रंथ उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे ज्या जिज्ञासूंना ग्रंथांचा अभ्यास करायचा असेल, त्यांनी आवश्यक ते ग्रंथ आताच खरेदी करावेत. दुकानदारांना या ग्रंथांची विक्री करावयाची असल्यास तेही या ग्रंथांची मागणी देऊ शकतात.
गुरूंच्या, म्हणजे भगवंताच्या कृपेमुळे ग्रंथनिर्मितीचे आणि त्याद्वारे अध्यात्म अन् धर्म प्रसाराचे कार्य झाले आणि होत आहे. याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (५.३.२०२४)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलीत केलेल्या आणि अन्य संकलकांनी संकलीत केलेल्या प्रकाशित ग्रंथांच्या सूचीची संक्षिप्त अनुक्रमणिका
|