मी एक ‘उद्योजक ते साधक उद्योजक’ !

नमस्‍कार ! मी रवींद्र प्रभुदेसाई ! परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेमुळेच मला उद्योग व्‍यवसायात अनेक चांगल्‍या अनुभूती आल्‍या आणि त्‍यांची कृपा प्राप्‍त झाली आहे, यासाठी मी सर्वप्रथम गुरुमाऊलीच्‍या अन् सनातन संस्‍थेच्‍या चरणी नतमस्‍तक होऊन कृतज्ञता व्‍यक्‍त करतो. सनातन संस्‍थेने सांगितलेली साधना केल्‍याने माझ्‍यामध्‍ये सद़्‍गुणांची वृद्धी झाली, तसेच साधनेमुळे आत्‍मबल वाढून व्‍यावहारिक प्रक्रिया आणि व्‍यावसायिक वृद्धी झपाट्याने झाली.‘पितांबरी’च्‍या यशामागे मेहनतीसह आत्‍मबल देणार्‍या अध्‍यात्‍माचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे.

(मार्च २०१७ मध्‍ये ‘आम्‍ही सारे ब्राह्मण’ पाक्षिकाच्‍या सहाव्‍या वर्धापनदिनानिमित्त श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्‍कार देण्‍यात आला, तसेच त्‍यांना फेब्रुवारी २०२३ मध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘उद्योग महर्षि’ उपाधी दिली.)

१. ‘पितांबरी’च्‍या यशामागे मेहनतीसह आत्‍मबल देणार्‍या अध्‍यात्‍माचाही महत्त्वपूर्ण वाटा !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

‘पितांबरी उद्योग समूह’ हे नाव आज महाराष्‍ट्राच्‍या उद्योगविश्‍वातले एक सुप्रतिष्‍ठित नाव झाले आहे. गेल्‍या ३५ वर्षांपासून अतिशय स्‍थिरतेने प्रगती करत ‘पितांबरी उद्योग समूहा’ने आज वार्षिक ३०० कोटी रुपयांची उलाढाल करण्‍याचा टप्‍पा पार केला आहे. काश्‍मीरपासून कन्‍याकुमारीपर्यंतच्‍या देशातील सर्व भागांत ३ सहस्र ५०० मुख्‍य वितरक, छोट्या दुकानांपासून मोठ्या मॉलमध्‍ये साडेतीन ते ४ लाखांपर्यंत विक्रीकेंद्रे इतका मोठा आस्‍थापनाचा विस्‍तार आहे. या यशामागे मेहनत, समर्पण आहेच; पण हे सारे काही साध्‍य करण्‍यासाठी आवश्‍यक आत्‍मबलाची शक्‍ती देणार्‍या अध्‍यात्‍माचाही तितकाच महत्त्वपूर्ण वाटा आहे.

२. राष्‍ट्रभक्‍ती आणि अध्‍यात्‍म यांची सांगड घातल्‍याने निराशेच्‍या अवस्‍थेतून बाहेर येण्‍यास साहाय्‍य होणे

टीका, नकार आणि अपयश हे कोणत्‍याही उद्योजकासाठी नवीन नाही. मीसुद्धा एकेकाळी या सार्‍यातून गेलो होतो. ‘पितांबरी शायनिंग पावडर’ या उत्‍पादनाचा शोध लागण्‍यापूर्वी ‘मोझॅक टाईल्‍स’ नावाने एक व्‍यवसाय मी चालू केला होता; परंतु या व्‍यवसायातील अनुभव अल्‍प पडल्‍यामुळे त्‍यात मला प्रचंड तोटा आणि अपयश सहन करावे लागले होते. मोठा उद्योजक होण्‍याचे ध्‍येय उरी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करत असतांना व्‍यवसायात आलेले अपयश, जवळच्‍या लोकांच्‍या टीका, आर्थिक हानी आणि भविष्‍याची चिंता, अशा सर्व विचारांनी एका टप्‍प्‍यावर मला पुष्‍कळ नकारात्‍मक बनवले होते. मी माझा आत्‍मविश्‍वास गमावला होता.

अध्‍यात्‍माचे संस्‍कार लहानपणापासूनच आई-वडिलांनी केले होते. स्‍तोत्रे, श्‍लोक आदी म्‍हटल्‍यावर तेवढ्या वेळेपुरती मनःशांती लाभायची. त्‍यानंतर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे ठाणे येथील घंटाळी मैदानात प्रवचन असल्‍याचे समजले. काहीशा विमनस्‍क मनःस्‍थितीत मी त्‍या प्रवचनाला गेलो. तेव्‍हा त्‍यांनी राष्‍ट्रभक्‍ती आणि अध्‍यात्‍म यांची सांगड घालून ‘वैयक्‍तिक आध्‍यात्मिक उन्‍नती’चा कानमंत्र दिला. हीच गोष्‍ट मनाला भावली. या सत्‍संगामुळे मला निराशेच्‍या अवस्‍थेतून बाहेर येण्‍यास साहाय्‍य झाले. त्‍यानंतर मी सनातन संस्‍थेच्‍या सत्‍संगात नियमित जाऊ लागलो आणि स्‍वतःच्‍या आध्‍यात्मिक उन्‍नतीसाठी सनातन संस्‍थेशी जोडलो गेलो. हळूहळू आमचे सर्व कुटुंब सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनाखाली साधना करू लागले.

पितांबरी उद्योग समूहाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

३. सनातन संस्‍थेने सांगितलेली साधना केल्‍याने सद़्‍गुणांची झालेली वृद्धी !

सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून आध्‍यात्मिक साधनेची दिशा प्राप्‍त झाल्‍यामुळे आणि ईश्‍वरस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या रूपात गुरु लाभल्‍यामुळे नामस्‍मरण, सत्‍संग, सत्‍सेवा आणि त्‍याग हे आध्‍यात्मिक संस्‍कार आचरणात आणण्‍यास साहाय्‍य झाले अन् जीवनात संपन्‍नता आली. त्‍यांच्‍या शिकवणुकीमुळे आज माझे कुटुंब मग ते माझे स्‍वतःचे कुटुंब असो वा उद्योजकीय, सामाजिक, आध्‍यात्मिक कुटुंब असो, प्रत्‍येक ठिकाणी आनंद, उत्‍साह, आत्‍मीयता, सामाजिक बांधीलकी पहायला मिळते. या साधनेतून प्रेमभाव, संघटन, इतरांना समजून घेणे, इतरांचा विचार करणे, एकाग्रता वाढणे, नियोजन कौशल्‍य, सामाजिक बांधीलकीची जाण ठेवणे, तळागाळातील माणसांना साहाय्‍य करणे, आजूबाजूचे वातावरण हसत-खेळत आनंदी ठेवणे, उद्योगातून मिळालेल्‍या धनाचा उपयोग राष्‍ट्ररक्षण अन् धर्मजागृती कार्यासाठी करणे, समाजामध्‍ये सामाजिक-सांस्‍कृतिक कार्य करणार्‍या संस्‍थांना सढळ हस्‍ते साहाय्‍य करणे आदी सद़्‍गुणांची माझ्‍यात वृद्धी झाली. यामुळे माझ्‍या वैयक्‍तिक आणि व्‍यावसायिक आयुष्‍यात कायापालट झाला.

४. साधनेमुळे वैयक्‍तिक आयुष्‍यात उत्‍साह, चैतन्‍य प्राप्‍त होऊन कार्यक्षमता वाढणे

सनातन संस्‍थेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्‍थेने पहिल्‍या टप्‍प्‍यात नाम, सत्‍संग, सत्‍सेवा, त्‍याग, तर दुसर्‍या टप्‍प्‍यात प्रार्थना, प्रीती, कृतज्ञता, स्‍वभावदोष निर्मूलन यांविषयी संपूर्ण भारतभर अध्‍यात्‍मप्रसाराचे कार्य चालू केले. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील तेजस्‍वी विचारांमुळे सहस्रावधी हिंदूंच्‍या मनात अध्‍यात्‍म, धर्म आणि राष्‍ट्र तेजाची ज्‍योत पेटवली आहे. ‘वैयक्‍तिक साधनेसह समाजाच्‍या उन्‍नतीसाठी करायच्‍या साधनेची शिकवण’, या माध्‍यमातून दिली जात आहे. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍याप्रमाणे साधना केल्‍यामुळे आज वयाच्‍या ६१ व्‍या वर्षी माझ्‍या वैयक्‍तिक आयुष्‍यात उत्‍साह, चैतन्‍य आणि कार्यक्षमता आहे. इतरांमध्‍येही चैतन्‍य, उत्‍साह कायम रहावा, यासाठी मी प्रयत्नशील असतो. याची प्रेरणा मला माझ्‍या साधनेतूनच प्राप्‍त होते.

५. साधनेमुळे आत्‍मबल वाढून व्‍यावहारिक प्रक्रिया आणि व्‍यावसायिक वृद्धी झपाट्याने होणे

साधनेमुळेच मी वैयक्‍तिक आणि उद्योजकीय क्षेत्रात समाधानी अन् संपन्‍न आयुष्‍य जगत आहे अन् याचे संपूर्ण श्रेय सनातन संस्‍थेला, तसेच माझ्‍या कुटुंबियांना जाते. उद्योगात आलेले यश-अपयश सनातन संस्‍थेकडून प्राप्‍त झालेल्‍या आध्‍यात्मिक साधनेच्‍या बळावर सहज पचवून मी साधनेच्‍या मार्गावर स्‍थिर उभा आहे, यशस्‍वी आणि समाधानी आहे. मुख्‍य म्‍हणजे आध्‍यात्मिक साधनेमुळे एकाग्रता वाढते, मन शांत होते, वर्तमानात मन स्‍थिर रहाते, सकारात्‍मक विचार करण्‍याची सवय लागते, सकारात्‍मक मानसिकता वाढते, अभ्‍यासात लक्ष केंद्रित होते, शारीरिक आणि मानसिक आरोग्‍य सुधारते, निर्णयक्षमता वाढते, नोकरी-व्‍यापारात भरभराट होऊन आर्थिक आयुष्‍य लाभात येते, सर्वांगीण समृद्ध आयुष्‍य घडते अन् उद्योजकीय मन हे जर तणावमुक्‍त असेल, तर तुम्‍हाला कोणताही नवस बोलण्‍याची आवश्‍यकता भासणार नाही. साधनेमुळे आत्‍मबल वाढून तुमच्‍या व्‍यावहारिक प्रक्रियांचा वेगही प्रचंड वाढतो. त्‍यामुळे व्‍यावसायिक वृद्धीसुद्धा झपाट्याने होत जाते.

‘ऐहिक कर्तृत्‍वासमवेतच पारमार्थिक उन्‍नतीचा सुरेख संगम साधून आपल्‍याही आयुष्‍यात संपन्‍नता यावी, तसेच हिंदु राष्‍ट्र निर्मितीसाठी मोलाचे धर्मकार्य आपल्‍या हातून घडावे’, हीच गुरुचरणी प्रार्थना !

– श्री. रवींद्र प्रभुदेसाई, व्‍यवस्‍थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्‍ट्‌स प्रा.लि., ठाणे. (२२.२.२०२४)

साधनेमुळे उद्योजकाचे रूपांतर ‘साधक उद्योजका’त होणे

वयाच्‍या २० व्‍या वर्षापासून मी तन-मन-धन अर्पण करायला लागलो. हा संस्‍कार गुरुमाऊलींनीच माझ्‍यावर केला. ज्‍याचा मला आध्‍यात्मिक स्‍तरावर चांगला लाभ झाला. आता मी प्रतिदिन अर्पण करतो. यातून आपले मागील जन्‍मीचे देवाणघेवाणीचे हिशोब असतात, ते फिटतात आणि प्रारब्‍ध भोगही संपू लागतात. ‘माझा दिवस चांगला जावा’, अशी प्रार्थना करून माझ्‍या दिवसाचा प्रारंभ होतो, तर ‘माझा दिवस चांगला गेला’, यासाठी ईश्‍वराप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करून दिवसाचा शेवट होतो. साधना केल्‍यामुळे सत्त्वगुणाची वृद्धी होऊन रज-तम गुण न्‍यून होतात. याचाच उपयोग आलेल्‍या अडचणी दूर करून ‘पितांबरी’च्‍या उत्‍पादनांची निर्मिती करतांना होतो. पितांबरीची दैनंदिनी असो, उत्‍पादने, ‘क्रिएटिव्‍ह’ (कल्‍पक) विज्ञापने किंवा अलीकडेच पितांबरीने नव्‍याने उपलब्‍ध केलेली ‘देवभक्‍ती जय श्रीराम उपासना अगरबत्ती’, हे उत्‍पादनसुद्धा आमच्‍याकडून परमेश्‍वरानेच निर्माण करून घेतले आहे. सगळ्‍या अनुभवांतून रवींद्र प्रभुदेसाई या उद्योजकाचे रूपांतर ‘साधक उद्योजका’त झाले आहे.

– श्री. रवींद्र प्रभुदेसाई (२२.२.२०२४)


‘पितांबरी उद्योग समूह’ हा अर्थार्जनाचा नव्‍हे, तर समाजाची आध्‍यात्‍मिक प्रगती करणार्‍यांसाठी साधनेचा मार्ग !

पितांबरीतील माझ्‍या सहकार्‍यांनाही आध्‍यात्मिक साधनेचा आनंद मिळावा, याकरता ‘पितांबरी’ आस्‍थापनाच्‍या विविध शाखांमधील सहकार्‍यांसाठी सत्‍संग चालू केले. आधी तेथे सनातनचे साधक सत्‍संग घेत असत; पण कार्यालये आणि सहकारी यांची संख्‍या वाढल्‍यावर श्री. सतीश कोचरेकर या सहकार्‍याची ‘आध्‍यात्मिक व्‍यवस्‍थापक’ (स्‍पिरिच्‍युअल मॅनेजर) म्‍हणून नेमणूक केली अन् सहकार्‍यांसाठी नियमित सत्‍संग चालू केले. येथे नियमित प्रार्थना केल्‍या जातात. त्‍यामुळे ‘पितांबरी उद्योग समूह’ हा केवळ अर्थार्जनाचाच नव्‍हे, तर समाजाची आध्‍यात्‍मिक प्रगती करणार्‍यांसाठी साधनेचा मार्ग बनला आहे. ‘पितांबरी’च्‍या सर्व विभाग कार्यालयांमध्‍ये प्रतिदिन सकाळी सहकार्‍यांकडून नास्‍मरण केले जाते. इतकेच नव्‍हे, तर ‘पितांबरीच्‍या ग्राहकांनाही साधनेचे महत्त्व समजले पाहिजे, या तळमळीपोटी आम्‍ही उत्‍पादनांच्‍या वेष्‍टनावर (उदा. अगरबत्ती उत्‍पादनांवर किंवा पूजा उत्‍पादनांमध्‍ये ‘साधना कशी करावी ?’, याचे माहितीपत्रकही देण्‍यात येते.) साधनेचे महत्त्व सांगणारे लिखाण छापले आहे.

– श्री. रवींद्र प्रभुदेसाई, व्‍यवस्‍थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्‍ट्‌स प्रा.लि., ठाणे. (२२.२.२०२४)


येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक