सनातन धर्म आणि संस्कृती ही जगातील सर्वांत श्रेष्ठ अशी संस्कृती आहे. सनातनचा अर्थ ‘नित्य नूतन’ असा आहे, म्हणजे सनातन धर्म आणि संस्कृती ही कधीही कालबाह्य होत नाही. ‘या धर्माची मूलतत्त्वे निसर्ग नियमाला अनुसरून आहेत’, असा सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न अनेक शतके परकीय आक्रमकांनी केला. जगातील अनेक प्राचीन संस्कृती आणि धर्म नष्ट झाले; पण हिंदु धर्म त्याच्या वैशिष्ट्यांमुळे आजही टिकून आहे. काळाच्या ओघात होणारे अनेक पालट सनातन धर्म आणि संस्कृती यांनी स्वीकारले; म्हणून सनातन संस्कृतीचा मूळ गाभा नष्ट झाला नाही.
इंग्लंडचे दिवंगत पंतप्रधान चर्चिल म्हणाले होते, ‘‘Culture and literature are all very well, but a culture without strength ceases to be a living culture.’’ (अर्थ : संस्कृती आणि साहित्य उत्तम आहे; पण संस्कृतीला बळ नसेल, तर अस्तित्वात असलेल्या संस्कृतीचा अंत समीप आला आहे.)
असे असले, तरी सनातन धर्म आणि संस्कृती यांचे खरे स्वरूप टिकवून ठेवणे, हे या धर्माच्या अनुयायांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणारी आजची आघाडीवरची संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे. या संस्थेचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांमुळे अखंड चालू आहे.
हिंदु धर्म टिकण्यासाठी सर्व प्रकारच्या माध्यमांचा यथायोग्य वापर करणारी ‘सनातन संस्था’ !आज काळाच्या ओघात घराघरातून ‘संस्कार’ होणे जवळजवळ थांबले आहे. अशा परिस्थितीत संस्कारांचे दायित्व स्वीकारून हिंदु समाजात श्रेष्ठतम असलेल्या आपल्या संस्कृतीचा अभिमान जागृत करण्याचे कार्य ‘सनातन संस्था’ तळमळीने करत आहे. आपल्या संस्कृतीने घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन आपणच केले, तर आपलीच संस्कृती नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. अशी वेळ येऊ नये, म्हणून ‘सनातन संस्था’ प्रयत्न करत आहे. त्यासाठी हिंदु धर्म आणि संस्कृती यांना अनुसरून असणार्या विविध विषयांवरील ग्रंथ ‘सनातन संस्था’ प्रकाशित करते. तसेच ‘धर्माचरण कसे असावे ?, आपले सण-उत्सव कशा प्रकारे साजरे करावेत ?’, याविषयीसुद्धा मार्गदर्शन करणारी ग्रंथनिर्मिती सनातन संस्थेने केली आहे. आधुनिक काळातील सर्व प्रचार आणि प्रसार माध्यमांचा आधार घेऊन ‘सनातन संस्था’ हिंदु धर्म टिकून रहावा, यासाठी अथक प्रयत्न करत आहे. ही गोष्ट कौतुकास्पद आहे. |
१. धर्म आणि संस्कृती यांची सेवा करण्याच्या विचाराने कार्यरत ‘सनातन संस्था’ !
वैदिक काळातील ऋषिमुनींनी भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही जीवनांची उत्तम प्रकारे सांगड घालून स्वयंशिस्त असलेला मानवी समाज निर्माण केला. असा मानवी समाज निर्माण करण्यासाठी स्थळकाळाचे बंधन नाही, हा सनातन धर्माचा पायाभूत सिद्धांत आहे. या सिद्धांताला अनुसरून कार्य करून आपण आपल्या धर्माची आणि संस्कृतीची सेवा करू शकतो, या विचाराने प्रेरित होऊन ‘सनातन संस्था’ कार्यरत झाली.
माणसाचे सामाजिक जीवन सर्वार्थाने परिपूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन करणारे संत, महात्मे या भूतलावर अवतीर्ण झाले. त्यांनी हे कार्य परकियांची राजकीय सत्ता या देशात प्रस्थापित असतांना केले. आज पाश्चात्त्य विचारांच्या प्रभावाखाली असलेला हिंदु समाज आपल्या मूळ सनातन धर्माकडे वळावा, हा प्रधान हेतू ठेवून ‘सनातन संस्था’ आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी पुढे सरसावली.
२. भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा सुयोग्य मेळ घालण्यास शिकवणारी ‘सनातन संस्था’ !
मानवी जीवनाची लौकिक आणि पारलौकिक जीवन, अशी दोन अंगे आहेत. या दोन्ही अंगांची सुयोग्य सांगड घालून माणसाने आपले जीवन सुखकर करावे, अशी शिकवण देणारा सनातन धर्म आहे. थोडक्यात भौतिक आणि आध्यात्मिक जीवन यांचा सुयोग्य मेळ घालून माणूस स्वतःची भौतिक अन् आध्यात्मिक प्रगती करू शकतो, असा विश्वास आजच्या आधुनिक काळातील हिंदूंच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न ‘सनातन संस्था’ गेली २५ वर्षे करत आहे.
‘सनातन संस्थे’ची स्थापना ‘सनातन धर्माची सुयोग्यपणे जोपासना करण्यासाठी करण्यात आली आहे’, असे अनुमान ती करत असलेल्या कार्यावरून आपण काढू शकतो.
३. हिंदु समाजाला धार्मिक आणि आध्यात्मिक शिक्षण देण्यास प्रयत्नरत असणारी ‘सनातन संस्था’ !
या आधुनिक जगात जगत असतांना अनेक प्रलोभने आपल्यासमोर उभी असतात. आपले जीवन स्वच्छ, प्रामाणिक, शुद्ध असले पाहिजे, तरच आपला खरा विकास होईल. अन्यथा आपल्याला दुःखाला सामोरे जावे लागते, तसेच पालटणार्या काळानुसार वागतांना माणूस काळाच्या प्रवाहात वहात जातो. असा माणूस आधुनिक जगातील नवीन जीवनपद्धतीच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होतो. धन संपादनाच्या नादात अयोग्य मार्गाची निवड करतो. त्यामुळे माणूस सुखी होण्याऐवजी दुःखी होतो आणि आपल्या परिवाराचाही नाश करतो. अशी वेळ येऊ नये, म्हणून हिंदु समाजाला सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक शिक्षण देण्याचा प्रयत्न गेली २५ वर्षे ‘सनातन संस्था’ करत आहे.
‘हिंदु कोण ?’, या प्रश्नाचे उत्तर ‘हीनं दूषयति इति हिन्दुः।’, म्हणजेच ‘जो स्वतःतील दोष आणि अहं दूर करण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहे, तो हिंदू !’, अशी ‘हिंदु’ शब्दाची व्याख्या ‘शब्दकल्पद्रुम’ कोशाने दिली आहे. |
४. हिंदु समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम ‘सनातन संस्था’ करते !
‘केवळ हिंदु धर्म नाही, तर हिंदु संस्कृती काळानुसार वाढत आहे, पालटत आहे, विकास पावत आहे; पण त्याच्या मूलभूत तत्त्वात आणि चैतन्यात परिवर्तन होत नाही. वैदिक युगाची संस्कृती, उपनिषद युगाची संस्कृती, महाभारत, स्मृति, पुराणे, भाष्यकार, मध्ययुगीन काळातील संत आणि आधुनिक काळातील सुधारक यांच्यात एकच चैतन्य आहे’, असे भाषाचार्य आचार्य डॉ. सुनीती कुमार चॅटर्जी म्हणतात. तेच ‘सनातन संस्था’ आपल्या कार्यातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात एकात्मतेची कल्पना, भूमीनिष्ठा आणि परंपरा यांचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, तरच आपले अस्तित्व टिकून रहाते. आपल्या महान पूर्वजांच्या दैदीप्यमान स्मृती आपल्याला कायम स्फूर्ती देत असतात, याचा विसर पडू नये आणि हिंदु समाज भरकटत जाऊ नये, म्हणून हिंदु समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम ‘सनातन संस्था’ करत आली आहे.
५. तणावमुक्त जीवन जगण्याविषयी मार्गदर्शन करणारी ‘सनातन संस्था’ !
अध्यात्म, नैतिकता, शुद्ध आचरण आणि उपासना या ४ गोष्टी मानवी जीवनाला आकार देणार्या आहेत. ताणतणावातून माणसाला मुक्त होण्यासाठी यांची नितांत आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन काळाला अनुरूप अशी आधुनिक पद्धत ‘सनातन संस्थे’ने प्रचलित केली आहे. साध्या सोप्या नियमांमध्ये स्वतःला बांधून घेऊन शिस्तबद्ध जीवन कसे जगावे ?, याचे मार्गदर्शन ‘सनातन संस्था’ करते.
६. हिंदु संस्कृतीच्या ‘कला’ या महत्त्वपूर्ण अंगाकडे जगाचे लक्ष वेधणारी ‘सनातन संस्था’ !
संगीत, नृत्य, चित्रकला या आणि अशा विविध कलागुणांचा विकास शास्त्रशुद्ध पद्धतीने माणसाने केला, तर माणसाचे जीवन सुखी (समृद्ध) होऊ शकते. कलासक्त जीवन हासुद्धा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, याकडे सनातन संस्थेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हेच सनातन संस्थेच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, असे आपल्याला म्हणता येईल.
७. सुसंस्कृत पोषाखाविषयी आग्रही भूमिका घेणारी ‘सनातन संस्था’ !
‘सुविद्य, सुसंस्कृत समाजाने अनुरूप असा पोषाख परिधान करावा’, अशी आग्रही भूमिका घेणारी ही संस्था आहे. आपण आधुनिक जगात वावरत असलो, तरीसुद्धा सभ्यता आणि सुसंस्कृतपणा यांकडे दुर्लक्ष करू नये, असा जर कुणी आग्रह धरला, तर त्यात अयोग्य आहे, असे वाटत नाही.
८. हिंदु संस्कृतीचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणारी ‘सनातन संस्था’ !
आपली हिंदु संस्कृती आणि त्यातील साहित्य सर्वोत्तम आहे. त्याकडे पाठ फिरवून आपण तिच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. या संस्कृतीला बळ देण्याची नितांत आवश्यकता आहे, हे ओळखून आपल्या संस्कृतीचे अस्तित्व टिकवण्यासाठी ‘सनातन संस्था’ प्रयत्नरत आहे.
एकूणच ‘सनातन संस्था’ करत असलेले कार्य निश्चित कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. या संस्थेला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य करण्याचे अक्षय बळ लाभो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.