Ramlala Darshan Money Recovery : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या दर्शनासाठी भाविकांकडून सहज दर्शनासाठी वसूल केले जात होते पैसे !

  • श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानेच उघड केली माहिती !

  • एक पोलीस शिपाई निलंबित

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिरातील भगवान श्री रामलल्लाच्या दर्शनाच्या नावाने फसवणूक करण्यात येत होती. येथे येणार्‍या भाविकांना सहज दर्शन देण्याचे आश्‍वासन देऊन काही लोकांकडून पैसे उकळले जात होते. यामध्ये उत्तरप्रदेश पोलिसांचा एक हवालदारही सहभागी होता. आता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अयोध्येतील कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी कुणाकडूनही पैसे घेतले जात नाही, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे. दर्शनासाठी लोकांकडून पैसे घेणारे पोलीस शिपाई उपेंद्रनाथ याला निलंबित करण्यात आले आहे. त्याची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. तो येथील रामभूमी पोलीस ठाण्यात कार्यरत होता.

चंपत राय म्हणाले की, श्री रामलल्लाचे दर्शन पूर्णपणे विनामूल्य आहे. श्री रामलल्लाचे दर्शन अगदी सहज होत असून सर्व रामभक्तांनी दर्शनासाठी कुणाच्याही आमिषांना बळी पडू नये. भारतात आणि भारताबाहेर रहाणार्‍या भाविकांना विनंती आहे की, त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी यावे. मंदिराच्या परिसराच्या प्रवेशद्वारापासून ते दर्शन घेऊन बाहेर पडेपर्यंत केवळ १ घंटा इतकाच वेळ लागतो.