साधिकेला घराची विक्री करतांना झालेले त्रास आणि त्या प्रसंगी सद्गुरु अन् संत यांनी केलेले साहाय्य

अधिवक्त्या (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी

१. मुलुंड येथील घर विकून गोवा येथे स्थलांतर करण्याचे ठरवणे

‘मी दादर येथे आणि माझे यजमान (श्री. मिलिंद कुलकर्णी) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात येऊन-जाऊन सेवा करत होते. एप्रिल २०१८ मध्ये आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी आलो. जून २०१८ मध्ये मुलुंड येथील आमचे घर विकून गोवा येथे स्थलांतर करण्याचा आमचा विचार झाला.

२. घराची विक्री करण्याच्या दृष्टीने २ मास काहीही प्रयत्न न होणे

रामनाथी आश्रमातून आम्ही मुलुंड येथे आल्यानंतर जून-जुलै या २ मासांत आमच्याकडून घराच्या विक्रीच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झाले नाहीत. ‘आम्हाला घराची विक्री करायची, म्हणजे काय करायचे ?’, हेच कळत नव्हते. त्या वेळी माझ्या यजमानांना आध्यात्मिक त्रास होत असल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हते.

३. गुरुपौर्णिमा सोहळ्याच्या दिवशी  पू. (सौ.) संगीता जाधव यांची भेट होणे

वर्ष २०१८ मध्ये मुलुंड येथे सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा सोहळा होणार होता. आम्ही त्या सोहळ्याला गेलो होतो. तेव्हा तेथे आमची पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याशी भेट झाली. आम्ही त्यांना आमच्या घराविषयी सर्व स्थिती सांगितली. आम्ही सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना भेटण्याविषयी विचारले.

पू. (सौ.) जाधवकाकूंनी आम्हाला दुसर्‍या दिवशी सद्गुरु अनुताईंना भेटायला यायला सांगितले.

४. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची भेट होणे, त्यांनी घराची विक्री होण्यासंबंधी देवाला प्रार्थना आणि काही नामजपादी उपाय करायला सांगून आधार देणे

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एका साधकाच्या घरी पू. (सौ.) संगीता जाधव आणि सद्गुरु अनुताई यांची भेट झाली. त्यांचा आम्हाला २ घंटे सत्संग लाभला. आम्ही त्यांना आमची सर्व स्थिती सांगितली. सद्गुरु अनुताईंनी त्रास दूर होण्याच्या दृष्टीने घरात प.पू. बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) भजने लावून ठेवायला सांगितली. त्या माझ्या यजमानांना म्हणाल्या, ‘‘आपले गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) संकटे आणि अडचणी यांच्यापेक्षा पुष्कळ मोठे आहेत.’’ त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला गुरुदेवांचे स्मरण होऊन निश्चिंतता वाटू लागली. त्या वेळी आम्हाला सद्गुरु अनुताईंचा पुष्कळ आधार मिळाला. त्यांनी आम्हाला श्रीकृष्णाला प्रार्थना करायला सांगितली आणि काही नामजपादी उपाय करायला सांगितले.

५. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या कृपेमुळे वसाहतीच्या अध्यक्षांची भेट होऊन घराच्या विक्रीसंबंधी त्यांचे साहाय्य मिळणे

आम्ही ज्या वसाहतीत रहात होतो, त्या वसाहतीचे अध्यक्ष एका साधिकेचे यजमान होते. सद्गुरु अनुताईंनी आम्हाला त्यांचे साहाय्य घ्यायला सांगितले. सद्गुरु अनुताईंच्या कृपेमुळे आमची वसाहतीच्या अध्यक्षांशी भेट झाली. त्यांनी आम्हाला घराच्या विक्रीच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती दिली. त्यांनी आम्हाला सोसायटीकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे सिद्ध करून घेण्याच्या दृष्टीने साहाय्य केले. त्यांनी आमची त्यांच्याच इमारतीमध्ये रहाणार्‍या ‘एजंटशी’ (दलालाशी) ओळख करून दिली. अशा पद्धतीने आमचा घराची विक्री करण्याच्या प्रत्यक्ष कृतीला आरंभ झाला.

६. घर चौथ्या माळ्यावर असूनही केवळ ‘देवाची कृपा आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करणे’ यांमुळे अल्प कालावधीत घराची विक्री होणे

त्यानंतर पुढील २ मासांत घर पहाण्यासाठी केवळ ३ व्यक्ती आल्या; पण काही झाले नाही. आम्हाला तर काहीच कळत नव्हते. सद्गुरु अनुताईंनी सांगितल्यानुसार आम्ही श्रीकृष्णाला प्रार्थना करून नामजपादी उपाय करत होतो. ऑक्टोबर २०१८ मध्ये मुंबई येथील एक व्यक्ती आली. तिला आमचे घर पसंत पडले. नोव्हेंबर २०१८ पर्यंत कागदपत्रे सिद्ध होऊन १ डिसेंबर २०१८ मध्ये आमच्या घराचे विक्रीखत (sale deed)  झाले. आम्ही चौथ्या माळ्यावर रहात होतो. आमच्या घराच्या आतील रंगकाम चांगले नव्हते, तरीही केवळ सद्गुरुंच्या कृपेने एवढ्या अल्प कालावधीत आमच्या घराची विक्री होऊ शकली आणि घराला योग्य मूल्य आले. मधल्या कालावधीत सद्गुरु अनुताईंनी २ वेळा भ्रमणभाष करून घराविषयी विचारपूस केली. त्या पुष्कळ व्यस्त असूनही त्यांनी लक्ष दिल्यामुळे आमच्या घराची विक्री होऊ शकली. ‘एजंट’नेही नियोजित रकमेपेक्षा न्यून पैसे घेतले. अशा प्रकारे आम्हाला सद्गुरु अनुताईंची प्रीती आणि कृपा अनुभवता आली.

प.पू. गुरुमाऊली, सद्गुरु अनुताईंच्या माध्यमातून आपण आम्हाला अपार कृपा आणि प्रीती अनुभवायला दिली, त्याबद्दल आपल्या आणि सद्गुरु अनुताईंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– अधिवक्त्या (सौ.) दुर्गा कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२६.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक