Rajasthan End of VIP Culture : राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफाही ‘ट्रॅफिक सिग्नल’चे पालन करणार !

  • राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा ‘व्हीआयपी’ संस्कृती संपुष्टात आणण्याचा निर्णय

  • राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा स्तुत्य निर्णय !

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा ताफा ‘ट्रॅफिक सिग्नल’चे पालन करताना

जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ‘व्हीआयपी’ संस्कृती संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री प्रवास करत असतांना त्यांच्या गाड्यांचा ताफा आता सर्वसामान्यांप्रमाणेच ‘ट्रॅफिक सिग्नल’चे पालन करणार आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राजस्थानमधील ‘व्हीआयपी’ संस्कृती संपुष्टात आणण्याच्या दिशेने हा निर्णय एक मैलाचा दगड ठरणार आहे, असे बोलले जात आहे.

१. मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जात असतांना आता वाहतुकीला लाल सिग्नल मिळाल्यावर गांड्यांचा ताफा थांबणार, अशी सूचना भजनलाल शर्मा यांनी दिली.

२. अती महनीय व्यक्तींच्या रस्त्यावरील प्रवासाच्या वेळी वारंवार होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि या कोंडीमध्ये रुग्णांना होणार्‍या त्रासापासून त्यांची सुटका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सांगितले.

३. मुख्यमंत्र्यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी राजस्थानचे पोलीस महासंचालक यू.आर्. साहू यांना या निर्णयाविषयी सूचना दिली.

सौजन्य : Amar Ujala Rajasthan

वाहतूककोंडीतून सर्वसामान्यांना दिलासा !

पोलीस महासंचालक यू.आर्. साहू म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार्‍या सुरक्षा कवचात कोणताही पालट केला जाणार नाही. ‘व्हीआयपी’ प्रवास करतांना सर्वसामान्य नागरिक आणि रुग्ण यांना होणारी वाहतूक समस्या लक्षात घेऊन नव्या व्यवस्थेचा निर्णय घेण्यात आला आहे.