मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापन या अनुषंगाने विचार करतांना यामध्ये मुख्यत्वे मध्यम आणि मोठ्या मंदिरांचा विचार केला आहे. लहान मंदिरांमध्ये यांपैकी काही सूत्रे लागू पडू शकतात. मंदिर व्यवस्थापन हा एक मोठा विषय आहे. त्यात मंदिरात भक्त आणि अन्य माध्यमांतून येणारा अर्पण निधी, सोने-चांदी यांच्या मौल्यवान वस्तू, दागिने, दान दिलेल्या भूमी, वास्तू यांचा योग्य विनियोग करणे, त्यांचा हिशोब ठेवणे इत्यादी अनेक आर्थिक सूत्रांचा समावेश होऊ शकतो. तो या लेखाचा भाग नसून केवळ भाविकांच्या दृष्टीने मंदिरांकडून कोणत्या सोयी-सुविधा देता येऊ शकतात ? यांचा विचार केला आहे. भाविकही त्यांच्या ज्ञात मंदिरांमध्ये काही सुविधा नसतील, तर मंदिर न्यास अथवा व्यवस्थापन यांच्याकडे त्यांची मागणी करू शकतात.
१. मंदिरात दर्शन घेणे
मंदिरात भाविकांना सर्वांत मुख्य अडचण असते, ती म्हणजे मंदिरात प्रवेश करून ते दर्शन घेऊन बाहेर जाण्याची पूर्ण प्रक्रिया यांविषयी माहिती नसणे आणि ती माहिती देण्यासाठी कुणी उपलब्ध नसणे. मंदिरात पहिल्यांदा येणारा, कधीतरी येणारा भाविक अंदाज घेत, मिळेल त्याला विचारत मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडतो. काही भाविक मंदिरात अनेक वेळा जातात, तरी मंदिरात काही गोष्टी ज्यामध्ये काही धार्मिक पूजाविधी केले जातात त्या विषयी आणि उपमंदिरे याविषयी अनभिज्ञ असल्याचे लक्षात येते.
मध्यम आणि मोठ्या मंदिरांमध्ये मंदिरात प्रवेश करण्यासाठी २ हून अधिक प्रवेशद्वार असतात. काही मंदिरांमध्ये त्यांना पूर्व दरवाजा, दक्षिण दरवाजा अथवा अन्य काही धार्मिक नावे असतात. मध्यम आणि मोठ्या मंदिरांचा विचार केला, तर लक्षात येते की, भाविक बंद दरवाजांच्या व्यतिरिक्त कुठूनही मंदिरात प्रवेश करतात आणि नंतर त्यांना आवरणे मंदिराच्या कर्मचार्यांना कठीण होऊन बसते.
१ अ. मंदिर आणि मंदिर परिसराचा नकाशा प्रवेशद्वारावर लावणे : शहर, नगरे यांमध्ये मंदिरांचे प्रवेशद्वार रस्त्याला लागून असते, तर बर्यापैकी मंदिरांच्या भोवती परिसर असतो. त्या परिसरात काही अंतर गेल्यावर मंदिराचे प्रवेशद्वार असते. या परिसराच्या ठिकाणी किंवा रस्त्यालगत मंदिराची एकूण रचना कशी आहे ? त्याचा नकाशा लावणे आवश्यक आहे. या नकाशामध्ये मंदिरात प्रवेश करण्यापासून ते मंदिरातून बाहेर पडण्यापर्यंत मंदिरात कोणती उपमंदिरे आहेत ? धार्मिक स्थाने कोणती आहेत ? याची माहिती असावी. प्रदक्षिणेचा मार्ग, मंदिराची वस्त्रसंहिता (मंदिरात कोणती वस्त्रे घालावीत ? आणि कोणती नको ? आणि अन्य नियम यांविषयीची माहिती) यांविषयी सूत्रे दिलेली असावीत. मंदिरात कोणत्या गोष्टींची अनुमती आहे ? अथवा नाही. (उदा. भ्रमणभाष) लॉकर व्यवस्था, चप्पल व्यवस्था यांचाही मंदिराच्या प्रांगणाच्या नियमावलीमध्ये उल्लेख हावा. चप्पल व्यवस्था नसल्यामुळे भाविक कुठेही आणि कशाही प्रकारे चपला काढतात, त्या विखुरतात आणि प्रवेशद्वाराजवळ अव्यवस्थितपणा निर्माण होतो.
१ आ. मंदिराच्या परिसरात विविध माहितीफलक लावणे : मंदिराच्या परिसरात मंदिराचा इतिहास आणि जीर्णाेद्धार कधी झाला ? यांविषयी फलक असावेत. मंदिरातील देवतेच्या मूर्तीचे शृंगारासह छायाचित्र लावलेले असावे, जेणेकरून भाविकाला मूर्तीचे स्वरूप कसे आहे ? याची एकाच पहाण्यात माहिती होईल आणि त्याला प्रत्यक्ष दर्शन घेणे सुलभ होईल. गर्दी असलेल्या, म्हणजे सतत भाविक येत असलेल्या मंदिरांमध्ये गाभार्यात मूर्तीसमोर काही मिनिटे थांबून आणि डोळे भरून देवतेचे दर्शन घेता येत नाही. परिणामी एवढा वेळ रांगेत उभे राहून केवळ काही सेकंद ते १-२ मिनिटेच दर्शन घेऊन बाहेर पडावे लागते. अशा वेळी देवतेच्या मूर्तीच्या छायाचित्राचा लाभ होतो. ज्या देवतेचे मंदिर असेल, त्या देवतेविषयी धर्मशास्त्रीय सर्व माहितीचे फलक परिसरात असले पाहिजेत. जेणेकरून भाविकाला देवतेविषयी, तिच्या रूपांविषयी, अवतारांविषयी माहिती होऊन देवतेविषयी श्रद्धा आणि भक्ती वाढू शकेल अन् त्याला देवदर्शनाचा लाभ अधिक होऊ शकेल.
मंदिराचा परिसर आणि मंदिर यांत स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. मंदिरांमध्ये छताच्या कोपर्यांमध्ये जळमटे असतात, काही मंदिरांचे घुमटही अस्वच्छ झालेले असतात. अस्वच्छ मंदिरात देवतेचा वास कसा राहू शकेल ? मंदिराच्या नियमित आणि मासिक स्वच्छतेचे नियोजनच हवे. मंदिराला रंगरंगोटी करण्यासाठी पुष्कळ मास किंवा काही वर्षे न थांबता मंदिर सात्त्विक आणि आकर्षक दिसण्यासाठी अधूनमधून रंगकाम करत राहिले पाहिजे. मंदिरात गायी-कुत्री फिरत असतात. अशांमुळे भाविकांची गैरसोय होते. त्यासाठीही योग्य ती उपाययोजना करायला हवी.
२. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर भाविकांना हात-पाय धुण्यासाठी सुविधा
सर्वांत आश्चर्याचे सूत्र, म्हणजे बहुसंख्य हिंदु मंदिरांमध्ये पाय धुऊन प्रवेश करण्याची पद्धतच नाही. मोठी मंदिरे, म्हणजे ज्योतिर्लिंग असो अथवा प्रसिद्ध देवस्थाने असो. चप्पल स्टँडवर ठेवली की, हात धुण्याचीही व्यवस्था नाही. परिणामी हात आणि पाय न धुता भाविक मंदिरात जातो, ज्या ठिकाणी गाभार्यात प्रवेश आहे, तेथे गाभार्यातही प्रवेश करतो, अनेक ठिकाणी स्पर्श करतो. अशाने मंदिरातील सात्त्विकता आणि पावित्र्य कसे टिकून रहाणार ? भाविकांनाही आध्यात्मिक लाभ कसा होणार ?
याउलट बहुतांश गुरुद्वाराच्या ठिकाणी आणि दक्षिणेतील काही मंदिरांमध्ये पाय धुण्यासाठी पाणी अखंड प्रवाहित केलेले असते किंवा अन्य व्यवस्था केलेली असते. भारतातील सर्वच मंदिरे मग ती लहान, मध्यम किंवा मोठी असोत, तेथे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हात आणि पाय धुण्याची व्यवस्था करणे, हे मंदिर व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे. हात-पाय धुऊन आणि शुद्धीसाठी तीर्थ (ज्यामध्ये गोमूत्राचा समावेश करू शकतो.) अंगावर शिंपडूनच मंदिरात प्रवेश करण्याचा नियम सर्वच मंदिरांनी सर्वांत प्रथम बनवून तो कार्यवाहीत आणला पाहिजे.
३. दर्शनार्थींना सुविधा
भाविकांच्या समवेत लहान मुले, वृद्ध व्यक्ती, तर काहींच्या समवेत अपंग व्यक्ती असतात. त्यांना चांगल्या प्रकारे दर्शन मिळू शकत नाही. ही अडचण सोडवण्यासाठी मंदिर प्रशासनाचे दुर्लक्ष होते. पटकन दर्शन देण्यासाठी पैसे भरून ‘विशेष पास’ देऊन दर्शन सुविधा उपलब्ध असते आणि अतीमहनीय व्यक्तींना मंदिराचे विशेष पास उपलब्ध असतात. त्याद्वारे त्यांना लवकर दर्शन होते. वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी मंदिर प्रशासनाने वेगळ्या रांगा ठेवल्यास त्यांनाही दर्शन घेण्यासाठी काही घंटे थांबण्याची आवश्यकता रहाणार नाही.
३ अ. रांगेतील भाविकांकडून साधना करून घेणे : मंदिरांमध्ये गाभार्याचे थेट (लाईव्ह) प्रक्षेपण पहाण्यासाठी मोठ्या स्क्रीन्सची व्यवस्था असल्यास तेही उत्तम होते. काही प्रसिद्ध देवस्थानांमध्ये ‘लाईव्ह’ (थेट) प्रक्षेपणाची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे रांगेत असतांनाही भाविकाला देवदर्शनाचा लाभ होत रहातो.
काही मंदिरांमध्ये काही मिनिटांपासून काही घंट्यांपर्यंत रांगेत उभे रहावे लागते. अशा वेळी भाविक गप्पा मारणे, भ्रमणभाष पहाणे यांमध्ये वेळ घालवतात. त्याऐवजी देवतेचे स्तोत्र, माहिती सांगणारे लघुग्रंथ त्यांना वाचण्यासाठी देऊन दर्शन झाल्यावर त्यांच्याकडून त्या परत जमा करून घेऊ शकतो. हे शक्य नसल्यास २ ते ५ रुपये मूल्याच्या पुस्तिका छापून घेऊन त्यांचे रांगेत वितरण करू शकतो.
३ आ. मंदिरात अन्य व्यवस्था : मंदिरात संबंधित देवतेचा नामजप हळू आवाजात लावून ठेवावा. त्यामुळे मंदिरातील वातावरण सात्त्विक रहाते, भाविकांना नामजप ऐकू येऊन तेही नामजप करू शकतात. त्यामुळे नामजपाचा लाभ होतो. मंदिरात प्रवेशद्वारापासून ते गाभार्याची बाहेरील बाजू, मंदिराचा इतर परिसर येथील भिंतींवर पुराणातील कथा, सात्त्विक चित्रे लावलेली असावीत. ज्या ठिकाणी भाविकांची दृष्टी जाईल, तेथे त्याच्या समोर सात्त्विक कलाकृतीच दिसली पाहिजे आणि तो त्याच विचारात राहू शकेल, अशी व्यवस्था हवी. उदाहरणार्थ श्रीरामाचे मंदिर असेल, तर रामरक्षास्तोत्र अथवा करुणास्तोत्र, मारुतीचे मंदिर असल्यास मारुतिस्तोत्र वा हनुमान चालिसा, श्री गणेशाचे मंदिर असल्यास श्री गणेशस्तोत्र, अथर्वशीर्ष फलकावर लावावे.
४. दर्शनानंतर भाविकांना उपासनेसाठी जागा हवी !
देवतेचे दर्शन झाल्यावर भाविकांना काही वेळ तरी नामजप करत शांतपणे बसण्यासाठी जागा किंवा मंदिरातच एका ठिकाणी बसण्याची तशी व्यवस्था हवी. देवतेचे दर्शन झाल्यावर काहींचा भाव जागृत होतो, काहींना ध्यान लागल्याची अनुभूती येते. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याला अनुभूती येते. ती काही वेळ तरी टिकून रहाण्यासाठी, त्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी अशा जागेची व्यवस्था करून देणे, हे मंदिर प्रशासनाचे कर्तव्य आहे. काही मंदिरांमध्ये अशी व्यवस्था असते की, भाविक मंदिरात कुठेही बसला, तरी त्याला गाभार्यातील देवतेच्या मूर्तीचे दर्शन होत राहील.
५. सुसज्ज ग्रंथालय हवे !
मंदिरात हिंदु धर्मशास्त्राचे महत्त्व सांगणारे, हिंदु संस्कृतीविषयी अवगत करणारे सुसज्ज असे ग्रंथालय असणे आवश्यक आहे. त्यामध्ये हिंदु धर्माशी संबंधित प्राथमिक आणि सखोल ज्ञान असणारे ग्रंथ हवेत अन् ते भाविकांना वाचण्यासाठी उपलब्ध असावेत.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल (३०.१.२०२४)