Corona WHO : जगभरात एका महिन्यात कोरोनाच्या संसर्गामध्ये ५२ टक्क्यांची वाढ ! – जागतिक आरोग्य संघटना

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या काळात जगभरात कोरोनाचे एकूण ८ लाख ५० सहस्र नवीन रुग्ण आढळले, तर ३ सहस्र लोकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी गेल्या महिनाभरात मृतांच्या संख्येत ८ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली.

कोरोनामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांचा मृत्यू !

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोनाचा जगभरात संसर्ग झाल्यापासून  १७ डिसेंबरपर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७ कोटींहून अधिक झाली आहे, तर आतापर्यंत ७० लाख लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचे मोठ्या संख्येने नवीन रुग्ण आढळले असून त्यांपैकी १ सहस्र ६०० हून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना अतीदक्षता विभागामध्ये भरती करावे लागले आहे. जागतिक स्तरावर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर अतीदक्षता विभागामध्ये रुग्णांच्या संख्येत ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.