‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षी करत असलेल्या मार्गदर्शनानुसार त्या भारतातील विविध तीर्थक्षेत्री जाऊन ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी प्रार्थना आणि यज्ञयागादी धार्मिक कृती करतात. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गुरुकृपायोगानुसार साधना करून जलद गतीने आध्यात्मिक उन्नती साध्य केली. त्यांच्या जन्मकुंडलीतील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढील लेखात केले आहे.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे व्यक्तीमत्त्व दर्शवणारे घटक
१ अ. लग्नरास (कुंडलीतील प्रथम स्थानातील रास) : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कुंडलीत प्रथम स्थानात ‘कन्या’ रास आहे. असे असल्यास व्यक्तीत समंजसपणा, वैचारिक प्रगल्भता, विवेकबुद्धी, जिज्ञासा, सेवाभाव आणि मायेपासून अलिप्तता ही वैशिष्ट्ये असतात. कन्या रास सत्त्वगुणी असल्याने व्यक्तीच्या चित्तावर जन्मतः सात्त्विक संस्कार असतात.
१ आ. जन्मरास (कुंडलीतील चंद्राची रास) : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कुंडलीत चंद्र ‘वृषभ’ राशीत आहे. वृषभ राशीचा चंद्र सहजता, निर्मळता, इतरांशी जवळीकता साधण्याची कला, प्रेमभाव, सौंदर्य, कलानिपुणता आणि निसर्गप्रियता ही वैशिष्ट्ये देतो. वृषभ राशीचे लोक स्वतः आनंदी असतात अन् इतरांनाही आनंद देतात.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जन्मकुंडलीत आढळणारी वैशिष्ट्ये
२ अ. कलानिपुणता देणारा ‘स्वाती’ नक्षत्रातील शुक्र : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह ‘स्वाती’ नक्षत्रात आहे. शुक्र ग्रह कला, सौंदर्य, प्रेमभाव यांच्याशी संबंधित आहे, तर ‘स्वाती’ नक्षत्र सुलक्षणी आणि सात्त्विक नक्षत्र आहे. हा योग कलानिपुणता देतो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या बालपणी रांगोळी, हस्ताक्षर, चित्रकला, वक्तृत्व, खेळ, संगीत अशा अनेक क्षेत्रांमध्ये अग्रेसर होत्या. मोठेपणी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना त्यांनी उत्कृष्ट आणि भावपूर्ण मुलाखत घेणे, मुलाखतीमध्ये अभंगांसारखी पदे रचून सर्वांना भावविभोर करणे, साधनाविषयक कार्यक्रमांचे आयोजन परिपूर्णरित्या करणे, तीर्थक्षेत्रांवरून आणलेल्या दुर्मिळ वस्तूंचे सुंदररित्या प्रदर्शन लावणे इत्यादी कलागुणांची आवश्यकता असलेल्या सेवा केल्या.
२ आ. जन्मतः प्रेमभावाची देणगी लाभणे : ‘प्रेमभाव’ हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा स्थायी भाव आहे. त्यांच्या कुंडलीत ‘गुरु’ आणि ‘शुक्र’ या ग्रहांची युती आहे. हा योग त्यांना जन्मतः प्रेमभावाची देणगी लाभल्याचे दर्शवतो. समोरील व्यक्तीला ‘अधिकाधिक प्रेम कसे देता येईल’, यासाठी त्यांची धडपड असते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या आध्यात्मिक दौर्यावर असतांना त्यांचा निवास स्थानिक साधकांकडे असतो. तेव्हा साधकांच्या कुटुंबियांशी त्या समरस होतात. कुणा साधकाच्या घरची परिस्थिती चांगली नसेल, तर त्यांच्याकडे जातांना दूध, स्वयंपाकासाठी भाजी इत्यादी घेऊन जातात. सकाळचे काही अन्न उरले असल्यास प्रथम ते वाढण्यास सांगतात. रात्री झोपण्यापूर्वी कुटुंबातील सर्व सदस्यांशी आपुलकीने बोलतात. त्यामुळे दुसर्या दिवशी निरोप घेतांना कुटुंबियांचे डोळे पाणावतात. याविषयी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणतात, ‘आपण इतरांसाठी जीव ओतायचा असतो. मी त्यांना केवळ प्रेम देते. ते त्यांच्या आयुष्यभर लक्षात रहाते.’
२ आ १. इतरांशी जवळीकता साधण्याची कला : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या अनोळखी व्यक्तीलाही सहजतेने आपलेसे करून घेतात. त्यांच्या संपर्कात एकदा आलेली व्यक्ती कायमस्वरूपी त्यांच्याशी जोडली जाते. समाजातील अनेक संतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्यातील प्रेमभावामुळे जोडून ठेवले आहे. ते संतांची आणि संतांच्या कुटुंबियांची वेळोवेळी विचारपूस करतात. प्रेमभावामुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पुष्कळ मोठा आध्यात्मिक लोकसंग्रह निर्माण केला आहे.
२ इ. गुरूंप्रती उत्कट भाव असणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कुंडलीत ‘गुरु’ आणि ‘शुक्र’ या ग्रहांची असलेली युती गुरूंप्रती जन्मतः भाव दर्शवते. वर्ष २०१३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘पू. (सौ.) अंजली गाडगीळ म्हणजे भावाचे सगुण रूप !’ असे म्हटले होते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेत्रांतून गुरूंप्रतीच्या उत्कट भावाचे दर्शन होते. ‘प्रत्येक कृती गुरूंना अपेक्षित अशीच व्हायला हवी’, असा त्यांचा ध्यास असतो. त्या सर्वांना त्यांच्या भावपूर्ण वाणीने भावविभोर करतात. नाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षि त्यांचे पुष्कळ कौतुक करतात. ते सारखे म्हणतात, ‘तू आमची पुत्री आहेस. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तुला आमच्याकडे पाठवले आहे. तुझ्याकडून एकही चूक होत नाही.’ एवढे कौतुक होत असतांनाही ‘आपण विशेष आहोत’, असे त्यांना वाटत नाही.
२ ई. पूर्णवेळ साधनेसाठी मायेचा त्याग करणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कुंडलीत आठव्या स्थानात शनि ग्रह आणि बाराव्या स्थानात केतू ग्रह आहे. हा एक ‘संन्यासयोग’ आहे. हा योग वैराग्य आणि त्याग दर्शवतो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांचे पती सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ हे दोघे उच्चशिक्षित असूनही ऐन तारुण्यात त्यांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी त्यांची मुलगी कु. सायली (आताच्या सौ. सायली सिद्धेश करंदीकर) केवळ ५ वर्षांची होती. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे एकमेकांशी असलेले नाते आध्यात्मिक स्तरावरील आहे. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी पूज्यभाव आहे.
कृतज्ञता
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करण्याची संधी मिळाली, याविषयी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद) आणि श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अलौकिक वैशिष्ट्ये
१. संगीताच्या माध्यमातून साधना
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘संगीत विशारद’ आहेत. संगीत हे ईश्वरप्राप्तीचे एक साधन आहे. आजकाल बहुतांश कलाकार त्यांच्या कलेचा उपयोग पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वर्ष २००१ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार संगीताच्या माध्यमातून साधना चालू केली. त्यांना गुरुकृपेने संगीताविषयी बरेच आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी संगीतातील चैतन्याची, म्हणजे ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेतली. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी संगीतातील विविध स्वर अन् राग यांचे प्रयोग करून त्यांचे स्वतः अनुभव घेतले, उदा. मल्हार राग गातांना तोंडात लाळ गोळा होणे, दीप रागाचे स्वर आळवतांना थंडीच्या दिवसांतही उष्णता अनुभवणे इत्यादी. एवढेच नाही, तर त्यांना विविध गंधर्व, किन्नर आणि स्वरदेवता यांची दर्शनेही झाली आहेत.’ – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
२. अहं-निर्मूलनासाठी तळमळीने प्रयत्न करून आदर्श प्रस्थापित करणे
यासंदर्भात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणतात, ‘आरंभी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझा अहं सर्वसाधारण व्यक्तीइतका, म्हणजे ३० टक्के असल्याचे सांगितले. त्यांनी अहं न्यून होण्यासाठी मला स्वयंपाकघरात सेवा करण्यास सांगितले. हा पालट मी तत्परतेने स्वीकारला. ‘आपल्याला जे सांगतील, त्याचे आज्ञापालन आपण सुंदररित्या कसे करू शकतो’, याकडे लक्ष दिले. सेवेत माझ्याकडून झालेल्या चुका मी अन्य साधकांना सांगायचे. प्रत्येक साधकाला ‘मी तुमच्याकडून आणखी कसे शिकू शकते ? मला साधनेत साहाय्य करा’, असे सांगून प्रयत्न केले. हे प्रयत्न करत असतांना मला अहं न्यून करण्यासाठी स्वयंपाकघरात पाठवले आहे, हेच मी विसरून गेले होते. ‘ईश्वरप्राप्ती’ या मूळ ध्येयाची जाणीव असल्यानेच आनंद मिळत गेला. २ मासांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझा अहं १० टक्के झाल्याचे सांगितले.’
वर्ष २००३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ या ग्रंथाचे संकलन केले.
३. गुरुकृपेने अद्वितीय अशा सूक्ष्मज्ञानाची प्राप्ती होणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कुंडलीत ‘गुरु’ आणि ‘नेपच्यून’ यांची युती आहे, तसेच त्यांच्या समोर चंद्र आहे. हा योग ‘अंतःस्फूर्ती आणि सूक्ष्मज्ञानाची प्राप्ती’ हे परिणाम दर्शवतो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना गुरुकृपेने वर्ष २००३ पासून सूक्ष्मातील ज्ञान मिळू लागले. कोणत्याही विषयासंबंधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या लगेच संगणकावर टंकलिखित करत. ही एक अभूतपूर्व घटना होती. हे ज्ञान पृथ्वीवरील अन्य कोणत्याही ग्रंथांत उपलब्ध नाही. त्यांनी १२ वर्षे ज्ञानप्राप्तीची सेवा केली. याद्वारे त्यांनी संपूर्ण मानवजातीला एक अनमोल ज्ञानभांडार उपलब्ध करून दिले.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेला आध्यात्मिक दौरा
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा ज्ञानप्राप्तीच्या साधनेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष २०१२ मध्ये त्यांना अध्यात्मप्रसार करण्यासाठी दौरा करण्यास सांगितला. या काळात त्यांनी अनेक सुप्रसिद्ध वैज्ञानिकांची भेट घेऊन त्यांच्याशी ‘आध्यात्मिक कारणांमुळे वस्तू आणि व्यक्ती यांच्यामध्ये होणारे सकारात्मक आणि नकारात्मक पालट’ यासंबंधी चर्चा केली, तसेच त्यांनी अध्यात्मातील अनेक अधिकारी संतांना भेटून त्यांना आपलेसे केले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन तीर्थक्षेत्रांसंबंधी माहिती मिळवणे, चित्रीकरण करणे, जतन करण्यायोग्य दुर्मिळ वस्तू मिळवणे, वैज्ञानिक उपकरणांद्वारे आध्यात्मिक संशोधन करणे आदी कार्य केले.
५. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार चालू असलेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा दैवी दौरा !
वर्ष २०१४ पासून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा दैवी दौरा चालू आहे. याला ‘दैवी दौरा’ म्हणण्याचे कारण असे की, जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून प्रत्यक्ष सप्तर्षी या दौर्याचे संचालन करत आहेत. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत आणि पुराणे यांमध्ये ज्या ज्या मुख्य स्थानांचा उल्लेख येतो, त्यातील बहुतांश तीर्थक्षेत्री श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ जाऊन आल्या आहेत. त्यांच्या कुंडलीत तृतीय (प्रवास) स्थानात रवि, गुरु आणि नेपच्यून हे ग्रह आहेत, तसेच नवम (भाग्य) स्थानात चंद्र आहे. हे योग तीर्थक्षेत्री प्रवास दर्शवतात.
तीर्थक्षेत्री जाऊन श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी प्रार्थना, यज्ञयाग, अनुष्ठाने अन् पूजा-अर्चा करतात. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यात बाधा आणणार्या सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे बळ न्यून होत आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ज्या-ज्या स्थळी जातात, त्या-त्या स्थळांची त्यांच्या चरणस्पर्शामुळे शुद्धी होते.
६. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील ‘श्री महालक्ष्मीतत्त्व’ जागृत होणे
सप्तर्षींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात ‘श्री महालक्ष्मीतत्त्व’ असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कुंडलीतील शुक्र, गुरु आणि नेपच्यून या ग्रहांची असलेली युती ‘श्री महालक्ष्मीतत्त्वा’ची दर्शक आहे. काळानुसार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील ‘श्री महालक्ष्मीतत्त्व’ जागृत झाले आहे.
सप्तर्षींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे तीन गुरु अवतारी असून ते ‘धर्मसंस्थापना’ करणार असल्याचे नाडीपट्टीत लिहिले आहे.’
– श्री. यशवंत कणगलेकर आणि श्री. राज कर्वे (सर्व सूत्रांचा दिनांक ५.५.२०२३)