Narakasur-dahan Malpractice : गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा जाळलेले अवशेष रस्त्यावरच !

वाहनांचे टायर पंक्चर होण्याच्या घटना

Diwali Deepawali diwali 2023 deepawali 2023 Narakchaturdashi

प्रतिमा जाळल्यानंतर लोखंडी सांगाडा आणि खिळे रस्त्यावरच !

पणजी : दिवाळीच्या दिवशी पहाटे नरकासुराच्या प्रतिमा बहुतेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जाळण्यात आल्या. नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी लोखंडी सांगाडा, खिळे आदींचा वापर केला जातो. प्रतिमा जाळल्यानंतर लोखंडी सांगाडा आणि खिळे रस्त्यावरच रहात असल्याने दक्षिण गोव्यातील अनेक वाहनचालकांना वाहने पंक्चर होण्याच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

दीपावलीच्या पूर्वसंध्येला अपघातासंबंधी ‘१०८’ वर ६५ जणांनी संपर्क केले

यंदा ११ नोव्हेंबर या दिवशी दीपावलीच्या पूर्वसंध्येला ‘१०८’ या आपत्कालीन सेवेसाठी एकूण ६५ जणांनी संपर्क (कॉल्स) केले. आपत्कालीन घटनांमध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला ध्वनीप्रदूषणासंबंधी ६२, तर आग लागण्यासंबंधी १७ तक्रारी आल्या आहेत.

पणजी पोलिसांकडून ७ ‘म्युझिक सिस्टम’ कह्यात

राज्यात अनेक ठिकाणी नरकासुर प्रतिमादहन प्रथेच्या नावाने नियमांचे उल्लंघन करून कर्णकर्कश संगीत लावून धिंगाणा घालण्याचा प्रकार घडला. अनेक ठिकाणी वेळ संपल्यानंतरही कर्णकर्कश संगीत चालूच ठेवणार्‍यांना पोलिसांनी प्रथम संगीत बंद करण्यास सांगितले आणि ज्यांनी ऐकले नाही, त्यांच्या संगीत यंत्रणा कह्यात घेतल्या. पणजी पोलिसांनी अशा प्रकारे एकूण ७ यंत्रणा कह्यात घेतल्या. पणजी पोलीस ठाण्यात दीपावलीच्या पूर्वसंध्येला कर्णकर्कश संगीत लावणे आणि धिंगाणा घालून त्रास करणे यासंबंधी एकूण १०० हून अधिक तक्रारी आल्या. उपनिरीक्षक मयुर पणशीकर आणि त्यांच्या पथकाने प्रत्येक ठिकाणी जाऊन कर्णकर्कश संगीत बंद करण्यास सांगितले. कारवाई करतांना काही ठिकाणी युवकांनी पोलिसांशी हुज्जत घातली; मात्र पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकले नाही.