पोटदुखी (Abdominal pain) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

‘घरच्‍या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक १२) !

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता, आम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

२९ सप्‍टेंबर या दिवशीपासून आपण प्रत्‍यक्ष आजारावरील स्‍वउपचार समजून घेत आहोत. त्‍या अंतर्गत २० ऑक्‍टोबर या दिवशी आपण ‘बद्धकोष्‍ठता’ या आजारावर घ्‍यावयाची काळजी अन् त्‍यावरील औषधे’, यांविषयी माहिती वाचली. ‘प्रत्‍यक्ष आजारांवर स्‍वउपचार चालू करण्‍यापूर्वी २५ ऑगस्‍ट, १ आणि ८ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झालेल्‍या लेखांतील ‘होमिओपॅथी स्‍वउपचारांच्‍या संदर्भातील सूत्रे’ वाचून समजून घ्‍यावीत आणि त्‍यानुसार प्रत्‍यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे आणि डॉ. अजित भरमगुडे

पोटामध्‍ये सौम्‍य ते तीव्र वेदना विविध कारणांनी होऊ शकतात. प्रत्‍येक कारणानुसार त्‍याचा विशिष्‍ट उपचार घेणे आवश्‍यक असते; परंतु पोटदुखीचे निश्‍चित निदान होईपर्यंत आपण पुढे दिल्‍याप्रमाणे औषधोपचार चालू करू शकतो. पोटदुखी या लक्षणाच्‍या व्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणती वैशिष्‍ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्‍यावे, हे औषधांच्‍या नावापुढे दिले आहे.

१. मॅग्‍नेशियम फॉस्‍फोरिकम् (Magnesium Phosphoricum)

पोटामध्‍ये वेदना होत असतांना त्‍वरित वेदनामुक्‍ती व्‍हावी यासाठी वेदना चालू होताच त्‍वरित या औषधाच्‍या ४ गोळ्‍या अर्धा कप कोमट पाण्‍यामध्‍ये विरघळवून त्‍यातील १ चमचा पाणी प्रत्‍येक १५ मिनिटांनी वेदना थांबेपर्यंत घ्‍यावे.

डॉ. प्रवीण मेहता

२. कोलोसिंथिस (Colocynthis)

२ अ. राग आणि अपचन यांमुळे पोटामध्‍ये वेदना होणे

२ आ. वेदनांमुळे रुग्‍ण अस्‍वस्‍थ होणे

२ इ. रुग्‍ण तळमळून विव्‍हळत असणे

२ ई. अन्‍न किंवा पेय ग्रहण केल्‍यानंतर वेदनांमध्‍ये वाढ होणे

२ उ. पोट हातांनी दाबून धरून पुढे वाकले असता रुग्‍णाला बरे वाटणे

३. डायोस्‍कोरिया व्‍हिल्लोसा (Dioscorea Villosa)

३ अ. पोटामध्‍ये कापल्‍याप्रमाणे, पिळवटल्‍याप्रमाणे असह्य वेदना होणे आणि त्‍या शरिराच्‍या हात, पाय इत्‍यादी निरनिराळ्‍या भागांकडे जाणे

डॉ. अजित भरमगुडे

३ आ. पुढे वाकल्‍यामुळे आणि पडून राहिल्‍यामुळे वेदनांमध्‍ये वाढ होणे

३ इ. पाठीमागे वाकल्‍यामुळे, ताठ उभे राहिल्‍यामुळे बरे वाटणे

४. चायना ऑफिसिनॅलिस (China Officinalis)

४ अ. प्रतिदिन ठराविक वेळेला पोटामध्‍ये वेदना होण्‍यास आरंभ होणे

४ आ. पोटामध्‍ये पुष्‍कळ प्रमाणात वायू (gases) धरून पोट फुगणे

४ इ. मोठा आवाज येऊन ढेकरा येणे; परंतु त्‍याने वेदना न्‍यून (कमी) न होणे

५. कल्‍केरिया कार्बोनिका (Calcarea Carbonica)

५ अ. पोटामध्‍ये दबून राहिलेल्‍या वायूमुळे (gases मुळे) वेदना आरंभ होणे

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

५ आ. पोटामध्‍ये थंडपणा जाणवून पोटाचा खळगा फुगणे आणि पोट उलट्या ठेवलेल्‍या बशीप्रमाणे दिसणे

५ इ. पोटाभोवती वस्‍त्राचा दाब सहन न होणे

६. एनाकार्डियम ओरिएंटेल (Anacardium Orientale) : रिकाम्‍या पोटी पोट दुखणे, जेवल्‍याने पोटदुखी तात्‍पुरती न्‍यून होणे

७.  एबीस नायग्रा (Abies Nigra) : खाल्‍ल्‍यानंतर पोट दुखणे

८. सायक्‍लमेन (Cyclamen)

८ अ. रात्रीच्‍या वेळी पोटामध्‍ये वायू होऊन (gases होऊन) वेदना आरंभ होणे

८ आ. उठून उभे राहिले, तसेच चालले असता बरे वाटणे

‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्‍येक शुक्रवारी लेखाच्‍या रूपात प्रसिद्ध करण्‍यात येत आहे. तरी स्‍वउपचार करण्‍याच्‍या दृष्‍टीने साधक, वाचक, राष्‍ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्‍काळाच्‍या दृष्‍टीने संग्रही ठेवावेत. आपत्‍काळात डॉक्‍टर, वैद्य कुणीही उपलब्‍ध नसतील, त्‍या वेळी ही लेखमाला वाचून स्‍वतःच स्‍वतःवर उपचार करता येईल.