सातारा, १७ ऑगस्ट (वार्ता.) – न्यायालयाच्या एका निर्णयाला विरोध दर्शवत गेल्या ३ मासांपासून मणीपूर येथे नियोजनबद्ध हिंसाचार चालू आहे. काश्मीरप्रमाणे मणीपूर हिंदुविहीन करण्याचे षड्यंत्र तेथील कुकी (ख्रिस्ती) समाजाकडून आखले जात आहे. याचसमवेत मेवात, देहली आणि मणीपूर येथील हिंसाचारात राष्ट्रीय संपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. ही हानी करणार्या दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे श्री. रवींद्र ताथवडेकर यांनी केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. या वेळी हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी, अधिवक्ता धनंजय चव्हाण, धर्मभिमानी श्री. विश्वास सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सौ. रूपा महाडिक, सौ. भक्ती डाफळे, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये म्हटले आहे की, देहली येथे मोहरमच्या मिरवणुकीत नियोजनपूर्वक हिंसाचार करून लहान मुलांच्या माध्यमातून हिंदू, तसेच शासनाच्या बसगाड्या यांवर आणि सार्वजनिक मालमत्तेवर आक्रमणे करण्यात आली. ३१ जुलै या दिवशी हरियाणातील मेवातमधील नूंह येथे श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाच्या मंदिरात अभिषेकासाठी गेलेल्या सहस्रो हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. सध्या देशात अल्प-अधिक प्रमाणात अशी हिंसक आक्रमणे होत आहेत. या माध्यमातून सहिष्णू हिंदूंमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यामुळे अशा घटनांच्या माध्यमातून मोठ्या गृहयुद्धाची सिद्धता चालू नाही ना ? अशी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे अशी हिंसक दंगल घडवणार्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून हानीभरपाई घेण्यात यावी.