घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !

आजपासून प्रत्‍येक शुक्रवारी वाचा ‘होमिओपॅथी’विषयी नवीन लेखमाला !

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, मलेरिया, बद्धकोष्‍ठता, अम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ?

होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या नवीन लेखमालेद्वारे देत आहोत. ‘सनातन प्रभात’च्‍या वाचकांसह साधक, कार्यकर्ते, धर्मप्रेमी, वाचक, हितचिंतक अशा सर्वांनाच याचा लाभ होईल.

संकलकांचे मनोगत

डॉ. प्रवीण मेहता

तज्ञ वैद्यकीय सल्ला किंवा बाजारात औषधे उपलब्‍ध नसतांनाही स्‍वतःवर किंवा इतरांवर होमिओपॅथी चिकित्‍सापद्धतीनुसार किमान तरी उपचार करता यावे, या हेतूने ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत. थोडक्‍यात, यातील लेख ‘घरगुती होमिओपॅथी उपचार’ या भूमिकेतून लिहिण्‍यात आले आहेत, ‘होमिओपॅथी डॉक्‍टरांना पर्याय’ या दृष्‍टीकोनातून नाही. त्‍यामुळे या लेखमालेत प्रामुख्‍याने छोट्या कालावधीचे आजार, तसेच दीर्घकालीन आजारांमध्‍ये जेव्‍हा लक्षणे मधे मधे डोके वर काढतात (acute flare ups), यांवरील होमिओपॅथी औषधांची माहिती दिली आहे.

होमिओपॅथीमधील औषधे नैसर्गिक स्रोतांपासून बनवलेल्‍या द्रव्‍यांची निरोगी व्‍यक्‍तींवर चाचणी करून बनवलेली असतात. त्‍यामुळे या औषधांमुळे काही हानी होणे अक्षरशः अशक्‍य असते. चुकून अयोग्‍य औषध निवडले गेले, तरी त्‍यामुळे रुग्‍णाला मूळ आजाराहून अधिक त्रास सहन करावा लागेल, असे नाही.

डॉ. अजित भरमगुडे

ही लेखमाला सामान्‍य वाचकाच्‍या दृष्‍टीकोनातून लिहिलेली आहे. त्‍यामुळे या लेखमालेचा लाभ घेऊन उपचार करण्‍यासाठी वैद्यकीय ज्ञानाची किंवा या शास्‍त्रातील प्रशिक्षणाची आवश्‍यकता नाही; कारण होमिओपॅथीमध्‍ये ‘रुग्‍णातील लक्षणे जाणून घेऊन ती लक्षणे नाहीशी करण्‍यासाठी, कोणत्‍या होमिओपॅथी औषधामध्‍ये गुणधर्म आहेत’ यानुसार औषधे दिली जातात.  आपत्‍काळात स्‍वउपचार करता येण्‍यासाठी वाचकाला औषधे आधीच खरेदी करून ठेवावी लागणार असल्‍याने, लेखमालेत प्रत्‍येक आजाराच्‍या उपचारासाठी वापरायच्‍या औषधांची किमान संख्‍या देण्‍यात आली आहेे.

डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे

गंभीर दुखापत आणि आजार यांवर तज्ञ वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत. अशा प्रसंगी वैद्यकीय मदत त्‍वरित उपलब्‍ध नसेल, तर ती पोचेपर्यंत होमिओपॅथी औषध देऊ शकतो.

या लेखमालेमुळे स्‍वतःबद्दल कशा प्रकारची माहिती होमिओपॅथी डॉक्‍टरांना देणे आवश्‍यक असते, हेही रुग्‍णांना लक्षात येईल. ‘या लेखमालेचा लाभ घेऊन सर्वजण निरामय जीवनाला प्राप्‍त होवोत’, ही श्री गुरुचरणी अनन्‍यभावे प्रार्थना ! – संकलक

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

१०० हून अधिक आजारांवरील औषधांची माहिती !

‘बाराक्षार’ औषधेही समाविष्‍ट !

१. होमिओपॅथी म्‍हणजे काय ?

होमिओपॅथी हा शब्‍द ‘होमिओस (Homois) आणि ‘पॅथोस’ (Pathos) या दोन ग्रीक भाषेतील शब्‍दांपासून बनलेला आहे. ‘होमिओस’ म्‍हणजे साम्‍य आणि ‘पॅथोस’ म्‍हणजे रोग किंवा रोगाची लक्षणे. होमिओपॅथी ही एक अशी उपचारपद्धत आहे ज्‍यामध्‍ये रुग्‍णांना असे औषध दिले जाते जे निरोगी व्‍यक्‍तीला दिल्‍यावर तिच्‍यामध्‍ये रुग्‍णाप्रमाणे लक्षणे दिसू लागतील, उदा. सर्दी बरी करण्‍यासाठी असलेले ‘एलियम सेपा’ हे औषध निरोगी व्‍यक्‍तीला दिले, तर तिच्‍यामध्‍ये नाकातून पुष्‍कळ प्रमाणात जळजळणारा स्राव वहाणे, त्‍यामुळे नाक आणि वरच्‍या ओठाची त्‍वचा सोलपटणे, सतत शिंका येणे, डोळ्‍यांंतून न जळजळणारे पाणी वहाणे, अशी सर्दीची लक्षणे निर्माण होतात.

२. होमिओपॅथीचे जनक डॉ. हानेमान

डॉ. सॅमुएल हानेमान हे जर्मनी येथील एक आधुनिक वैद्य (अ‍ॅलोपॅथीचे डॉक्‍टर) होते. वर्ष १७८१ मध्‍ये त्‍यांनी खासगी व्‍यवसाय आरंभ केल्‍यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील तत्‍कालीन उपचारपद्धतीच्‍या विषयी ते असमाधानी होते, विशेषतः ‘उपचार म्‍हणून रुग्‍णाच्‍या रक्‍तवाहिन्‍यांतून रक्‍त काढणे (bloodletting)’, अशा प्रकारच्‍या उपचारांबद्दल ते असमाधानी होते. ‘त्‍यांना शिकवलेले वैद्यकशास्‍त्र काही वेळा रुग्‍णाच्‍या लाभापेक्षा हानी अधिक करते’, असे त्‍यांचे मत होते. त्‍यांची कर्तव्‍यबुद्धी त्‍यांना वैद्यकशास्‍त्राचा आजार आणि औषधे यांबद्दल पूर्ण अभ्‍यास नसतांना रुग्‍ण बांधवांवर उपचार करू देत नव्‍हती. त्‍यामुळे नवविवाहित असूनही त्‍यांनी आपला वैद्यकीय व्‍यवसाय बंद करून व्‍यावसायिक भाषांतरकार म्‍हणून काम आरंभ केले.

भाषांतराच्‍या कामाच्‍या अंतर्गत वर्ष १७९० मध्‍ये त्‍यांच्‍याकडे आधुनिक वैद्य क्‍युलेन यांच्‍या ‘मटेरिया मेडिका’वरील प्रबंधाचे (A treatise on the Materia Medica) जर्मन भाषेमध्‍ये भाषांतर करण्‍याचे काम आले. त्‍या प्रबंधात ‘सिंकोना’ (cinchona) या एका झाडाच्‍या सालीतील कडवटपणामुळे ते हिवताप (malaria) या आजारावर गुणकारी ठरते’, असा उल्लेख त्‍यांना आढळला. ‘अन्‍य कडू वस्‍तू हिवतापावर गुणकारी नाहीत’, असे श्री. हानेमान यांचे निरीक्षण होते. त्‍यामुळे त्‍यांनी स्‍वतःवर प्रयोग करून ‘सिंकोना’च्‍या मानवी देहावरील परिणामावर संशोधन आरंभ केले. हे औषध स्‍वतः घेतल्‍यावर त्‍यांच्‍यामध्‍ये हिवतापाची लक्षणे निर्माण झाली. यावरून कोणत्‍याही निरोगी व्‍यक्‍तीने हे औषध घेतल्‍यावर तिच्‍यात हिवतापाची लक्षणे निर्माण होणार, या निष्‍कर्षाप्रत ते पोचले.

त्‍यानंतर त्‍यांनी ‘सिंकोना’ हे औषध घेतल्‍यावर होणार्‍या शारीरिक आणि मानसिक परिणामांच्‍या लक्षणांची बारकाईने नोंद केली. ती लक्षणे वरवर ठाऊक असलेल्‍या त्‍या औषधाच्‍या गुणधर्मांच्‍या संख्‍येपेक्षा पुष्‍कळ पटींनी अधिक असल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. इतक्‍यानेही पूर्ण निश्‍चिती न झाल्‍याने त्‍यांनी आणखी एकदा स्‍वतःवर आणि आपल्‍या मित्रवर्गावर प्रयोग करून त्‍याचा अनुभव घेतला अन् खात्री केली. त्‍यामुळे ‘औषधाचे पूर्ण गुणधर्म जाणून घेण्‍यासाठी ते औषध निरोगी माणसावर प्रमाणसिद्ध (prove) करून पाहिले पाहिजे’, असे त्‍यांच्‍या लक्षात आले. त्‍यानंतर अ‍ॅकोनाईट, बेलाडोना, नक्‍स व्‍हॉमिका, आर्सेनिकम्, मर्क्‍युरी, सल्‍फर इत्‍यादी औषधी द्रव्‍यांचाही असाच अनुभव घेऊन आणि तीच औषधे सूक्ष्म प्रमाणात रुग्‍णांना देऊन चांगला गुण आलेला त्‍यांनी पाहिला अन् त्‍याची निश्‍चिती केली.

या पद्धतीने उपचार करत असतांना त्‍यामधूनच त्‍यांना होमिओपॅथीचे तत्त्व स्‍फुरले आणि वर्ष १७९६ मध्‍ये त्‍यांनी ‘नवीन तत्त्वावरील प्रबंध’ (Essay on New Principle) प्रसिद्ध केले. त्‍यानंतर त्‍यांनी या तत्त्वाच्‍या आधारे पुन्‍हा खासगी वैद्यकीय व्‍यवसाय आणि होमिओपॅथी या उपचारपद्धतीचा प्रसार यांना आरंभ केला.

(क्रमश : पुढील शुक्रवारी)

आगामी ‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या ग्रंथातील निवडक भाग प्रत्‍येक शुक्रवारी लेखाच्‍या रूपात प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे. तरी साधक, वाचक, राष्‍ट्र आणि धर्म प्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख संग्रही ठेवावेत.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/711919.html