‘१६.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान, गोवा येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी देवाने आमच्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. श्री. रणजीत विक्रम सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई
अ. श्री. सावरकर यांच्या घराण्यावर भगवतीची कृपा आहे. त्यामुळे त्या घराण्याकडून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य प्रभावीपणे आणि परिणामकारक होत आहे.
आ. त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड आहे.
इ. ते तत्त्वनिष्ठ आहेत. त्यामुळे हिंदु धर्माच्या कार्याला कितीही विरोध झाला, तरी ते त्यांचा विषय ठामपणे मांडतात.
ई. त्यांच्यात निर्भयता असल्याने ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्र यांचा सत्य इतिहास समाजासमोर मांडतात.
उ. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे राष्ट्राला माता मानून त्याची सेवा करतात.
ऊ. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि प्रेमळ आहे. त्यामुळे ते सर्वांशी सहजतेने जवळीक साधतात. त्यांचे व्यक्तीमत्त्व प्रांजळ आहे. त्यामुळे त्यांच्या आत-बाहेर एकच विचार असतो.
ए. त्यांच्या मनात, ‘मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा जपून तो सर्वांपर्यंत पोचवायचा आहे’, असा विचार असतो. ‘राष्ट्रभक्त’ कसे असतात ? ’, याचे ते मूर्तीमंत रूप आहेत.
ऐ. श्री. सावरकर यांच्यात हिंदु जागृतीची पुष्कळ तळमळ आहे. यामुळे ते सतत उत्साही आणि कार्यरत रहातात.
ओ. सामान्य व्यक्तीच्या तुलनेत त्यांची कार्यशक्तीची प्रभावळ ३० टक्के अधिक आहे. त्यामुळे त्यांची कार्य करण्याची गती आणि फलनिष्पत्ती पुष्कळ अधिक आहे, असे लक्षात येते.
औ. श्री. सावरकर यांच्यात धर्माभिमान अधिक प्रमाणात जाणवला.
२. डॉ. एस्.आर्. लीला, पूर्व आमदार तथा लेखक, बेंगळुरू, कर्नाटक
अ. डॉ. लीला अनेक भाषा बोलतात; परंतु त्या संस्कृत भाषेत बोलतांना त्यातील आध्यात्मिक गोडवा अनुभवतात.
आ. डॉ. लीला यांच्यात संस्कृतभाषेविषयी अभिमान आणि प्रेम आहे.
इ. त्यांच्या विचारांमध्ये सुस्पष्टता असते. त्यामुळे त्यांना ‘जीवनात काय करायचे आहे किंवा नाही’, हे स्पष्ट असते.
ई. हिंदु धर्मशास्त्राला त्यांच्या जीवनात विशेष स्थान असून त्याप्रमाणे त्या आचरण करण्याचा प्रयत्न करतात.
उ. त्यांनी साम्यवाद्यांचे षड्यंत्र अयशस्वी करण्यासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न केले. त्यातून त्यांच्यात ‘तत्त्वनिष्ठता’ हा गुण दिसून आला.
ऊ. त्यांच्यात काही प्रमाणात सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांना काही वेळा ‘पुढे काय घडणार ?’, याचीही थोडीफार कल्पना येते.
ए. डॉ. लीला विविध अनुभवांतून शिकतात आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणतात. त्यामुळे त्यांचे जीवन नेतृत्व, तत्त्वनिष्ठ, सत्यनिष्ठ, समर्पण अशा अनेक आदर्श गुणांनी युक्त झाले आहे.
३. आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती (एशिया चॅप्टर), विश्व ज्योतिष महासंघ, पटना, बिहार
अ. आचार्य मिश्र यांच्यात शिष्यत्व, म्हणजे सतत शिकण्याची वृत्ती आहे. शिकण्याच्या माध्यमातून ते आनंद अनुभवतात आणि त्यातून त्यांची साधनाही होते.
आ. आचार्य मिश्र यांच्यात साधनेमुळे सूक्ष्मातून जाणण्याची चांगली क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना वैश्विक स्तरावरील घडामोडींचे आकलन सहजतेने होते. या प्रक्रियेत त्यांना काही दैवी जीव सूक्ष्म विचार देऊन साहाय्य करतात, तसेच त्यांच्यावर एका संतांची विशेष कृपा आहे. ते संत आचार्य मिश्र यांना सूक्ष्मातून साहाय्य करतात.
इ. आचार्य मिश्र हे ज्ञानी, विनम्र, प्रतिभाशाली असून त्यांच्यात धर्म आणि देवता यांच्याविषयी पुष्कळ भाव आहे. त्यांच्यातील भावामुळे त्यांना संतांची कृपा आणि ईश्वरी आशीर्वाद मिळत असतो. त्यामुळे त्यांना ईश्वरी शक्तीच्या बळावर कार्य करणे शक्य होते.
ई. आचार्य मिश्र नियमित व्यष्टी साधना करतात. त्यामुळे त्यांच्या भोवती सूक्ष्मातून पिवळसर रंगाची प्रभावळ सतत कार्यरत असते.
उ. त्यांना ज्योतिष विषयाचे पुष्कळ ज्ञान आहे; पण त्याचा त्यांना अहं नाही.
ऊ. त्यांना गणपतीच्या कृपेमुळे कधीकधी सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीत अचूकता अधिक प्रमाणात असते.’
– श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.६.२०२३)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |