१. उच्च न्यायालयाने जामीन संमत करतांना ‘खटला संपेपर्यंत पुणे जिल्ह्याच्या बाहेर जायचे नाही’, अशी अट घातल्याने साधकाला ३ वर्षे पुण्यातच रहावे लागणे

‘२५.५.२०१९ या दिवशी ‘केंद्रीय अन्वेषण विभागा’ने (‘सी.बी.आय.’ने) मला ‘नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणा’त अटक केली. ११ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर माझी रवानगी ‘येरवडा मध्यवर्ती कारागृहा’त झाली. ६.५.२०२१ या दिवशी मला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आणि १३.५.२०२१ या दिवशी माझी कारागृहातून मुक्तता झाली; पण उच्च न्यायालयाने मला जामीन संमत करतांना ‘खटला संपेपर्यंत मी पुणे जिल्ह्याच्या बाहेर जायचे नाही’, अशी अट घातली होती. त्यामुळे मला खटला संपेपर्यंत, म्हणजे पुढील ३ वर्षे पुण्यातच रहावे लागले.
२. संतपित्याचे कोरोनामुळे निधन होणे; पण पुण्याबाहेर जाता येत नसल्याने वडिलांचे अंत्यदर्शन, तसेच मृत्यूनंतरचे विधी करण्यासाठीही गावी जाता न येणे
२५.६.२०२१ या दिवशी माझ्या वडिलांचे, सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय नीलकंठ भावे यांचे रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. तेव्हा मी पुण्याच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी वडिलांचे अंत्यदर्शन घेऊ शकलो नाही आणि एकुलता एक मुलगा असूनही त्यांच्या पार्थिवाला अग्नी देऊ शकलो नाही. ‘रत्नागिरी जिल्ह्यातील आमच्या गावी जाऊन दहाव्या आणि तेराव्या दिवसांचे विधी करता यावेत’, यासाठी मला उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागली. ती याचिका सुनावणीला येऊन माझी विनंती मान्य होण्यासाठी ३ आठवडे लागले. त्यामुळे मी वडिलांच्या देहत्यागानंतरचे दहावे आणि तेरावे हे विधीही वेळेत करू शकलो नाही.
३. पत्नीने (सौ. वैदेही भावे यांनी) एका साधिकेच्या संदर्भात सांगितलेला प्रसंग
३ अ. एका साधिकेला तिच्या पतीच्या निधनाच्या वेळी पतीला शेवटचे भेटता न आल्याचे शल्य तिच्या मनात रहाणे : वर्ष २०१९ मध्ये मला अटक होण्यापूर्वी मी पनवेल येथे रहात होतो आणि माझी पत्नी (सौ. वैदेही) गोवा येथे रहात होती. एके दिवशी पत्नीशी भ्रमणभाषवर बोलतांना तिने सांगितले, ‘‘एक साधिका आगाशीत एकट्याच खिन्नतेने उभ्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्या साधिकेच्या पतीचे निधन झाले होते. पतीनिधनाच्या वेळी त्या सेवेनिमित्त अन्य राज्यात गेल्या होत्या. त्यामुळे त्यांची पतीशी शेवटची भेट झाली नाही. या गोष्टीचे शल्य त्या साधिकेच्या मनात राहिले होते. त्या साधिका मला म्हणाल्या, ‘‘पतीनिधनापूर्वी एकदातरी माझी यजमानांशी शेवटची भेट झाली असती, तर बरे झाले असते !’’ त्या वेळी पत्नीने त्या साधिकेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
३ आ. पत्नीने भ्रमणभाषवरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेच्या स्थितीविषयी दिलेले उत्तर सांगितल्यामुळे ‘पत्नी हे सर्व का सांगत आहे ?’, असा प्रश्न पडणे : त्यानंतर पत्नीने एका सत्संगात गुरुदेवांना वरील प्रसंग आणि त्या साधिकेची स्थिती यांविषयी विचारले. तेव्हा गुरुदेवांनी सांगितले की, हे सर्व संस्कारांमुळे होत असते. ‘पतीची शेवटची भेट व्हायला हवी होती’, असे वाटणे, हाही एक संस्कारच आहे. नंतर पत्नीने मला भ्रमणभाषवर हा प्रसंग सांगितला. तेव्हा मला प्रश्न पडला, ‘आता काही संदर्भ नसतांना पत्नी मला हे सगळे का सांगत आहे ?’ तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून आलेले शब्द ऐकायला मिळतात, ही भाग्याची गोष्ट आहे’, असा विचार करून मी ते बोलणे ऐकले.
३ इ. वडिलांना शेवटचे पाहू न शकणे, त्यांच्या पार्थिवाला अग्नी देऊ न शकणे, यांमुळे दुःख होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेच्या प्रसंगाची आठवण अन् ते संस्कार असल्याची जाणीव करून देताच मनातील दु:ख नाहीसे होऊन कृतज्ञता वाटणे : जून २०२१ मध्ये माझे वडील गेले आणि ‘मीही त्यांना शेवटचे पाहू अन् भेटू शकलो नाही. त्यांच्या पार्थिवाला अग्नीही देऊ शकलो नाही’, या गोष्टींमुळे मी दुःखी झालो. त्या वेळी गुरुदेवांनीच ‘त्या साधिकेच्या मनात राहिलेले दुःख आणि त्याविषयी पत्नीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी केलेले मार्गदर्शन’, या सगळ्याची मला आठवण करून दिली. त्याच क्षणी माझ्या लक्षात आले, ‘वडिलांची शेवटची भेट व्हायला हवी होती, त्यांना शेवटचे पहाता यायला हवे होते, त्यांच्या पार्थिवाला अग्नी देता यायला हवा होता’, हे सगळेही माझ्यावरील संस्कारच आहेत आणि हे संस्कार साधनेच्या आड येतात; म्हणून ते नाहीसे झाले पाहिजेत’, हेच गुरुदेवांना मला शिकवायचे आहे. पत्नीने त्या वेळी सांगितलेल्या प्रसंगांचा संदर्भ तेव्हा माझ्या लक्षात येत होता. त्याच क्षणी माझ्या मनातील दुःख नाहीसे झाले आणि माझे मन गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञतेने भरून आले.
४. संस्कार नाहीसे करण्याविषयी श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या आयुष्यातील एक प्रसंग
४ अ. श्रीरामकृष्ण परमहंस यांनी काही दिवस एकट्यानेच जंगलात जाणे, शिष्यांना येण्यास मज्जाव केल्याने त्यांच्या मनात विकल्प येऊन त्यांनी रामकृष्णांचा पाठलाग करणे अन् त्यांना एक विलक्षण गोष्ट आढळणे : मला श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. ‘श्रीरामकृष्ण परमहंस काही दिवस एकटेच जंगलात जात असत. त्यांच्या समवेत शिष्य निघाले, तर ते शिष्यांना येण्यास मज्जाव करत. बरेच दिवस हे चालू होते. तेव्हा काही शिष्यांच्या मनात विकल्प आला. त्यांनी श्रीरामकृष्ण परमहंस यांचा चोरून पाठलाग करायचे ठरवले आणि त्याप्रमाणे केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, ‘त्यांचे गुरुदेव जंगलात एका ठिकाणी थांबले. त्यांनी कंबरेचा पंचा, लंगोट आदी सगळे काढून टाकले, गळ्यातले जानवेही काढून ठेवले आणि ते ध्यानस्थ बसले. काही वेळानंतर ते ध्यानातून बाहेर आले आणि पुन्हा वस्त्रे अन् जानवे घालून आश्रमाकडे परत येऊ लागले.’ असे सलग कित्येक दिवस चालू होते. सर्व शिष्य चोरून पाठलाग करून हे पहात होते.
४ आ. शिष्यांनी श्रीरामकृष्णांना त्यांच्या वागण्याचा अर्थ विचारणे, तेव्हा त्यांनी ‘स्वतःवरील संस्कार नष्ट होण्यासाठी हे सर्व करत असून संस्कार गेल्यावरच ईश्वराशी एकरूप होता येते’, असे सांगून शिष्यांचे समाधान करणे : एके दिवशी शिष्यांनी धीर करून श्रीरामकृष्ण परमहंस यांना विचारले, ‘‘गुरुदेव, आपण एकटेच जंगलात जात होता. त्यामुळे विकल्प येऊन आम्ही आपला पाठलाग केला. त्याबद्दल आम्हाला क्षमा करा; पण एक प्रश्न आहे, ‘आपली कुठेही समाधी लागते. मग ध्यानासाठी जंगलात जाणे, वस्त्रे आणि जानवे काढून ठेवणे, या सगळ्यांचा अर्थ काय ?’’ श्रीरामकृष्ण परमहंस यांनी उत्तर दिले, ‘‘मी सगळे संस्कार घालवण्यासाठी हे करत आहे. आश्रमात ध्यान करतांना ‘माझा आश्रम’ हा संस्कार रहातो; म्हणून जंगलात जाऊन ध्यान करत होतो. अंगावर वस्त्रे असली, तर लाजेचा संस्कार रहातो; म्हणून मी वस्त्रे काढून टाकत होतो आणि गळ्यात जानवे असले, तर ‘मी ब्राह्मण आहे’, हा संस्कार रहातो; म्हणून मी तेही काढून टाकत होतो. पुढे पुढे तर ‘मी पुरुष आहे’ किंवा ‘मी स्त्री आहे’, हा संस्कारही जायला हवा. सगळे संस्कार जातील, तेव्हाच ईश्वराशी एकरूप होता येईल !’’
असे सांगितल्यावर श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या शिष्यांचे समाधान झाले.’
– श्री. विक्रम विनय भावे (वय ४२ वर्षे), हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.