सध्या सर्वाेच्च न्यायालयात समलिंगी विवाहाला मान्यता देण्याविषयीची सुनावणी चालू आहे. त्या निमित्ताने…
सध्या पाश्चिमात्य देशांत ‘वोक’लेले आपल्या देशात ‘पक्वान्न’ म्हणून वाढण्याचा प्रयास चालू झाला आहे. त्याला कायदेशीर बैठक देण्याचे प्रयत्नही लगबगीने चालू आहेत. याच्या परिणामांची कल्पना पाश्चिमात्य देशातील आजची परिस्थिती पाहिल्यावर सहज लक्षात येते. ‘येथे असले काही होणार नाही, चालणार नाही’, अशा भ्रमात वावरणे परवडणार नाही. या ‘वोकिझम’चा चंचुप्रवेश झाला आहे आणि तो जे आहे ते नष्ट केल्याविना थांबणार नाही.
१. ‘वोकिझम’ उदयास येण्यामागील कारण
‘वोक’ म्हणजे जागे होणे किंवा मूलत: जागरूक असणे. हा शब्द प्रारंभी वांशिक पूर्वग्रह आणि आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या समस्यांविषयी जागरूक असण्याशी संबंधित होता. नंतरच्या काळात कुठल्याही भेदभावाशी संबंधित मुद्यांशी त्याला जोडण्यात येऊ लागले. अन्याय, वर्णद्वेष, लैंगिकता इत्यादींविषयी जागरूकता यासंबंधातही ‘वोक’ हा शब्द वापरला जाऊ लागला. पुढे पुढे त्याचा इतका अतिरेक झाला की, ज्या पाश्चिमात्य देशांत हे लोण चालू झाले, तिथेच त्याला विरोधही चालू झाला. त्याचे दुष्परिणाम त्यांना जाणवू लागले. ‘वोकिझम’ म्हणजे सामाजिक आणि राजकीय अन्याय यांविषयी संवेदनशील असलेल्या लोकांचे वर्तन अन् वृत्ती. जगभरातील प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती, कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी नवी संस्कृती उदयास आली, ती म्हणजे वोकिझम !
पाश्चिमात्य देशांमधील शिक्षणव्यवस्था आणि युवा वर्ग यांवर या वोकिझमचे गारुड आहे. ‘मागचा पुढचा विचार न करता जे आहे ते मोडीत काढणे’, हा एकमेव उद्देश असलेले ‘पुरोगामित्व’ याला पोषक ठरले. ‘अनेकांनी समाजाची व्याख्या केली आहे, तो समाज पालटणे, हे आमचे ध्येय आहे’, असे म्हणणारे साम्यवादी आणि समाजवादी यांनी जगभरातील विद्वानांच्या डोक्यात ‘वोकिझम’ रुजवले, मग त्या विचारवंतांनी ते स्वकष्टाने वाढवले आणि पसरवले.
२. विदेशात समलिंगी विवाहांचा प्रारंभ आणि त्याचा उभारला जात असलेला पाया
आपल्याकडेही सर्वोच्च न्यायालय सगळे इतर खटले बाजूला ठेवून प्राधान्याने समलैंगिक विवाहास मान्यता देण्यासाठी ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’मधील (विशेष विवाह कायद्यामधील) ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ हे शब्द काढून त्या जागी ‘व्यक्ती (पर्सन)’ हा शब्द घालू इच्छित आहे. याचा प्रारंभ खरे तर वर्ष २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात झाला. ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी जेंडर इन्स्टिट्यूट’ने ‘जेंडर-इन्क्लुझिव्ह हँडबूक’ प्रकाशित केले. त्यात ‘प्रत्येक विद्यार्थ्याने ‘आई’ या शब्दाऐवजी ‘गर्भधारक (गॅस्टेशनल)’ किंवा ‘जन्मदाते (बर्थिंग पॅरेंट)’, असे म्हणावे आणि ‘वडील’ या शब्दाऐवजी ‘अ-गर्भधारक (नॉन गॅस्टेशनल)’ किंवा ‘अ-जन्मदाते(नॉन बर्थिंग पॅरेंट)’ म्हणावे’, असे सुचवले. त्याहीपुढे जाऊन ‘स्तनपान (ब्रेस्ट फीडिंग)’च्या ऐवजी ‘चेस्ट फीडिंग’(याचे ‘छातीपान’ असे विचित्र भाषांतर करणे माझ्या अल्पबुद्धीस पटेना) म्हणावे’, असेही अहवालात सुचवले.
अनेक युरोपीय देशांतील शाळांमध्ये ‘माणसाची एकूण ७२ ‘जेंडर’ (लिंग) असतात’, असे शिकवले जाऊ लागले आहे. ‘जेंडर न्यूट्रॅलिटी’ (स्त्री आणि पुरुष दोघांनाही योग्य) शिकवण्यासाठी नेदरलँडमध्ये शाळेत अनेक वयोगटांतील लोकांना नागडे करून विद्यार्थ्यांसमोर उभे करण्यात आले. पाळी न आलेल्या मुलीला, जी आपल्या डोक्याने स्वत:स मुलगा समजते, तिला ‘प्युबर्टी ब्लॉकर्स’ (किशोरावस्था अवरोधक) दिले जातात. यामुळे तिचे पाळी येणेच बंद होते. स्त्रीचे स्त्रीत्व, तिच्या नैसर्गिक भावनाच नष्ट करणे आणि अशांना कायदेशीर संरक्षण देऊन समाज पालटवणे आपल्याला परवडणार नाही.
३. भिन्नलिंगी आकर्षण नैसर्गिक, तर समलिंगी आकर्षण अनैसर्गिक !
‘आपण ठरवू ते आपले लिंग (जेंडर); कारण ते आपल्या मेंदूला वाटते त्याप्रमाणे असते’, या धारणेला कायदेशीर स्वरूप देणे किती धोकादायक आहे, याची को़णतीही पर्वा नाही. उलट त्याला नैसर्गिक ठरवण्याची अहमहमिका लागलेली आहे. भिन्नलिंगी आकर्षण हे नैसर्गिक, तर समलिंगी आकर्षण हे अनैसर्गिक आहे.
४. नैसर्गिक जीवनचक्राची संज्ञा
प्राण्यांमध्ये आहार, निद्रा, भय आणि मैथुन या असलेल्या समान धाग्यामागे निसर्गाचे प्रयोजन आहे. प्रत्येक प्रयोजनाप्रमाणे जैविक रचनेची निर्मिती होते. मैथुनाच्या मागे ‘जीवोत्पत्ती’ हा निसर्गाचा हेतू आहे. जीवचक्र आणि निसर्गचक्र चालते रहाण्यासाठी प्रत्येक जिवाची व्यवस्था निसर्गाने वेगवेगळी रचना देऊन केली आहे. वनस्पती, वेली, झाडे यांचे जीवचक्र उद्भिज असते आणि घामापासून निर्माण होणारे जीवजंतूचे जीवचक्र स्वेदज पद्धतीने होते. अंड्यामधून बाहेर पडणारे ते अंडज आणि उदरामध्ये वाढून योनीद्वारातून बाहेर पडणार्या प्राण्यांसाठी ‘जरायुज’ अथवा ‘योनीज’ म्हणतात. ज्या जिवाची जशी शरीर रचना आहे, त्याप्रमाणे जीवनचक्र चालू (निसर्गाचे व्यवस्थेमागचे प्रयोजन) रहाण्याच्या प्रक्रियेला ‘नैसर्गिक’ म्हणणे योग्य ठरेल. अन्यथा ते ज्याला आपण नैसर्गिक म्हणू ते सापेक्ष ठरेल. शरीर रचनेप्रमाणे आणि निसर्गाच्या प्रयोजनाप्रमाणे जिवाचा स्वभाव असणे, याला ‘नैसर्गिक’ या संज्ञेत बसवता येईल.
५. भिन्नलिंगी आकर्षण निसर्गाच्या प्रयोजनाला पूरक असल्याने ते नैसर्गिक
जीवसृष्टी चालू रहावी, असे पूरक वातावरण निसर्ग निर्माण करतो किंवा ते असते म्हणून जीवसृष्टी आहे. निसर्गाच्या प्रयोजनाशी पूरक नसलेली गोष्ट अस्तित्वात असणे, हे निसर्गालाही अमान्य नाही; पण अशी गोष्ट आपण अट्टहासाने नैसर्गिक म्हणून का प्रतिपादित करावी ? अनैसर्गिक असणे याचा संबंध आपण अनैतिक वा बेकायदेशीर असणे इत्यादी त्याज्य गोष्टींशी लावतो. हे जसे चूक आहे, तसेच जे अनैसर्गिक आहे त्याला नैसर्गिक म्हणणेही चूक आहे. मी बटाट्याची भाजी खावी कि कारल्याची ? हे माझ्या आवडनिवडीशी संबंधित आहे. त्यामागे आहार ही नैसर्गिक प्रेरणा आणि जीव तगवणे, हे प्रयोजन आहे. शरीर तगवणे, यासाठी प्राप्त शरीर रचनेला पूरक असा आहार नैसर्गिक म्हणता येईल. तसेच मैथुन या निसर्गक्रियेचे नैसर्गिक प्रयोजन जीवोत्पत्ती आहे. प्राप्त शरीर रचनेप्रमाणे (इंद्रियव्यवस्था) लैंगिक भावना असणे नैसर्गिक ! जरायुजांमध्ये भिन्नलिंगी आकर्षण असणे निसर्गाच्या प्रयोजनाला पूरक आहे, म्हणून ते नैसर्गिक आहे. या विपरीत किंवा भिन्न असेल, तर अनैसर्गिक म्हणावे लागेल. त्याला त्याज्य ठरवण्याची आवश्यकता नाही; पण म्हणून नैसर्गिक ठरवणे कुठल्या आधारावर योग्य आहे ? समलिंगी भावना मनुष्येतर आणि मनुष्य प्राण्यांमध्येही आढळते; पण अपवादाने. अपवादाला नियम ठरवणे सोयीचे असू शकेल; पण योग्य नव्हे.
६. …जे भारतीय नाही, ते समाजात आणि संस्कृतीत रुजवण्याचा अट्टहास का ?
‘आपल्या मनाला वाटते ते स्वतःचे लिंग (जेंडर)’, असे मानण्याचे सामाजिक दुष्परिणाम काय होतील ? याची जराही कल्पना ‘वोकिझम’च्या पुरस्कर्त्यांना नाही.
पाश्चिमात्य देशांत ‘पुरुष आपण स्त्री आहोत’, असे म्हणत महिलांचे लैंगिक शोषण करू लागले आहेत. पुरुषांच्या पोहण्यामध्ये १०० च्या पुढील मानांकन असणारा जलतरणपटू ‘आपण महिला आहोत’, असा दावा करत ‘अव्वल महिला जलतरणपटू’ ठरला आहे. ट्रान्सजेंडर (उभयलिंगी) प्रमाणेच ‘ट्रान्सएबल्ड’ हा प्रकारही वाढीस लागला आहे. दोन्ही पाय व्यवस्थित असणारे आपल्यास एका पायाने अधू समजू लागले आहेत. डोळे असूनही ‘ट्रान्सआंधळे’ झाले आहेत. याची पुढची पायरी म्हणजे स्वत:चे शस्त्रकर्म (ऑपरेशन) करवून स्वत:स दिव्यांग ठरवू लागले आहेत. त्यांच्या विशेषाधिकारांची मागणीही होऊ लागली. ‘तिकडची घाण हे पंचपक्वान्न’, या विद्वानांच्या उक्तीस अनुसरून लवकरच भारतात ‘ट्रान्सदिव्यांग’ सिद्ध होतील, यात शंका नाही. सर्वांग केसाळ असलेल्या दाढीवाल्याबाईंची छायाचित्रे भारतीय नियतकालिकांवर छापली जाऊ लागली आहेत.
भारतात नसलेली समस्या आणून तिला भारतीय बनवणे चालू आहे. मुळातच जे भारतीय नाही, ते इथल्या समाजात आणि संस्कृतीत रुजवण्याचा अट्टहास का ? सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात ‘ट्रान्सजेंडर’ शौचालये उभारण्यात आली आहेत. न्यायाधीशांच्या ‘वोकिझम’च्या आग्रहापायी संपूर्ण समाजाचेच ‘ट्रान्सजेंडर’ शौचालय करायचे आहे का ?
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (२९.४.२०२३)
(साभार : ‘प्रसन्न वदने’ ब्लॉगवरून)