सिंधुदुर्ग : सावंतवाडी बसस्थानकाचे काम अनेक वर्षे अपूर्ण असल्याने प्रवासी आणि कर्मचारी यांची असुविधा

काम अपूर्ण ठेवणार्‍या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकण्याची मागणी

एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका !

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !

राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्‍चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

सावंतवाडी – सावंतवाडी बसस्थानकाचे काम ७ वर्षांहून अधिक काळ अर्धवट स्थितीत असल्याने प्रवासी आणि कर्मचारी यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकाराला उत्तरदायी असणार्‍या संबंधित ठेकेदाराला काळ्या सूचीत टाका. अन्यथा आंदोलन करू, अशी चेतावणी येथील नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि एस्.टी. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अण्णा केसरकर यांनी दिली.

सावंतवाडी बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाविषयी साळगावकर यांच्यासह नगरपरिषदेच्या माजी नगरसेवकांनी एस्.टी.चे अधिकारी नरेंद्र बोधे यांना घेराव घातला.  ‘या वेळी बोधे यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप करत संतप्त पदाधिकार्‍यांनी बोधे यांना खडसावले, तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बांधकाम अधिकार्‍यांनाही धारेवर धरले.
‘आम्ही वरिष्ठ स्तरावर वारंवार पाठपुरावा केला आहे; परंतु काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही करायचे काय ? राज्यातील तब्बल २३ बसस्थानके अर्धवट स्थितीत आहेत’, असे बोधे यांनी सांगितले. या वेळी संतप्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी ‘कोणत्याही स्थितीत काम पूर्ण होणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करा’, अशी मागणी केली. या वेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, शब्बीर मणीयार, सुनील सावंत आदी उपस्थित होते.


अधिक माहितीसाठी पहा
‘सनातन प्रभात’चे संकेतस्थळ !

बसस्थानकातील अस्वच्छतेची दुर्दशा दर्शवणारी अन्य छायाचित्रे पहाण्यासाठी
‘सनातन प्रभात’ संकेतस्थळाची मार्गिका : bit.ly/3KdwMec

(यातील काही अक्षरे ‘कॅपिटल’ आहेत, याची नोंद घ्यावी.)

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !

आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा.