सांगली, ३१ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी रोवलेली राष्ट्र आणि धर्म भक्तीची मुहुर्तमेढ पुढे नेण्याचे कार्य पू. संभाजीराव भिडे हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून करत आहेत. छत्रपती शिवरायांनी पारतंत्र्यांतून आपल्या संस्कृतीस मुक्त करून स्वराज्य आणि सुराज्य या संकल्पनेला मूर्त आकार दिला अन् त्या काळी जगातील सशक्त राष्ट्र निर्माण केले. सध्या २१ वे शतकात आपल्याला पुन्हा भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील रहायचे आहे. गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी शिवरायांनी सांगितलेल्या विचारानुसारच मार्गक्रमण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे यांनी केले.
श्रीरामनवमीचे औचित्य साधून श्री शिवतीर्थ प्रकाशनाच्या वतीने श्री. मिलिंद तानवडे यांनी लिहिलेल्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावरील ‘हृदयस्थ समर्थ’ आणि ‘श्री रायगडा’ या शिवतीर्थ रायगडाच्या अनुभवांचे लेखन असलेल्या २ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. हा सोहळा भावे नाट्य मंदिर येथे पार पडला. या प्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी, जेष्ठ इतिहास अभ्यासक श्री. आप्पा परब, इतिहास संशोधक डॉ. अमर आडके, डॉ. मिलिंद पराडकर, लेखक श्री. मिलिंद तानवडे, श्री. माधव बापट यांसह अन्य मान्यवर आणि धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक श्री. मिलिंद तानवडे यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी आणि हेमांगी बापट यांनी केले.
डॉ. बलकवडे म्हणाले,
१. आज जगाच्या पाठीवरील सर्व संस्कृती त्यांचेच वारस संपवत असतांना एकमेव हिंदु संस्कृतीच जगाला धरणारी आहे. प्रभु रामचंद्रांचे चारित्र्य आणि श्रीकृष्णाची राजनीती यांचा सुरेख संगम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात होता. बलाढ्य शत्रूंशी लढण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला.
२. २१ व्या शतकात ‘आम्ही कसे जगावे ?’, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जगात सशक्त राष्ट्र म्हणून आपला देश नावारूपाला येण्यासाठी सर्वांनीच आपापल्या परीने प्रयत्न करावेत; परंतु आदर्श जीवन जगायचे, तर प्रथम कौटुंबिक कर्तव्ये पार पाडणे अत्यावश्यक आहे.
३. युवकांमध्ये राष्ट्रीय भावना भिनवायची असेल, तर गडकोट मोहीम राबवायला हवी.
या वेळी श्री. आप्पा परब म्हणाले, ‘‘गडकोट हे सतीचे वाण आहे. छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या प्रत्येक गडाची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा केवळ अनुभव घेण्याची आवश्यकता आहे.’’ डॉ. मिलिंद पराडकर म्हणाले, ‘‘रायगडाची स्थापत्यशैली ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. दुर्ग अनुभवतांना नितळ भावनेने माथा टेकल्यास जगण्याची प्रेरणा मिळते.’’
क्षणचित्रे१. इतिहास संशोधकांचे मनोगत, धारकर्यांचा ‘जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष, कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी यांमुळे वातावरण शिवमय आणि भगवेय झाले होते. २. या प्रकाशनासाठी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक श्री. किरण ठाकूर यांच्या वतीने शुभेच्छा संदेश पाठवण्यात आले होते. या संदेशांचे वाचन श्री. कारखानीस यांनी केले. |