SURINAME Shri Ram’s Land : ‘श्री रामाची भूमी’ यावरून देशाचे ‘सुरीनाम’ असे नाव प्रचलित झाले !

दक्षिण अमेरिकेतील देश असलेल्या सुरीनाम येथील दूतावासाच्या द्वितीय सचिव सुनैना पी.आर्. मोहन यांनी दिली माहिती

सुरीनाम येथील दूतावासाच्या द्वितीय सचिव सुनैना पी.आर्. मोहन

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे ‘विक्रमोत्सव २०२५’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौराणिक चित्रपट महोत्सवाच्या चौथ्या दिवशी दक्षिण अमेरिका खंडातील ‘सुरीनाम’ आणि दक्षिण आफ्रिका या देशांतून आलेल्या नेत्यांनी सहभाग घेतला. या वेळी ‘सुरीनाम’ देशाच्या दूतावासाच्या द्वितीय सचिव सुनैना पी.आर्. मोहन यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘सुरीनाम’ या शब्दाचे स्पष्टीकरण देतांना सुनैना म्हणाल्या की, मूळतः ‘श्रीराम’ शब्दापासून सुरीनाम नाव आले आहे. जेव्हा आमचे पूर्वज भारतातून तेथे स्थलांतरित झाले, तेव्हा त्यांनी त्याला ‘श्री रामाची भूमी’ म्हटले, जे नंतर सुरीनाम बनले.

सुनैना पुढे म्हणाल्या की, उज्जैन येथे आल्यानंतर त्यांना स्वतःच्या घरी असल्यासारखे वाटले. ‘भारत ही आमच्या पूर्वजांची भूमी आहे आणि येथून आमचे पूर्वज सुरीनामसारख्या देशात जाऊन स्थायिक झाले. आमच्या पूर्वजांनी भारतीय संस्कृती, भाषा, पोशाख, भक्ती भावना आणि धार्मिक आचरण आदी परंपरा जपल्या आहेत. भारतीय तरुणांनी त्यांची संस्कृती आणि परंपरा कधीही विसरू नये’, असे त्यांनी आवाहन केले. त्यांनी हिंदीतून भाषण करतांना भगवान शिव यांना समर्पित एक भावपूर्ण भजनही सादर केले.