तोच खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा जन्‍मदिवस !

‘रघुवंशातील राजे प्रभु श्रीरामचंद्राने रावणावर विजय संपादन केला. हिंदूंच्‍या पहिल्‍या परमप्रतापी सम्राटाचा म्‍हणजेच प्रभु श्रीरामचंद्रांचा ज्‍या दिवशी हिंदूंना विसर पडेल, त्‍या दिवशी हिंदूंना ‘राम’ म्‍हणावे लागेल. रघुवंशातील परमप्रतापी, अनेक राक्षसांचा वध करणार्‍या रघुवीर रामचंद्रांविषयी स्‍वातंत्र्यवीर सावरकर ‘हिंदुत्‍व’ या ग्रंथात लिहितात…

प्रभु श्रीरामचंद्र

‘अयोध्‍येच्‍या महाप्रतापी राजाने जेव्‍हा लंकेमध्‍ये आपले विजयी पाऊल टाकले आणि उत्तर हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंतची सर्व भूमी एकछत्री सत्तेखाली आणली त्‍याच दिवशी स्‍वराष्‍ट्र अन् स्‍वदेश निर्मितीचे जे महान कार्य सिंधूनी अंगीकृत केले होते, त्‍या कार्याची परिपूर्ती झाली आणि भौगोलिक मर्यादेच्‍या दृष्‍टीने सुद्धा त्‍यांनी अंतिम सीमा हस्‍तगत केली. ज्‍या दिवशी अश्‍वमेधाचा विजयी घोडा कुठेही प्रतिरोध न होता अजिंक्‍य असाच अयोध्‍येला परत आला, ज्‍या दिवशी त्‍या अप्रमेय अशा प्रभु रामचंद्रांच्‍या त्‍या लोकाभिराम रामभद्राच्‍या साम्राज्‍य सिंहासनावर सम्राटाच्‍या चक्रवर्तीत्‍वाचे निदर्शक असे भव्‍य श्‍वेत वस्‍त्र धरले गेले आणि ज्‍या दिवशी आर्य म्‍हणावणार्‍या नृपश्रेष्‍ठांनीच नव्‍हे, तर भक्‍तीपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनी सुद्धा त्‍या सिंहासनाला आपली भक्‍तीपूर्वक राजनिष्‍ठा सादर केली. तोच दिवस आपल्‍या खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा, हिंदू जातीचा जन्‍मदिवस ठरला !

श्री. दुर्गेश परुळकर

तोच खरा आपला राष्‍ट्रीय दिन कारण आर्यांनी आणि अनार्यांनी एकमेकांत पूर्णपणे मिसळून एका नवीन अशा संघटित राष्‍ट्राला त्‍या दिवशी जन्‍म दिला. या दिवशी पूर्वीच्‍या सर्व पिढ्यांचे प्रयत्न फळाला येऊन त्‍यावर राजकीयदृष्‍ट्या यशाचा कळस चढला. त्‍यानंतर सर्व पिढ्या ज्‍यासाठी बुद्धीपुरस्‍सर किंवा अबुद्धीपुरस्‍सर झुंजल्‍या आणि झुंजता झुंजता प्रसंगी पडल्‍या सुद्धा त्‍या समान ध्‍येयाचा समान ध्‍वजाचा आणि समान कार्याचा वारसा तेव्‍हापासून हिंदू जातीकडे परंपरेने चालत आला.’
(वरील वाक्‍ये स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या ‘हिंदुत्‍व’ या ग्रंथातून घेतलेली असल्‍याने त्‍यात व्‍याकरणदृष्‍ट्या पालट केलेले नाहीत. – संकलक)

– श्री. दुर्गेश परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (७.३.२०२३)