छत्रपती शिवरायांच्‍या मावळ्‍यांच्‍या वंशजांचे मनोगत !

‘विशाळगड कृती रक्षण समिती’च्‍या पाठपुराव्‍यामुळे सरकार आणि पुरातत्‍व विभाग यांना जाग आली ! – संदेश देशपांडे (बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज)

सध्‍याची गड-दुर्गांची स्‍थिती पाहिली, तर मनाला अत्‍यंत वेदना होतात. विशाळगडावरील अतिक्रमण, कचरा आणि घाण यांमुळे वंदनीय बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु यांच्‍या समाधीस्‍थळाकडे जाणार्‍या मार्गाची दुरवस्‍था झाली आहे. मंदिराची पडझड झाली आहे. याकडे सरकार आणि पुरातत्‍व विभाग दुर्लक्ष करत आहे. आपले सर्व गड-दुर्ग तीर्थक्षेत्रांप्रमाणे पवित्र आहेत. त्‍याचे पावित्र्य सर्वांनी जोपासले पाहिजे. महाराष्‍ट्र ‘गड-दुर्ग रक्षण समिती’च्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक हिंदूच्‍या मनात हे कोरले जाईल. विशाळगडावरील अतिक्रमण आणि अन्‍य समस्‍या यांसाठी अनेक गडप्रेमी संघटना काम करतात; पण त्‍यात दुर्दैवाने बरेचदा राजकारण मध्‍ये आणले जाते. हिंदु जनजागृती समितीच्‍या माध्‍यमातून ‘विशाळगड कृती रक्षण समिती’ स्‍थापन करून संघटितपणे पाठपुरावा केल्‍याने सरकार आणि पुरातत्‍व विभाग यांना जाग आली आहे.

मोर्च्‍याच्‍या माध्‍यमातून हिंदूंची एकजूट दिसेल ! – विनायककाका सणस (सरदार पिलाजी सणस यांचे वंशज)

काही वर्षांपूर्वी रोहिडेश्‍वराच्‍या (विचित्र गडाच्‍या) पायथ्‍याशी एक लहान थडगे अचानक एका रात्रीत बांधण्‍यात आले. याविषयी स्‍थानिक लोकांनी सांगितल्‍यावर त्‍यांच्‍याच सहभागाने ते पाडून त्‍याजागी भगवा झेंडा लावला. गडदुर्गांवरील अतिक्रमणांविषयी प्रत्‍येकाच्‍या मनात खदखद आहे. सर्वांनी योग्‍य दिशा आणि मार्गदर्शन घेऊन काम करायला हवे. ३ मार्च या दिवशी ‘गड-दुर्ग रक्षण समिती’च्‍या वतीने संघटितपणे सरकारला खडसवल्‍यास याला नक्‍कीच आळा बसेल. सर्व हिंदूंची एकजूट या मोर्च्‍याच्‍या माध्‍यमातून दिसणार आहे. आम्‍ही येणार आहोत. तुम्‍हीही या !

महामोर्च्‍याला बहुसंख्‍येने उपस्‍थित रहावे ! – अमित शिवाजी गाडे पाटील (छत्रपती संभाजी महाराजांच्‍या दुधाई धाराऊ माता गाडे पाटील यांचे वंशज)

गड-दुर्गांच्‍या रक्षणासाठी सर्वांनी ३ मार्च या दिवशी मुंबई येथे होणार्‍या महामोर्च्‍याला बहुसंख्‍येने उपस्‍थित रहावे. या मोर्च्‍याला सर्व मावळ्‍यांचे वंशज उपस्‍थित रहाणार आहेत.