इस्लामी देशांतील मुसलमानांपेक्षा भारतातील मुसलमानांना अधिक धार्मिक स्वातंत्र्य ! – मुसलमान विचारवंत पोनमाला अब्दुलखदेर मुसलियार

मुसलमान विचारवंत पोनमाला अब्दुलखदेर मुसलियार

कोळीकोडे (केरळ) – तुम्ही जेव्हा जगभरातील वेगवेगळे देश पहाता, तेव्हा लक्षात येते की, भारतासारखा दुसरा कोणताही देश नाही. इस्लामी कार्य करण्यासाठी येथे पूर्ण स्वातंत्र्य मिळते. आखाती देशांमध्येही इतके स्वातंत्र्य मिळत नाही, असे विधान मुसलमान विचारवंत पोनमाला अब्दुलखदेर मुसलियार यांनी केले आहे. मुसलियार हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ‘संपूर्ण केरळ जाम-इय्याथुल उलमा’चे सचिव आहेत. ते कोळीकोडेमधील सुन्नी स्टुडंट्स फेडरेशनच्या बैठकीत बोलत होते.

इस्लामी कार्य करण्यासाठी भारतासारखा दुसरा कोणताही देश नाही !

मुसलियार म्हणाले की, मलेशियासारख्या पूर्वेकडील देशांमध्येही आपल्याला इस्लामी कार्य करण्याचे धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही. आपण भारतात जी संघटनात्मक कामे करत आहोत ती इतर कुठे शक्य होतील का ? इस्लामी कार्यासाठी भारतासारखा दुसरा कोणताही देश नाही.

‘संपूर्ण केरळ जाम-इय्याथुल उलमा’चे प्रदेशाध्यक्ष सैय्यद सादिक अली शिहाब थंगल यांनी पोनमाला मुसलियार यांच्या वक्तव्यावर मत व्यक्त करतांना म्हटले की, येथील मुसलमानांना देशात कोणत्याही प्रकारच्या धोक्याचा सामना करावा लागत नाही; कारण या देशाची राज्यघटना अतिशय भक्कम आहे.

संपादकीय भूमिका 

भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष असल्याने आणि गेल्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी लांगलूचालनापोटी बहुसंख्य हिंदूंना दडपून मुसलमानांना डोक्यावर बसवल्यामुळेच ही स्थिती आहे. भारतातील हिंदूंची स्थिती मात्र इस्लामी देशांतील अल्पसंख्य हिंदूंप्रमाणेच आहे !