राष्‍ट्रीय महिला आयोगाचे दायित्‍व काय ?

अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्‍या नेत्‍या सौ. चित्रा वाघ

सध्‍या अभिनेत्री उर्फी जावेद वापरत असलेल्‍या तोकड्या कपड्यांचे प्रकरण पुष्‍कळ गाजत आहे. ‘फॅशनच्‍या नावाखाली चालू असलेला स्‍वैराचार आणखी किती दिवस खपवून घ्‍यायचा ?’, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. प्रसिद्धीलोलुप असणारी उर्फी काहीतरी नवीन करायचे; म्‍हणून प्रत्‍येकच वेळेस अंगावरील कपडे वेगवेगळ्‍या प्रकारे फाडून, अंग उघडे ठेवून पोशाख सिद्ध करते आणि मुंबईच्‍या रस्‍त्‍यांवर, तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरते. गेल्‍या दोन अडीच वर्षांपासून ती हे सगळे उपद़्‍व्‍याप करत आहे. अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली चाललेला स्‍वैराचार भारतीय संस्‍कृतीच्‍या विरोधात आहे, याची जाणीव ना उर्फी जावेदला आहे आणि ना राज्‍य महिला आयोगाला ना प्रशासनाला, असेच म्‍हणावे लागेल.

उर्फी भर रस्‍त्‍यात करत असलेले शरिराचे नग्‍न प्रदर्शन हे लहान मुले आणि मुली यांच्‍या मनावरही घातक परिणाम करणारे आहे. अजाणत्‍या वयात नको त्‍या गोष्‍टी समोर आल्‍याने बालमनावर होणारा गंभीर परिणाम कोण आणि कसा घालवणार ? हे चिंताजनक आहे. एका सर्वेक्षणानुसार, आपल्‍या देशात साधारणपणे प्रत्‍येक १४ मिनिटांना एक बलात्‍कार होतो. महिलांवरील अत्‍याचार, छेडछाड हे सर्व नित्‍याचेच झाले आहे. असे असतांना अशा प्रकारच्‍या अश्‍लीलतेमुळे या सर्व समस्‍यांमध्‍ये वाढ होणार, याची काळजी कुणालाच कशी नाही ?

या पार्श्‍वभूमीवर राज्‍याचा आणि राष्‍ट्रीय महिला आयोग काय ठोस कारवाई करणार ? हा प्रश्‍न सर्वांच्‍या समोर आहे. असे असतांना या प्रकरणाच्‍या विरुद्ध सातत्‍याने आवाज उठवणार्‍या भाजपच्‍या नेत्‍या सौ. चित्रा वाघ यांना महिला आयोगाला कलंकित केल्‍याप्रकरणी नोटीस पाठवून २ दिवसांच्‍या आत उत्तर देण्‍यास आयोगाने सांगितले आहे.

(सौजन्य : MahaMTB) 

आयोगाला भारतीय महिलांच्‍या हक्‍कांचे प्रतिनिधित्‍व करण्‍यासाठी आणि त्‍यांचे मुद्दे अन् समस्‍या यांच्‍या विरुद्ध आवाज उठवण्‍यासाठी सर्व स्‍तरांवर उपाय काढून महिलांना साहाय्‍य करण्‍याचे दायित्‍व आणि अधिकार आहेत. महिलांची गार्‍हाणी दूर करण्‍याचा मार्ग सुकर करणे, महिलांना प्रभावित करणार्‍या सर्व धोरणात्‍मक गोष्‍टींवर सरकारला सल्ला देणे, आयोगास घटनात्‍मक, तसेच इतर कायद्यांतर्गत महिला सुरक्षा संबंधित उपायांशी असलेल्‍या घटनांचे अन्‍वेषण करण्‍यासाठी दिवाणी न्‍यायालयाचे अधिकार प्राप्‍त आहेत. ‘असे असतांना उर्फी जावेद ज्‍या पद्धतीने वागते, त्‍यावर महिला आयोग कृती करणार कि नाही ?’ असा प्रश्‍न कुणालाही पडल्‍यावाचून रहात नाही.

– श्रीमती धनश्री देशपांडे, गोवा.