परिस्थिती आनंदाने स्वीकारून गुरुसेवा गतीने करण्याचा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी निर्माण केलेला आदर्श !

‘दैवी प्रवास म्हणजे पूर्णतः वर्तमानकाळात रहाणे ! सप्तर्षी केव्हा कोणत्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाण्यास सांगतील, हे कोणालाच माहिती नसते. प्रवास हेच आमचे जीवन आहे. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ तर म्हणतात, ‘‘गाडी हाच आमचा आश्रम आहे.’’ अशा प्रकारे सर्व अनिश्चित असतांना ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा साधेपणा’ हाच आमचा मोठा आधार आहे. दैवी प्रवासात समोर येईल, ती परिस्थिती स्वीकारावी लागते. ती कशी सहजतेने स्वीकारायची, हे श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू आम्हाला स्वतःच्या आचरणातूनच शिकवतात. स्वतः गुरुपदी विराजमान असूनही श्रीचित्‌‌शक्ति काकू किती साधेपणाने रहातात, याची काही उदाहरणे येथे देत आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. मार्गातील साध्या भोजनालयातही भोजन करणे

प्रवासात असतांना जिथे शक्य असेल, तिथून आम्ही भोजनाचा डबा समवेत घेऊनच निघतो. जाता जाता मार्गात एखाद्या झाडाखाली सावली मिळाली, तर झाडाखाली बसूनही भोजन करतो. तेवढेही नाही मिळाले, तर गाडीत बसूनच जेवतो. कित्येकदा भोजनासाठी थांबायला वेळच न मिळाल्यामुळे चालत्या गाडीतच काही तरी खाऊन घेतो.

झाडाखाली भोजन करतांना १. श्री. विनायक शानबाग, २. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, ३. श्री. स्नेहल राऊत, आणि ४. श्री. सत्यकाम कणगलेकर

प्रवासाला निघतांना आम्ही भोजनाचा डबा घेऊ शकत नाही, तेव्हा ‘अमूक एका ठिकाणीच थांबा’ किंवा ‘अगदी चांगल्याच दर्जाचे भोजन हवे’, असे श्रीचित्‌‌शक्ति काकूंचे म्हणणे नसते. त्या आम्हाला मार्गावर मिळेल, त्या साध्याशा भोजनालयातही थांबण्यास सांगतात. यामागे ‘चांगली भोजनालये शोधण्यात समष्टी सेवेतील वेळ वाया जाऊ नये’, असा त्यांचा उद्देश असतो. त्यासाठी प्रसंगी साधे भोजन मिळाले, तरी त्या सहजतेने स्वीकारतात.

अशा साध्याशा भोजनालयांमध्ये जेवणे मलातरी सहज शक्य झाले नाही. श्रीचित्‌‌शक्ति काकू या सर्व गोष्टी सहज करतात की, त्यांना पाहून आमच्या मनातील शंका नष्ट होतात. ‘गुरु ज्या ठिकाणी थांबतात, तेथे आपल्याला काय अडचण येईल ?’, या विचारानेच त्या कृती जमू लागतात आणि त्या साधेपणातील आनंद मिळू लागतो. हे त्यांनी स्वतः कृती करून दाखवल्यामुळेच शक्य होते.

२. पेट्रोलपंपावरची शौचालये, प्रसाधनगृहे यांचा वापर करून प्रवासात खंड पडू न देणे

अनेक वेळा प्रवासानिमित्त आमचा बराच वेळ वाहनामध्ये जातो. अशा वेळी प्रसाधनगृहे, शौचालये यांची वेगळी कोणती सोय नसते. अलीकडे बर्‍याच पेट्रोलपंपांवर शौचालयांची सोय केलेली असते. आम्हाला अनेकदा त्यांचाच वापर करावा लागतो. काही वेळा ती शौचालये इतकी अस्वच्छ असतात की, त्यांचा वापर करतांना आम्हालाच कसेतरी होते. आपल्या गुरूंसाठी तरी चांगली सोय असावी, असे वाटून आम्ही त्यांना म्हणतो, ‘‘येथे जायला नको.’’, तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति काकू आम्हाला सांगतात, ‘‘प्रवासामध्ये आपल्याला ‘सगळीकडे सगळे चांगलेच मिळेल’, असे नसते. येईल ती परिस्थिती स्वीकारून धर्मकार्यासाठी पुढे जावे लागते.’’

३. विमानतळावर पुष्कळ गर्दी असतांना पायदुखीमुळे उभे राहू न शकल्याने भूमीवर बसणे

श्री. स्नेहल राऊत

कधी कधी अचानक प्रवास ठरतो. त्या वेळी विमानाने प्रवास करावा लागतो. एकदा असेच झाले. विमानाने प्रवास करायचा होता. त्या वेळी एकूणच विमानतळावर पुष्कळ गर्दी होती. श्रीचित्‌‌शक्ति काकूंचे पायही दुखत होते आणि तेथे बसण्यासाठी एकही आसंदी रिकामी नव्हती. त्यांना एका खांबाजवळ एक जागा भूमीवर दिसली. तेव्हा त्या गेल्या आणि थेट भूमीवर बसल्या. तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो ‘‘काकू, खाली नका बसू. आपण कुठेतरी जागा बघूया.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘कशाला जागा पहाता. मी इथे बसले, यात मला काही अडचण नाही. उलट देवाने छान जागा दिली. इथेच बसते. विमानाची वेळ झाली की उठते.’’

माझ्यासाठी हा प्रसंग पुष्कळच आश्चर्यकारक होता; कारण विमानतळासारख्या ठिकाणी अशा प्रकारे खाली बसायची माझ्या मनाची सिद्धता कधी होत नाही. श्रीचित्‌‌शक्ति काकू लौकिकदृष्ट्याही उच्चशिक्षित आहेत. सधन कुटुंबातील आहेत. आता तर त्या अध्यात्मातही उच्च स्थानी आहेत. असे असूनसुद्धा त्यांना अहं आणि देहबुद्धी यांचा काही अडथळा नसल्याने त्यांच्या सगळ्या कृती अगदी सहजपणे होतात.

४. चांगल्या वस्तू मिळण्यासाठी पादचारी मार्गावर बसून तेथील विक्रेत्याकडूनही खरेदी करणे

एकदा आम्हाला काही वस्तू मोठ्या प्रमाणात विकत घ्यायच्या होत्या. त्या वस्तू देहली येथे एका ठिकाणी अल्प दरात मिळतात. त्या वेळी आम्हाला जाता जाता वाटेतच पादचारी मार्गावर (फूटपाथवर) एक विक्रेता दिसला. त्याच्याकडे पुष्कळ छान वस्तू होत्या. तेव्हा आम्हाला श्रीचित्‌‌शक्ति  काकू म्हणाल्या, ‘‘यांच्याकडेच आपल्याला हव्या त्या वस्तू शोधूया.’’ त्या विक्रेत्याच्या साठ्यातून आम्हाला आवश्यक तितक्या वस्तू शोधण्यासाठी बराच वेळ लागणार होता. पादचारी मार्ग असल्याने तिथे बसण्याची काही सोयही नव्हती. तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति काकू त्या ठिकाणी फूटपाथवर बसूनच वस्तू निवडू लागल्या. अगदी सामान्य माणसे जसे साहित्य विकत घेतात, त्याचप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति वस्तू निवडत होत्या.

त्या वेळी लक्षात आले की, आमची सेवा दिसतांना दिसते की, वाहनांत फिरणे, वेगवेगळ्या राज्यांत जाणे; पण खरेतर दैवी प्रवास म्हणजे आहे त्या परिस्थितीत देहबुद्धी विसरून सेवा करणे ! अध्यात्मातील उन्नत असूनही कोणताही विचार न करता कोणतीही सेवा करायला त्या नेहमीच सिद्ध असतात ! श्रीचित्‌‌शक्ति काकू स्वतःसाठी कोणतीच विशेष वागणूक घेत नाहीत. चांगल्या, उच्च दर्जाच्या सुविधांचीही कोणती अपेक्षा नसते. असतो तो केवळ गुरूंनी आपल्यावर सोपवलेले कार्य अधिकाधिक भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा ध्यास !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्या अनमोल सहवासात गुरुदेव आमच्यातही हे गुण रुजवत आहेत, यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्री. स्नेहल मनोहर राऊत (वय ३६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), गोवा. (१६.११.२०२२)