#Exclusive : कुंकू लावण्याचे महत्त्व आणि ते का लावावे ?

पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी २ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर निघतांना एका महिला पत्रकाराने त्यांना भेटीविषयी विचारणा केली. त्या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी या महिला पत्रकाराला ‘प्रत्येक स्त्री हे भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’, असे म्हटले. यावरून महिला आयोगाने पू. गुरुजींना नोटीस पाठवली आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील पुरो(अधो)गामी मंडळींकडून या प्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. येथे खरेतर सनातन हिंदु धर्माने सांगितलेले स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावण्यामागील अध्यात्मशास्त्र हिंदूंनी लक्षात घेणे आवश्यक आहे. पुरोगाम्यांच्या बुद्धीभेदाला बळी न पडता सश्रद्ध हिंदूंना धर्मशास्त्र समजावे, यासाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

प्रस्तुत लेखात आपण कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ, कुंकू कधी अन् कसे लावावे, सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य का, यांविषयीच्या कृती त्यांमागील अध्यात्मशास्त्रीय कारणांसहित जाणून घेऊया.

(#kumkum #kunku #कुंकू)

लहान मुलीपासून वयस्कर स्त्रीपर्यंत सर्व हिंदु स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. केवळ विधवा कुंकू लावत नाहीत. लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला आहे. उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे भेद देशकालपरत्वे आहेत.

१. कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ

अ. ‘कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन तोंडवळ्याच्या (चेहर्‍याच्या) स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो.

आ. कपाळावरील स्नायूंचा ताण अल्प होऊन मुख उजळ दिसते.

इ. कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो.’

ई. ‘कमळ हे साकारस्वरूप, कुंकू हे शक्तीस्वरूप, तुळस हे श्रीकृष्णतत्त्वस्वरूप, तर बेल हे शिवस्वरूप आहे.’
– सद्गुरू (सौ). अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

उ. कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत होऊन तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होणे

‘कुंकवामध्ये तारक आणि मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते. देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळण्याच्या हेतूने स्त्रीच्या भ्रूमध्यावर तिने स्वतः किंवा दुसर्‍या स्त्रीने कुंकू लावल्यास स्त्रीमधील तारक शक्तीतत्त्वाची स्पंदने जागृत होऊन वातावरणातील शक्तीतत्त्वाची पवित्रके त्या स्त्रीकडे आकृष्ट होतात.’

१ अ. कुंकवाचा गंध, रंग आणि शक्ती यांमुळे होणार्‍या लाभाचे प्रमाण आणि जिवावर होणारा परिणाम

– एक विद्वान (सद्गुरू (सौ). अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

२. कुंकू कधी अन् कसे लावावे ?

व्हिडिओ : तिलक आणि कुंकू लावण्याची पध्दत

२ अ. स्वतःच्या कपाळावर कुंकू लावणे

आंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने कपाळावर कुंकू लावावे. कपाळाला कुंकू चिकटण्यासाठी मेणाचा वापर करावा. कपाळावर प्रथम मेण लावून त्यावर कुंकू लावावे.

२ अ १. अनामिकेने कपाळावर कुंकू लावण्यामागील शास्त्र
‘अनामिकेतून प्रक्षेपित होणार्‍या आपतत्त्वात्मक लहरींच्या साहाय्याने कुंकवातील शक्तीतत्त्व अल्प कालावधीत जागृत होऊन प्रवाही बनून आज्ञाचक्रात संक्रमित होत असल्याने तिच्यातील रजोगुणाच्या कार्याला शक्तीरूपी बळ प्राप्त होते.’ – एक विद्वान (सद्गुरू (सौ). अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

२ अ २. कपाळावर कुंकू लावल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे ‘सूक्ष्म-चित्र’

२ आ. इतर सूत्रे

१. कुंकवामध्ये शक्ती असते. कुंकू लावणे, हे पूजा करणे, इतरांना सन्मानित करणे यांसारखे कर्म असल्याने कुंकू लावणार्‍या स्त्रीच्या बोटाला कुंकू लागल्याने कुंकूमधील चैतन्य आणि शक्ती कणांच्या रूपात हातातून देहात पसरते.

२. कुंकू लावल्याने स्त्रीकडे शक्तीचे कण प्रक्षेपित होतात. त्यामुळे तिच्यावर आध्यात्मिक उपाय होतात आणि तिचे रज-तमापासून रक्षण होते. तसेच त्यामुळे तिचे मन शांत रहाते. साधकाच्या साधनेनुसार देवता किंवा ईश्वर याच्याशी कुंकू लावलेल्या स्त्रीचे अनुसंधान १ टक्क्याने वाढू शकते.

२ इ. स्त्रियांनी भांगात कुंकू किंवा सिंदूर भरल्याने होणारे लाभ

२ इ १. – पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत रहाणे
‘सुवासिनी स्त्रियांच्या भांगातील कुंकू किंवा सिंदूर पाहून हिंदु पुरुषांना शत्रूशी लढण्यासाठी मारक शक्ती आणि चैतन्य मिळून त्यांची क्षात्रवृत्ती अन् उत्साह वाढत असे. पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी सुवासिनी स्त्रियांनी कुंकू किंवा सिंदूर यांचा कपाळावर किंवा भांगात लावण्यास वापर करणे, हे मानसिक आणि आध्यात्मिक या दोन्ही कारणांसाठी योग्य आहे. (युद्धासाठी जाणार्‍या पुरुषांनीही सतत स्वतःला सात्त्विकता, मारक शक्ती आणि चैतन्य मिळण्यासाठी कपाळाला कुंकू किंवा सिंदूर याचा टिळा लावावा.)
२ इ २. वाईट शक्तींपासून संरक्षण
स्त्रियांचे मस्तक पुरुषांच्या मस्तकाच्या तुलनेत मऊ आणि संवेदनशील असते. केसातील भांगाचा भाग हा मध्यभागी असल्याने तो सर्वाधिक संवेदनशील असतो. या भागाचे वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी भांगात सिंदूर भरला जातो.
२ इ ३. सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य
कुंकवातील मारक तत्त्वामुळे स्त्रीच्या सूक्ष्मदेहाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होते आणि कुंकवातील चैतन्यामुळे तिचा सूक्ष्मदेह सात्त्विकता ग्रहण करतो. त्यामुळे त्याची शुद्धी होण्यास साहाय्य होते. सिंदुरामध्ये कुंकवाच्या तुलनेत मारक तत्त्व अल्प प्रमाणात असते; त्यामुळे सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य आहे.’

साभार : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार’

________________________________

‘तिलकधारण कसे करावे आणि त्यामागील शास्त्र’ जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.sanatan.org/mr/a/457.html

___________________

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.