ठाणे, १२ मे (वार्ता.) – डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापिठाच्या वतीने दापोली येथे ‘सुवर्ण पालवी’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १३ ते १७ मे या कालावधीमध्ये भरणार असून या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी ‘पितांबरी प्रॉडक्ट लिमिटेड’च्या ठाणे येथील कार्यालयात ११ मे या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, ‘पितांबरी’ उद्योग समूहाचे व्यस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई आणि पितांबरी उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (चिफ ऑपरेटिंग ऑफिसर) माधव पुजारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
१. ‘कोकणातील शेतीचा मानबिंदू म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे वर्ष २०२१ आणि २०२२ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून मागील ५० वर्षांत विद्यापिठाने कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक साहाय्यासाठी मोलाचे योगदान दिले. आतापर्यंत विद्यापिठाने पिकांच्या जाती, कृषी अवजारे, तसेच तत्सम तंत्रज्ञानाच्या शिफारसी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत. विद्यापिठाने विकसित केलेल्या या सर्व तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार प्रभावीपणे व्हावा, या व्यापक उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे’, अशी माहिती डॉ. रवींद्र मर्दाने यांनी दिली.
२. ‘या कृषी प्रदर्शनात विद्यापिठाच्या विविध क्षेत्रांवर आधारित प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवाद, चर्चासत्र, शिवारफेरी आणि खाद्यपदार्थ स्पर्धा इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ करून घ्यावा’, असे आवाहन श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले आहे.
या प्रदर्शनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, तसेच राज्य कृषी मंत्री विश्वजीत कदम आणि पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश अबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.