भारताचे शत्रू आणि त्यांच्याशी लढण्याची सिद्धता !

वर्ष १९६२ मध्ये युद्धसज्ज नसलेल्या भारताचा ८४ सहस्र चौ.कि.मी. भाग चीनकडून गिळंकृत !

शत्रूच्या आक्रमणापूर्वी युद्धाची सिद्धता नसल्यास काय होते ? याचे उदाहरण !

चीनने वर्ष १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले. त्यापूर्वीच ‘तो भारतावर आक्रमण करणार’, हे संरक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आधीच सांगितले होते; कारण ‘त्याने तिबेट गिळंकृत केल्यावर तो भारतावर आक्रमण करणार’, हे अपेक्षितच होते; मात्र राष्ट्रघातकी नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या स्वप्नात मग्न राहिले. त्याचा परिणाम नंतर भारताला मोठ्या प्रमाणात भोगावा लागला. भारताचा ८४ सहस्र चौ. कि.मी. भूभाग चीनने गिळंकृत केला. या पराभवाचा डाग भारतावर कायमचा लागला. वर्ष १९६५ मध्ये चीनचे सैन्य मॅकमोहन रेषा ओलांडून अरुणाचल प्रदेशात घुसले, तसेच पश्चिम क्षेत्रात त्यांनी अक्साई चीन कह्यात घेतला.

– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


पाकपुरस्कृत आतंकवाद्याचे अघोषित शीतयुद्ध ७४ वर्षे चालूच !

वर्ष १९४७ मध्ये पाकने भारतावर केलेल्या आक्रमणानंतर वर्ष १९४८ मध्ये युद्धबंदीच्या वेळी पाकने काश्मीरचा काही (पाकव्याप्त काश्मीर) भाग बळकावला. तेव्हापासूनच त्याला काश्मीरचा भारतातील भागही हवा आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले धर्मांधांचे तुष्टीकरण आणि राबवलेले चुकीचे परराष्ट्रीय धोरण यांमुळे भारताच्या स्वातंत्र्यापासूनच गेली ७४ वर्षे पाकपुरस्कृत आतंकवादी भारतातील धर्मांधांना हाताशी धरून भारतात अघोषित छुपे युद्ध करत आहेत. काश्मीरमध्ये वर्ष २००४ ते २०२१ पर्यंत २ सहस्र सैनिक मारले गेले. आतापर्यंत पाकपुस्कृत आतंकवाद्यांनी प्रतिदिन सीमेवर आक्रमण करून सहस्रो सैनिक आणि शेकडो नागरिक यांना ठार केले. भारतासमवेतची चारही युद्धे पाक हरला, तरीही काश्मीरमध्ये अशा प्रकारे शीतयुद्ध पुकारून सहस्रो हिंदूंना मारणे आणि वर्ष १९९० मध्ये लाखो हिंदूंचे विस्थापन करण्यात आतंकवादी त्यांना मिळालेल्या स्थानिक राज्यकर्त्यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे यशस्वी झाले.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

अलीकडच्या काळात सैन्यावर दगडफेक करणारे स्थानिक धर्मांधही या आतंकवाद्यांनी निर्माण केले. आज ३७० कलम काश्मीरमधून हटवले गेल्याने काश्मीर विकासाकडे पावले टाकत असला, तरीही आजही आतंकवाद्यांचे आक्रमण चालूच आहे. त्यामुळे वर्ष १९४७, १९६५ आणि १९७१ (वर्ष १९८४ मध्येही पाक सियाचीनवर करणार असलेले आक्रमण भारताने त्यापूर्वीच मोहीम राबवून परतवले) नंतर वर्ष १९९९ मध्ये कारगील अशी ४ युद्धे पाक हरला, तरी त्याने आतंकी शीतयुद्धातून भारताची अपरिमित हानी करणे चालूच ठेवल्याने भारताने आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केलेले ‘सर्जिकल स्ट्राईक’ पुरेसे नाहीत, तर आतंकवाद्यांचे मूळ असलेल्या पाकचा विनाश भारतावरील पाकची असलेली काळीकुट्ट युद्धछाया कायमस्वरूपाची नष्ट करू शकतो.

– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, पनवेल. (२१.४.२०२२)


चीनचे भारताच्या सीमांवरील युद्ध !

गलवान खोऱ्यात भारतविरोधी आगळीक करणारे चिनी सैनिक

गलवान खोऱ्यात नियंत्रण रेषेच्या अलीकडे भारतीय हद्दीत रस्त्याचे काम चालू आहे. या बांधकामाला चीनने हरकत घेतली. त्यावरून उभय देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला. १५ जून २०२० या दिवशी २० भारतीय सैनिक आणि नेमकी संख्या सांगता येणार नाही, इतके चिनी सैनिक गलवान खोऱ्यात शहीद झाले. भारत आणि चीन यांच्यात सुमारे ३ सहस्र ८०० कि.मी. लांबीची सीमारेषा आहे. एप्रिल २०२० पासून ही सीमारेषा (विशेषत: पूर्व लडाख) अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करून गलवानच्या क्षेत्रावर दावा सांगणे चालू केले. तेथून त्यांना हुसकावून लावण्यात भारताला यश आले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी चर्चेच्या १२ फेऱ्या झाल्या असल्या, तरी चीन भारत-चीन सीमेवर नवी गावे उभारणे, अरुणाचल प्रदेशातील गावांची नावे पालटणे, लडाखनजीकच्या सीमेवर ‘रोबो’ सैन्य तैनात करणे असे करतच आहे. सीमेवर सैन्याची कुमक वाढवणे, क्षेपणास्त्रे तैनात करणे, युद्धसराव करणे यांतून तो भारतावर दबाव टाकतो. अरुणाचल प्रदेशाशी जोडलेल्या सीमारेषेवर चीनने अनेक नवीन गावे वसवून भारत-चीन सीमेवर संभाव्य युद्धकाळासाठी लष्करी तळ उभारण्याचे काम चालू केले आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे, चीनने अरुणाचल प्रदेशचे नामकरण ‘दक्षिण तिबेट’ करून त्यांतील १५ प्रदेशांची नावेही एकतर्फीच पालटली. सैन्य माघारीचा निर्णय होऊनही चीनने गलवानमध्ये चिनी ध्वज फडकवला. चीनच्या भारतातील राजदूतांनी आता अरुणाचल प्रदेशामध्ये केंद्रातील कोणत्या नेत्याने जावे, कुणी जाऊ नये यावरून टीका करणे चालू केले. तिबेटी देहलीतील समारंभांना गेल्याने चीनने उघड टीका केली. यावरून चीनची मजल कुठवर गेली आहे, याचा अंदाज येईल. चीनने लडाखनजीकच्या सीमेवर रोबो सैनिक तैनात केले आहेत.

धूर्त चीन

भारताचे वाढत असलेले आंतरराष्ट्रीय महत्त्व चीनला न्यून करायचे आहे. भारतात सीमेवरील तणावाने भारताची प्रचंड शक्ती आणि पैसा त्यावर व्यय होत असल्याने चीनला ते हवे आहे. तेथील गलवान संघर्षानंतर सैन्य तैनातीचा प्रतिदिवशीचा खर्च सुमारे ३०० कोटी इतका होता. यावरून चीनच्या रणनीतीचा अंदाज येऊ शकतो.

उपाय

चीनच्या दबावापुढे हार न मानता भारतालाही महत्त्वाची पावले उचलावी लागतील. चीनच्या विस्तारवादाला रोखण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या चार देशांनी मिळून ‘क्वाड’ ही संघटना स्थापन केली आहे; भारतानेही सीमाभागात साधनसंपत्तीचा विकास आणि स्थानिकांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. ते थोडे फार चालू केले आहे. लष्कराला स्थानिकांकडून माहिती मिळाल्याने पुष्कळ लाभ होतो. सीमेवर साधनसंपत्तीचा विकास न करण्याचे वर्ष २००९ पर्यंत भारताचे धोरण गेल्या ८ वर्षांत पूर्ण पालटले आहे.

(संदर्भ – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, ‘विवेक मराठी’, ७.१.२०२२)


पाकसमवेतचा अणूयुद्धाचा धोका !

भारत आणि पाक यांच्याकडील अणूबाँबची क्षमता !

सध्या पाकिस्तानकडे असणाऱ्या सर्वोच्च क्षमतेच्या अणूबाँबची क्षमता ४५ किलो टन इतकी आहे. या अणूबाँबमध्ये २८० मीटरचा परिसर बेचिराख करण्याची आणि १.१६ कि.मी. परिसरात किरणोत्साराचे दुष्परिणाम करण्याची क्षमता आहे. हा स्फोट हवेत झाला, तर जवळपास २.५ किलोमीटरच्या कक्षेतील परिसरावर त्याचा परिणाम होईल आणि ३.०५ किलोमीटरच्या कक्षेतील लोकांना गंभीर दुखापत होऊ शकते. पाकने चंदीगड, नवी देहली किंवा मुंबई येथे अणूबाँब टाकल्यास चंदीगड येथे अडीच लाखांहून अधिक मृत्यू, तर पावणे पाच लाखांहून अधिक घायाळ होतील, नवी देहलीत साडेतीन लाखांहून अधिक मृत्यू पावतील, तर पावणे तेरा लाख लोक घायाळ होऊ शकतात. मुंबईत पावणे सहा लाखांहून अधिक लोक मृत्यू पावतील तर २० लाखांहून लोक घायाळ होतील. (हा अंदाज वर्ष २०१५ चा असल्याने आता होण्याऱ्या हानीचे प्रमाण अधिक असेल. – संकलक) (संदर्भ : लोकसत्ता ६.८.२०१५)

श्री. प्रशांत कोयंडे

‘भारत आणि पाक यांच्यात आता कोणतेही युद्ध झाले, तर त्याचे पर्यवसान अणूयुद्धातच होणार आहे’, हे भारतियांनी आता कायमचे लक्षात ठेवून त्या दृष्टीने सतत सिद्ध असणे आवश्यक आहे. शासनकर्ते, प्रशासन आणि राजकीय पक्ष, तसेच जनता यांनी परिणामांचा विचार करून तशी सिद्धता करणेही आवश्यक आहेच. भारताने यापूर्वी घोषित केले होते की, भारत पहिल्यांदा अणूबाँबचा वापर करणार नाही; मात्र नंतर त्याने स्वतःहून स्वतःवर घातलेले हे बंधन आता काढून टाकले आहे. तरी भारतीय मानसिकता पहाता भारत पहिल्यांदा अणूबाँबचा वापर करण्याची शक्यता ९९ टक्के नाही, असेच म्हणायला हवे. त्यामुळे पाकसमवेत युद्ध झाले, तर प्रथम पाकच भारतावर अणूबाँब टाकू शकतो.

– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


सध्या दक्षिण चीन समुद्रात चीनने चालू केलेले ‘इलेक्ट्रॉनिक’ युद्ध !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

दक्षिण चीन समुद्रामध्ये निर्मनुष्य बेटांवर चीनने प्रवेश करून त्यांचा विकास करून त्यांचे रूपांतर नौदल केंद्रांमध्ये केले. आता चीन हिंदी महासागरामध्ये घुसखोरी करून त्याचे बस्तान बसवू पहात आहे. भ्रमणभाष किंवा रडार यांच्या लहरी घेऊन त्यातून शत्रूचे निरोप समजून घेण्याचे नवे तंत्रज्ञान चीनने शोधले आहे. या ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’च्या तंत्रज्ञानात चीन जितका यशस्वी होईल, तितका आगामी सागरी युद्धात चीनला त्याचा मोठा लाभ होणार आहे. ‘लहरींद्वारे माहिती जाणून घेणे’ आणि ‘इतरांच्या यंत्रणा बंद पाडणे’ असे या युद्धाचे स्वरूप आहे. दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनने अनेक ठिकाणी ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’साठी रडार्स आणि ‘सॅटेलाईट ट्रॅकिंग स्टेशन’ (उपग्रहांशी समन्वय साधण्यासाठी उभारलेली यंत्रणा) उभारली आहे. त्यातील काही समुद्री भाग अन्य देशांचा आहे. ‘चीनने ‘लेझर बीम’ किरणे सोडून अनेकांच्या जहाजांची रडार यंत्रणा बिघडवून टाकली आहे’, तसेच ‘इलेक्ट्रॉनिक आक्रमणे करून काही लोकांच्या बुद्धीवरही परिणाम केला आहे’, असा त्याच्यावर आरोप आहे. चीन दक्षिण समुद्रात वाढवत असलेल्या सत्ताबळाने भारताची अन्य देशांत जाणारी व्यापारी जहाजे आणि पाणबुड्या यांची माहिती तो मिळवून ठेवू शकतो, ज्याचा युद्धकाळी त्याला लाभ होईल.

भारतही चीनच्या ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’ला इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या प्रतिकार करून ‘जशास तसे’ उत्तर देऊ शकतो.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे


युद्धकाळात भारतात अंतर्गत बंडाळीची दाट शक्यता !

काही वर्षांपूर्वी पाकचे मंत्री महंमद अली यांनी पाकमधील एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात विधान केले होते, ‘‘भारताने पाकवर आक्रमण केले, तर केवळ ५ लाख पाकिस्तानी सैन्यच नव्हे, तर २२ कोटी पाकिस्तानी नागरिक आणि इतकेच नव्हे, तर तेथील (भारतातील) ३० कोटी लोकही (मुसलमानही) भारताच्या विरोधात उभे रहातील अन् ‘गजवा-ए-हिंद’ (भारतातील काफिरांच्या (हिंदूंच्या) विरोधात मुसलमानांकडून

करण्यात येणारे युद्ध) करतील.’’ हे चिथावणी देणारे विधान गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. हे विधान प्रसारमाध्यमांनी जाणीवपूर्वक दडपले. त्यामुळे भारतियांनी हा धोका लक्षात घेऊन सतर्क रहाण्यासमवेतच कुणी देशद्रोह केलाच, तर पोलीस आणि सुरक्षादले यांना साहाय्य करावे लागेल. पाकसमवेतच्या गेल्या ४ युद्धांत असा प्रसंग निर्माण झाल्याचे उदाहरण नाही; मात्र आताची स्थिती पहाता काही ठिकाणी असे घडलेच, तर तेथे त्याला तोंड द्यावे लागणार; कारण धर्मांध ठिकठिकाणी दंगली करून जी स्थिती निर्माण करतात, ती पहाता ‘पोलीस आणि अन्य सुरक्षादले त्यांच्याशी लढण्यात पुरी पडतील का ?’, असा प्रश्न असेल.

– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘अंतर्गत बंडाळीची स्थिती निर्माण होऊ शकते’, हे सांगणारे द्रष्टे संत !

‘भारतावर शत्रूराष्ट्र आक्रमण करील, तेव्हा भारतातील धर्मांध इथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण करून अंतर्गत बंडाळी निर्माण करू शकतात.’, असे परात्पर गुरु पांडे महाराज फार पूर्वी म्हणाले होते. पाकिस्तान येथील मंत्र्याने केलेले वरील विधान पहाता संतांना सर्व परिस्थितीचे ज्ञान आधीच असल्याने ते द्रष्टे कसे असतात, हे लक्षात येते. – सौ. रूपाली वर्तक, पनवेल (२१.४.२०२२)


चीनला तोंड देण्यासाठी भारतनिर्मित ‘पिनाक’ शस्त्रप्रणाली !

‘पिनाक’ शस्त्रप्रणाली

भारतीय लष्कराने ईशान्येकडील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी चीन सीमेजवळ ‘पिनाक’ आणि ‘स्मर्च मल्टीपल रॉकेट लॉन्चर’ तैनात केले आहेत. लष्कराने अरुणाचल प्रदेशात सीमेच्या बाजूने सैन्य वाढवले. पिनाक शस्त्रप्रणाली ही एक रॉकेट तोफखाना प्रणाली आहे. ती ३८ कि.मी.पर्यंत शत्रूच्या लक्ष्यांना भेदण्यास समर्थ आहे. लष्कराची क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने जास्त उंचीच्या क्षेत्रात ती तैनात केली आहे. सहा पिनाक लाँचर्सची बॅटरी ४४ सेकंदात ७२ रॉकेटचा ‘सल्व्हो फायर’ करू शकते. हे शेकडो मीटरच्या आत शत्रूच्या टाक्या आणि इतर शस्त्रे नष्ट करू शकते. पिनाक हे संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित असून त्याची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थान (डी.आर्.डी.ओ.) मध्ये झाली आहे. चिनी सीमेवर बोफोर्स तोफाही तैनात केल्या आहेत.

(संदर्भ : ‘वृत्तभारती’, २३.१०.२०२१)


चीनच्या संभाव्य सागरी आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ‘आय.एन्.एस्. अरिहंत’ !

‘आय.एन्.एस्. अरिहंत’

चीनच्या संभाव्य आगळिकीला चोख प्रत्युत्तर देता यावे, यासाठी भारताने ‘आय.एन्.एस्. अरिहंत’ ही युद्धनौका तैनात केली आहे. चीनने सागरी मार्गाने अणूआक्रमण केलेच, तर त्यास तोंड देता यावे म्हणून ही रणनीती आखण्यात आली. तसेच ‘अग्नी ५’ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्राही सीमेवर तैनात करण्यात आले. चीनच्या कोणत्याही शहरावर या क्षेपणास्त्राने आक्रमण करता येऊ शकणार आहे. – पुलकित मोहन, १६.९.२०२०

‘आय.एन्.एस्. वागशीर’ पाणबुडीचे जलावतरण २० एप्रिलला झाले.

‘अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही’, (एन्.एफ्.यू.) हे धोरण आणि तरीही आक्रमण केले, तर प्रतिआक्रमणाचा अधिकार राखून ठेवल्याने चीन आणि भारत यांत अणूआक्रमणाची शक्यता अल्प आहे. आण्विक प्रतिरोधासाठी अजूनही चीनपेक्षा पाकिस्तानवरच भारताने लक्ष केंद्रित केले आहे. – पुलकित मोहन, १६.९.२०२०