ब्रह्मलोक आणि सूर्यमंडल यांच्या प्रकाशित भारतात गंगा, यमुना अन् सरस्वती या जलस्रोतांना आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त असणे

‘ब्रह्मलोक आणि सूर्यमंडल यांनी प्रकाशित भारताला गंगा, यमुना आणि सरस्वती हे सहज प्राप्त झालेले अलौकिक जलस्रोत आहेत. या जलस्रोतांचा संबंध भू मंडलाच्या अधोभागी असणाऱ्या सप्तपाताळापर्यत आहे. आधिभौतिक स्तरावर या जलस्रोतांना अपूर्व असे महत्त्व आहे, तर आध्यात्मिक स्तरावर ज्याप्रमाणे मानव देहातील इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांना सर्वाेत्तम महत्त्व आहे, तसेच या धरणीला या तीन जलस्रोतांचे महत्त्व आहे. आधिदैविक दृष्टीने ब्रह्मा, विष्णु आणि महेश या संज्ञेला महत्त्व आहे, तेच जल (सोम), सूर्य आणि अग्नी असे या जलस्रोतांना महत्त्व आहे.


जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती

१. गंगा, यमुना आणि सरस्वती या जलस्रोतांमध्ये उन्मादाने विकृती निर्माण केल्यास संपूर्ण त्रिभुवनाला पीडा पोचणे

मानवाच्या शरीरात मध्यभागी नाभीमध्ये (बेंबी) गुंफलेल्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाड्या शरीराच्या अधो, मध्य आणि उर्ध्व भागाला चैतन्याने आकंठ बुडवून आल्हादित करतात अन् मानवाने आहार-विहार यांवर संयम न ठेवल्यास संपूर्ण शरीराला व्याधीग्रस्त, तसेच वेदनेने जर्जर करतात. त्याचप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती या जलस्रोतांमध्ये योजनाबद्ध अन् उन्मादाने विकृती निर्माण केल्यास या त्रिभुवनाला ‘भूर्भुवःस्वः’ संज्ञा दिल्याप्रमाणे विकृत आणि वेदनेने असह्य करतात. मातेच्या गर्भातील शिशूचे पोषण नाभीतील नाळेद्वारे होत असते. त्याचप्रमाणे ब्रह्मांडातील गतीमान (जंगम) प्राण्यांचे पोषण गंगा आदी नद्यांमुळेच शक्य आहे.

गंगा-यमुना संगमाचे उंचावरून घेतलेले छायाचित्र

२. सध्याच्या दिशाहीन यांत्रिक शासनप्रणालीत जलस्रोतांना अटकाव करणारी विद्या अन् प्रणाली कार्यान्वित असणे

संपूर्ण जगतातील अन्य जलधारांचा अखंड स्रोत गंगा नदीच आहे. या जलस्रोतात (गंगानदीत) विकृती निर्माण होऊन विलोप (लुप्त) झाल्यास संपूर्ण जगतातील अन्य जलधारांचे दार्शनिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक विलोप (नाश) सुनिश्चित आहे. वेदांतील शास्त्रांना अनुसरून सनातन शासनप्रणालीमध्ये ऊर्जाचे स्रोत पंचमहाभूतांना (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश) सुसंस्कृत, सुव्यवस्थित आणि सुरक्षित ठेवण्याचे प्रकार अन् प्रथा सुलभ होत्या. सध्याच्या दिशाहीन यांत्रिक शासनप्रणालीमध्ये मात्र या जलस्रोतांना विकृत, कलुषित, लुप्त (म्हणजे स्थानबद्ध) आणि अटकाव करण्याची विद्या अन् प्रणाली सुलभ आहे.

३. गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा उपयोग धर्म अन् मोक्ष यांसाठी न करता केवळ भौतिक सुखांसाठी केल्याने त्यांचे मूळ उत्पत्तीस्थानच लुप्त होऊ लागणे

धर्म आणि मोक्ष यांचे केंद्रबिंदू असलेल्या गंगा, यमुना अन् सरस्वती यांचा उपयोग जोपर्यंत धर्म आणि मोक्ष हाच केंद्रबिंदू समजून केला जात होता, तोपर्यंत या जलस्रोतांपासून अर्थ (संपत्ती) आणि काम (उद्योग) पुष्कळ प्रमाणात उपलब्ध होते; परंतु जेव्हापासून यांचा उपयोग केवळ संपत्ती अन् भौतिक सुखसुविधा प्राप्त करून उपभोगांत रममाण होण्यासाठी होऊ लागला, तेव्हापासून त्यांचे मूळ उत्पत्तीस्थानच लुप्त होऊ लागले. त्यामुळे चल आणि अचल प्राण्यांसाठी यांचे विकृत स्वरूप अत्यंत घातक सिद्ध होत आहे. सरस्वतीची जलधारा प्रज्ञा (धारणशक्ती) देणारी, यमुनेची धारा ऊर्जा (शक्ती) देणारी आणि गंगानदीचा स्रोत समृद्धी अन् शांती देणारी आहे. सरस्वती नदी लोप पावल्यास आतापर्यंत सांभाळून ठेवलेली धारणशक्ती लोप पावेल. यमुनेच्या स्रोताची विकृती आणि विलोपाने ऊर्जा शक्तीचा नाश सुनिश्चितच आहे, तर गंगानदीच्या स्रोताच्या विकृती अन् विलोपाने दारिद्र्य, तसेच अशांती (अराजकता) सुनिश्चित आहे.

सनातन आर्य-वैदिक धर्माच्या ज्ञानी-विचारवंतांकडून चिरंतर परीक्षा करून उपयोगात आणलेली शेती, जलसाधनसंपत्ती यांचे प्रकार आणि परंपरा यांचा तिरस्कार करून कोणतेही आधुनिक तंत्र अन् प्रथा स्वीकारल्यास त्या हितावह सिद्ध होतील, हे कदापि शक्य नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

अस्मिन् लोकेऽथवामुष्मिन् मुनिभिस्तत्त्वदर्शिभिः ।
दृष्टा योगाः प्रयुक्ताश्च पुंसां श्रेयःप्रसिद्धये ।।
तानातिष्ठति यः सम्यक उपायान् पूर्वदर्शितान् ।
अवरः श्रद्धयोपेतः उपेयान् विन्दतेऽञ्जसा ।।
ताननादृत्य योऽविद्वान् अर्थानारभते स्वयम् ।
तस्य व्यभिचरन्त्यर्थाः आरब्धाश्च पुनः पुनः ।।

– श्रीमद्भागवत, स्कन्ध ४, अध्याय १८, श्लोक ३ ते ५

अर्थ : तत्त्वदर्शी मुनींनी या लोकात आणि परलोकात मनुष्याचे कल्याण करण्यासाठी कृषी, अग्निहोत्र इत्यादी पुष्कळ उपाय काढले अन् उपयोगात आणले. या प्राचीन ऋषींनी सांगितलेल्या उपायांचे जे श्रद्धापूर्वक आचरण करतात, ते चांगल्या प्रकारे इष्ट फळ प्राप्त करतात. जे तर्कशील पुरुष त्यांचा अनादर करून मनाने कल्पिलेल्या उपायांचा आश्रय घेतात, त्यांचे सर्व उपाय आणि प्रयत्न पुनःपुन्हा निष्फळ होतात.’

– जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती, भिलाई, छत्तीसगड. (३.७.२०१३)