वाढदिवस म्हणजे व्यक्तीला शुभेच्छा देण्याचा, तिचे अभिष्टचिंतन करण्याचा दिवस ! केक कापून आणि मेणबत्त्या विझवून पाश्चात्त्य पद्धतीने तो साजरा करण्याचे प्रमाण लोकांमध्ये अधिक असले, तरी काही जणांनी त्याला फाटा देत हिंदु संस्कृतीनुसार औक्षण करून वाढदिवस साजरा करण्यास प्रारंभ केला आहे. काहींनी मात्र पाश्चात्त्यांचा कित्ता गिरवत त्यात आणखी काही अपप्रकारांची भर घालत तो विकृतीकडे नेला आहे.
त्यांपैकी एक अपप्रकार म्हणजे वाढदिवसाला आणलेला केक ज्याचा वाढदिवस आहे, त्याच्या तोंडवळ्याला फासणे ! ही विकृती मुलांसह अगदी ज्येष्ठांमध्येही आढळते. महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात एका तरुणाचा वाढदिवस रस्त्यावर साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांनी त्याला रात्री बोलावले. तो तरुण आल्यावर रस्त्यावर उपस्थित सर्वच मित्रांनी आणलेला केक त्याच्या तोंडावर दाबून धरला. केक काही वेळ धरल्याने तरुणाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो रस्त्यावरच कोसळला. त्याला रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही छायाचित्रकात ही घटना चित्रीत झाल्याने त्या तरुणाच्या मृत्यूचे कारण समजले. सर्वांनीच आळीपाळीने केक तोंडावर दाबल्याने तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला होता. केक तोंडावर मारणे किंवा फासणे हे एवढे प्रचलित झाले आहे की, आता दूरचित्रवाणीच्या विज्ञापनांमधील वाढदिवसालाही तसे दाखवले जाते. एका वाईट प्रथेमुळे शुभदिनी एकाचा मृत्यू होणे यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकते ? या वाईट प्रथांमुळे एखाद्याचा वाढदिवस म्हणजे विकृती प्रकट करण्याचा दिवस ठरत आहे. आता वाढदिवस दिवसा नाही, तर रात्री १२ च्या ठोक्याला शुभेच्छा देऊन पूर्ण रात्रभर साजरा करण्यात येतो. आणखी एक विकृती म्हणजे ज्याचा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा देतांना अपशब्द बोलणे अथवा त्याला धमक्या देणे आदी अपपकार केले जातात. मद्याची मेजवानी करून एकमेकांना हाणामारी केली जाते. अशा वेळी तेथे उपस्थित असलेल्या लहान मुलांवर याचा किती वाईट परिणाम होईल, याची कल्पनाही करता येत नाही.
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे वर्षातून एकदा व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठीच्या चांगल्या कृतीची जागा भयावह विकृतीने घेतली आहे. समाजामध्ये या विकृतींविषयी जनजागृती न केल्यास आणि धर्मशिक्षण न दिल्यास या पुढचे अपप्रकार पहायला मिळाले नाही तर नवलच ! अशी वेळ न येण्यासाठी हिंदु धर्मानुसार वाढदिवस कसा साजरा करावा, हे सांगणे आवश्यक !
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.