काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांसाठी काश्मिरी मुसलमानांनी त्यांची हात जोडून क्षमा मागितली पाहिजे !

पीडीपीचे सरचिटणीस जावेद बेग यांचे आवाहन !

केवळ हात जोडून क्षमा मागितल्याने काहीही होणार नाही आणि अशी क्षमा काश्मिरी मुसलमान मागतील, याचीही शक्यता नाही. त्यामुळे या अत्याचारांमध्ये सहभागी असणार्‍या मुसलमानांना शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने आता पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. तरच खर्‍या अर्थाने काश्मिरी हिंदूंना न्याय मिळाल्यासारखे होईल ! – संपादक

पीडीपीचे सरचिटणीस जावेद बेग (डावीकडे)

नवी देहली – ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असतांना धर्मांध आणि हिंदुद्वेष्टे यांच्याकडून विरोधही केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीपी) पक्षाचे सरचिटणीस जावेद बेग यांनी ‘काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराविषयी मुसलमानांनी क्षमा मागितली पाहिजे. ‘आमच्या मागील पिढीने हिंदूंवर अत्याचार केला, ही त्यांची चूक होती’, असे त्यांनी म्हटले आहे.

१. जावेद बेग यांनी गिरिजा टिक्कू या काश्मिरी तरुणीचे छायाचित्र ट्वीट केले आहे. वर्ष १९८९ मध्ये ५ धर्मांधांनी गिरिजा यांचे अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला होता अन् नंतर करवतीने तिचे तुकडे केले होते.

२. बेग यांनी लिहिले आहे की, मी एक काश्मिरी मुसलमान आहे. आमची पंडित बहीण गिरिजा टिक्कू हिला काश्मिरी मुसलमान कुटुंबातील आतंकवाद्यांनी जिवंत असतांना तुकडे करून कापले. या आतंकवाद्यांच्या हातामध्ये स्वातंत्र्याच्या नावाखाली पाकिस्तानी बंदुका होत्या. हा कांगावा नाही, तर वास्तव आहे. मी हात जोडून पंडित समाजाची त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांसाठी क्षमा मागतो.

कमीत कमी आतातरी काश्मिरी मुसलमानांना लाज वाटली पाहिजे !

जावेद बेग यांनी ‘अ‍ॅन न्यूज कश्मीर’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचाही एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात बेग यांनी म्हटले आहे की, ज्या लोकांनी काश्मिरी पंडितांना मारले, ते कुठले होते ? ते बारामुल्ला येथील नव्हते, तर आमच्या घरातील होते. काश्मिरी पंडित बाहेरचे नव्हते. ते आमच्याच वंशाचे होते, आमच्याच रक्ताचे होते. कोणताही प्राणी त्याच्याच वंशाच्या प्राण्याला कधी मारत नाही. वाघ कधी वाघाची शिकार करत नाही. कुत्रे कधी कुत्र्यांना चावत नाहीत. कमीत कमी आतातरी आपल्याला लाज वाटली पाहिजे.

बीरवा येथील वर्ष १९९७ च्या हत्याकांडांचे जावेद बेग साक्षीदार !

बेग या व्हिडिओत पुढे म्हणतात की, मी स्वतः एका हत्याकांडाचा साक्षीदार आहे. मी बीरवा येथील रहाणारा आहे. येथेच २१ मार्च १९९७ मध्ये काश्मीरमध्ये सामूहिक हत्याकांड झाले होते. यात १२ हून अधिक काश्मिरी हिंदूंना ठार करण्यात आले होते. मी ते पाहिले आहे. यात ठार झालेले लोक कोणत्याही स्वातंत्र्याला रोखत नव्हते आणि कोणत्याही काश्मिरी मुसलमानाला मारत नव्हते. ते निःशस्त्र होते. यात मारल्या गेलेल्यांमध्ये आमच्या भागातील एक मुख्याध्यापक होते. माझ्यासारखा एक तरुण होता.

ज्या चुका आमच्या वडिलांच्या पिढीने केल्या आहेत, त्याला एक सुशिक्षित तरुण म्हणून त्या चुका स्वीकारून सामूहिकरित्या काश्मिरी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे. त्यासाठी कोणत्याही चित्रपटाची आवश्यकता नाही.