काश्मिरी हिंदूंच्या दुरवस्थेविषयी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी होते उदासीन !

भाजपचे नेते एम्.जे. अकबर यांचा आरोप

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांकडे काँग्रेसने पहिल्यापासून कानाडोळा केला, हे उघड सत्य आहे. असा पक्ष इतिहासजमा होणे आवश्यक ! – संपादक

ज्येष्ठ पत्रकार आणि भाजपचे राज्यसभेतील सदस्य एम्.जे. अकबर

नवी देहली – ज्येष्ठ पत्रकार आणि भाजपचे राज्यसभेतील सदस्य एम्.जे. अकबर यांनी काश्मिरी हिंदूंचे पलायन अन् दुर्दशा यांविषयी काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी दाखवलेल्या उदासीनतेविषयी भाष्य केले. या सूत्रावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिलेल्या उत्तराची आठवण करून देतांना अकबर म्हणाले, ‘‘मी सरकारकडे प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते, ‘काश्मीरमध्ये फारूख अब्दुल्ला यांचे सरकार सत्तेवर आहे. आम्ही हस्तक्षेप कसा करू शकतो ?’ अब्दुल्ला हे त्या वेळी राजीव गांधी यांचे मित्र होते.

ए.एन्.आय. वृत्तसंस्थेशी बोलतांना अकबर म्हणाले, ‘‘काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या वेळी घडलेल्या घटनांमुळे माझे मन दु:खी झाले होते. जेव्हा त्या घटना आठवतात, तेव्हा मला हादरल्यासारखे होते. एका समाजाला आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगावे लागले, हे दुर्दैवी आहे.’’