महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे ग्रंथप्रदर्शन अन् विविध माध्यमांतून करण्यात आला धर्मप्रसार !

भोपाळ (मध्यप्रदेश) – महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना भगवान शिवाच्या पूजेसंबंधी अध्यात्मशास्त्रीय माहिती मिळावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशमध्ये भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर आणि जबलपूर या ४ ठिकाणी, तर राजस्थानमधील जयपूर, सोजत, देसुरी (जिल्हा पाली) अन् जोधपूर येथे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण फलकांचाही जिज्ञासूंनी लाभ घेतला.

मध्यप्रदेश

१. भोपाळ

त्रिलंगा येथील शिव मंदिरामध्ये ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी मंदिराचे सचिव श्री. शिवरामसिंह चौहान यांनी साहाय्य केले.

२. जबलपूर

अ. येथे स्वयंसिद्धपीठ गुप्तेश्वर महादेव मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. यासाठी मंदिराचे पिठाधीश्वर महामंडलेश्वर डॉ. स्वामी मुकुंददासजी महाराज यांचे आशीर्वाद आणि मंदिराचे सचिव श्री. योगेंद्र त्रिपाठी यांचे सहकार्य लाभले. महामंडलेश्वर डॉ. स्वामी मुकुंददासजी महाराज यांनी ‘शिवरात्रीमध्ये शिवपूजनाचे महत्त्व’ या विषयावर छोटी मुलाखत दिली. ती हिंदु जनजागृती समितीकडून विविध सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आली.

आ. येथे अनेक भाविक ‘महाकाल’ लिहिलेले किंवा शिवपिंडीचे चित्र असलेले कपडे परिधान करून येत होते. यातून देवतांचा अवमान होतो. हे लक्षात घेऊन संस्थेच्या साधकांकडून त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कृतीशील धर्मप्रेमींनी केलेले विशेष प्रयत्न

१. दतिया येथील शिक्षक श्री. गिरीश शर्मा हे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण वर्गामध्ये नियमितपणे उपस्थित रहातात. त्यांनी सुप्रसिद्ध पितांबरा पिठाच्या मंदिरामध्ये धर्मशिक्षणाचे फ्लेक्स फलक स्वतः छापून घेऊन लावले.

२. शुजालपूर येथील समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. विनोद पाटीदार यांनी रिछडी गावातील शिव मंदिरामध्ये भगवान शिवाशी संबंधित धर्मशिक्षण देणारे भित्तीपत्रक लावले.

राजस्थान

१. जयपूर

येथील बनी पार्कमधील जंगलेश्वर महादेव मंदिरामध्ये ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या सेवेत सत्संगात येणार्‍या अंजू पुरोहित यांनी सहभाग घेत त्यांनी धर्मशिक्षणाशी संबंधित पत्रके वितरित केली. तसेच धर्मप्रेमी श्री. जगदीश चंद्र आणि कोटा येथील धर्मप्रेमी श्री. शैलेश चित्तोडा यांनी ६ मंदिरांमध्ये भित्तीपत्रके लावली.

२. देसुरी (जिल्हा पाली)

येथील धर्मशिक्षण वर्गामध्ये उपस्थित रहाणारे व्यावसायिक श्री. चंद्रप्रकाश पुरी यांनी एका मंदिरामध्ये भित्तीपत्रक लावले. तसेच पालीमधील धर्मप्रेमी माणिचंद मारू यांनी पालीच्या मंदिरांमध्ये धर्मशिक्षण देणारे भित्तीपत्रके लावली.

जोधपूर येथे करण्यात आलेले विशेष प्रयत्न

‘साधना’ सत्संगाला उपस्थित रहाणार्‍या अधिवक्त्या पूजा वाधवानी आणि सौ. राखी मोदी यांनी ८ मंदिरांमध्ये, उद्योगपती श्री. विशाल मोयल यांनी २ मंदिरांमध्ये आणि श्री. धीरजसिंह खींची यांनी ५ मंदिरांमध्ये भगवान शिवाशी संबंधित माहिती देणारे भित्तीपत्रके लावण्याची सेवा केली. या वेळी श्री. विशाल मोयल यांनी भाविकांमध्ये जागृती करून भित्तीपत्रके लावली. एका शिव मंदिरामधील पुजारी श्री. कालुदासजी वैष्णव म्हणाले, ‘‘अनेक लोकांना भगवान शिवाशी संबंधित पूजेविषयी माहिती नाही. तुम्ही हे भित्तीपत्रक लावून फार चांगले कार्य केले.’’

बिकानेर (राजस्थान)येथील धर्माभिमानी पत्रकार विवेक मित्तल यांनी महाशिवरात्रीनिमित्त  केला उत्स्फूर्तपणे धर्मप्रसार !

श्री. विवेक मित्तल

बिकानेर (राजस्थान) – महाशिवरात्रीनिमित्त ‘श्रीमती शशिबाला मित्तल स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि राष्ट्र अन् धर्म प्रेमी पत्रकार श्री. विवेक मित्तल यांनी ब्रह्मलीन स्वामी संवित सोमगिरीजी महाराज यांच्या ‘मृत्युंजय साधना’ या ग्रंथावर आधारित ‘शिवलिंगाचे रहस्य’ या विषयावर एक भित्तीपत्रक सिद्ध केले. त्याचे प्रकाशन लालेश्वर महादेव मंदिराचे महंत संवित् विमर्शानंदगिरिजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यासमवेतच श्री. मित्तल यांनी सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण फलकाच्या आधारावर भगवान शिवाशी संबंधित अध्यात्मशास्त्र सांगणारे आकर्षक फलक सिद्ध करून मंदिरांमध्ये लावले. हे फलक बिकानेर शहर आणि कोलायत क्षेत्रातील २५ मंदिरांमध्ये लावण्यात आले. (श्री. विवेक मित्तल यांनी महाशिवरात्रीनिमित्त केलेला धर्मप्रसार अभिनंदनीय आहे. श्री. मित्तल धर्मप्रसारासाठी चालवलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे ! – संपादक)

श्री. विवेक मित्तल हे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी दिलेल्या राष्ट्र अन् धर्म विषयक लेखांना विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी मिळण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात.