शिरढोण (जिल्हा रायगड) येथे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी साजरी

क्रांतीज्योत घेऊन जातांना डावीकडे श्री. विनायक वाकडीकर आणि उजवीकडे श्री. मच्छिंद्र पवार

पनवेल – १७ फेब्रुवारी या दिवशी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी होती. त्यांचे जन्मगाव शिरढोण येथे क्रांतीज्योतीची मिरवणूक काढून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. क्रांतीज्योत गावातील हुतात्मा स्मारक येथून घेऊन ती गावातून ‘आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती मंदिर’ येथे आणण्यात आली. क्रांतीज्योतीचे प्रज्वलन शिरढोण गावचे भारतीय सैन्यदलातील नायब सुभेदार श्री. भरत कर्णेकर आणि पळस्पे येथील श्री. सुजित हातमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंदार जोग आणि ‘क्रांतीज्योत मंडळ, शिरढोण’ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रतिवर्षी क्रांतीज्योत क्रांतीवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध ठिकाणांहून आणली जाते. या वर्षी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता गावातीलच हुतात्मा स्मारकातून क्रांतीज्योतीची मिरवणूक काढण्यात आली.

क्रांतीकारकांच्या शौर्यस्मृती जागृत करणारे फलक प्रदर्शन

क्रांतीकारकांच्या शौर्य स्मृती जागृत करणारे फलक प्रदर्शन

या वेळी हिंदु जनजागृती समितीनिर्मित क्रांतीकारकांचे जाज्वल्य देशप्रेम आणि शौर्याचे कथन करणार्‍या फलकांचे प्रदर्शन आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके स्मारकात लावण्यात आले होते. या फलक प्रदर्शनाने उपस्थितांच्या मनामधील देशासाठी बलीदान दिलेल्या क्रांतीकारकांच्या स्मृतींना जागृत केले.

येथील हिंदुत्वनिष्ठ आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विनायक वाकडीकर, श्री. मच्छिंद्र पवार आणि हितचिंतक यांनी हे फलक लावण्याचे नियोजन केले.