केरळमधील माकपच्या सरकारमधील हज मंत्री सरकारी पैशांतून अमेरिकेत घेणार उपचार !

स्वतःच्या वैद्यकीय उपचारांसाठी जनतेच्या करातून पैसे खर्च करणार्‍या मंत्र्यांना निवडून देणार्‍या केरळमधील जनतेला ही शिक्षाच होत ! – संपादक

मंत्री व्ही. अब्दुरहिमन

थिरूवनंतपूरम् (केरळ) – राज्याच्या क्रीडा, वक्फ आणि हज यात्रा यांचे मंत्री व्ही. अब्दुरहिमन हे वैद्यकीय कारणांसाठी २० दिवसांसाठी अमेरिकेला जाणार आहेत. त्यांच्या प्रवासाला सरकारने संमती दिली असून त्यासाठीचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे. त्यांच्या प्रवासाला संमती देणार्‍या आदेशात असे म्हटले आहे की, हा प्रवास केंद्रातील संबंधित मंत्रालयांच्या संमतीच्या अधीन असेल. या प्रकरणाची माहिती परराष्ट्र मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय यांना देण्यात आली आहे.

१. पिनाराई विजयन् यांच्या मागील सरकारच्या मंत्रीमंडळातील १७ मंत्र्यांनी ऑगस्ट २०१६ पासून डिसेंबर २०१९ पर्यंत अधिकृत आणि खासगी असे जगभरातील २७ देशांचे दौरे केले होते. यांपैकी मुख्यमंत्री १४ सहलींसह पहिल्या क्रमांकावर होते. त्यावेळचा त्यांचा अमेरिकेचा एक दौरा वैद्यकीय कारणांसाठी होता, तर एक संयुक्त अरब अमिरातला खासगी भेटीचा होता. उर्वरित १२ सहली अधिकृत होत्या.

२. त्या सरकारच्या काळात पर्यटन आणि देवस्वम् मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन् यांनी १३ परदेश दौरे केले होते.

३. गेल्या सरकारच्या काळात मंत्र्यांना त्यांच्या प्रवासासाठी सरकारने ५३ लाख ६८ सहस्र ८८८ रुपये खर्च केले होते. त्यांतील सर्वाधिक खर्च कडकमपल्ली यांच्या दौर्‍यांसाठी करण्यात आला. ही रक्काम १४ लाख ६५ सहस्र ८७२ इतकी होती.