मालवण-ओरोस एस्.टी. बसवर आनंदव्हाळ येथे दगडफेक

  • एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपाचा ३५ वा दिवस

  • बसची हानी; मात्र प्रवासी सुखरूप

एसटी बसवर दगडफेक

मालवण – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.च्या) कर्मचार्‍यांचा संप गेल्या ३५ दिवसांपासून चालू आहे. १३ डिसेंबर या दिवशी मालवण आगारातील ३ कर्मचारी कामावर उपस्थित झाल्याने मालवण-ओरोस अशी पहिली बससेवा चालू करण्यात आली; मात्र १४ डिसेंबर या दिवशी सकाळी निघालेली मालवण-ओरोस ही बस आनंदव्हाळ येथे आली असता २ व्यक्तींनी तिच्यावर दगडफेक करून पलायन केले. या वेळी बसमध्ये चालक आणि वाहक यांच्यासह १३ प्रवासी होते; सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. असे असले, तरी बसगाडीच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच एस्.टी.चे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी पहाणी करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

प्रवाशांची होणारी असुविधा थांबवा ! – प्रवासी संघटनेची मागणी

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात एस्.टी. कर्मचार्‍यांचा गेला एक मास बेमुदत संप चालू आहे. यामुळे ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरिक, शाळा आणि महाविद्यालये यांत जाणारे विद्यार्थी, नोकरदार यांची असुविधा होत आहे. यासह जिल्ह्यातील एस्.टी. प्रवाशांची असुविधा थांबवा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी एस्.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.